Sunday, 28 January 2018

होडीचा साना



दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गावी जाणे झाले. कोकणरेल्वेचे Timetable पावसामुळे पार कोलमडुन गेलेले. गाडी कणकवली स्टेशनमधे शिरत होती. माझी बँग घेवन मी दरवाज्यात तयार होतो. मी एकटा असल्यामुळे फारसे सामान सोबत घेतले नव्हते. माझ्या मागे एक माणूस उतरायला घाई करत होता. त्याच्या सोबत त्याची बायको आणि दोन मूलं होती. शिवाय सामान वेगळेच. त्यांच्या हातातली एक जड बँग घेवून मी उतरलो. त्यांच्याकडचे बाकीचे सामान बघून मी त्यांची बँग स्टेशनबाहेर वाहून न्यायचे ठरवले. रिक्षा स्टँडकडे सोडून मी बसच्या लाईनमध्ये उभा राहीलो. नेमकी त्याच दिवशी सगळीकडे पुरग्रस्त परीस्थिती होती. त्या माणसाला रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ चार पाच रिक्षावाल्यांसोबत Bargaining करून सुद्धा कोणी रू २५० पेक्षा खाली येत नव्हते. आणि माझ्या मते १०० भाडे ठीक होते. फक्त ५ ते ६ किमी अंतर होते. शेवटी त्या माणसाचा फँमिली असल्यामुळे नाविलाज झाला आणि ते ती रीक्षा पकडून निघून गेले. 
मी ही बस पकडून S T स्टँडला आलो. मस्त नाष्टा करून आचरा बस पकडली. मला वरवडेला उतरून सातरल या माझ्या गावी जायचे होते. पण रोजचा मार्ग पुरामुळे बंद असल्यामुळे दूरच्या मार्गाने जावं लागत होतं. पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे खिडकी बंद केली. खिडकीतून दिसणारा नजारा तर कोकण खुप सुंदर आहे अस वाटत होत पण थोड्यावेळापूर्वीचा प्रसंग आठवल्यावर कोकणी माणसाने असे वागू नये असे वाटत होते. जेणेकरून कोकणी माणसाच्या "काळजात भरलेली शहाळी" नासकी निघावी. 
सगळीकडे अस चालत अस नाही. पण कोणा एकामुळे सगळ्यांकडे संशयाने पाहीले जाते. माझा स्टॉप आला तसा मी उतरलो आणि नदीच्या दिशेने चालायला लागलो. होडी चालू असूदे अशी प्रार्थना करुन वाट धरली होती. पाऊस तर रपरप पडत होता. गणपतीचा दिवस असल्यामुळे प्रत्येक घरात लगबग चालू होती. काही वेळातच मी नदीच्या सान्यावर पोहोचलो. अगोदरच तीथे गर्दी झाली होती. २० ते २५ माणसे पलीकडे जायला उभी होती. नदीचे पाणी पार वरपर्यंत आले होते. ती एक अशी जागा होती की, तिथे पाणी संथ होते. पाणी थोडेफार प्रवाही होते पण होडीवाले "तारी काका" ते आव्हान लिलया पेलायचे. त्यांची एक नदीच्या तीरावर खुणा होती. त्या खुणेला पाणी लागले की होडी पाण्यात घालत नसत. आज अजून तीथे पाणी लागले नव्हते. 
तिथे पण मला वाट पाहावी लागणार होती. एका वेळेस होडीतून आठ जनांना जाता येत होतं. थोडा पुढे गेलो तसा ती मघाशी भेटलेली फँमिली पण होडीसाठी उभी होती. निव्वळ योगायोग. त्यानी पण मला ओळखले. ते कासरल या गावी जाणार होते. सातरल आणि कासरल हे गाव नदीकीनारी बाजूबाजूला वसलेले होते पण बरीच वर्षे मी मुंबईस्थित असल्यामुळे काहींना ओळखता येत नव्हते. शेवटी आमचा नंबर आला. होडीतून जायची मजा काय औरच होती. गढूळ पाण्याचा प्रवाह जरी संथ असला तरी उरात धडकी भरवत होता. आमच्या दिशेने पाण्याबरोबर वाहून येणारा छोटासा ओंडका होडीवाल्या काकानी मोठ्या कौशल्याने चुकवला. पाच मिनटात पैलतीरी पोचलो. 
"कीती झाले" माझा प्रश्न.
"अडीज रुपये देवा" होडीवाल्याकाकांचे चार्जेस ऐकून मी अवाक झालो, सोबत असलेली फँमिली पण.
"लवकर देवा ओ, तकडे लोका खोळांबली हत" त्याच्या बोलण्याने भानावर आलो. मी सरळ २० रूपयाची नोट त्याना दिली. परत द्यायला त्यानी पिशवीत हात घातला. मी त्यांचा तशाच धरून राहूदे बोललो. सोबतच्या माणसांनी देउ केलेले अधिकचे पैसे पण सुरूवातीला घेत नव्हते. शेवटी लोकांच्या आग्रहापोटी ते घेवून संतुष्ट होवून गेले.
हा माणूस आणि संधीचा फायदा घेवून लूटणारी माणसे यापैकी कोणाच्या काळजात शहाळी भरली आहेत? या माणसाला संधी नव्हती का? गरज नव्हती का? संसार नव्हता का? सगळे काही होत पण अशा माणसांची मन शहाळ्याच्या पाण्यासारखी स्वच्छ आणि नितळ होती . अशांना उद्याची चिंता नसते. त्यांना फक्त परमेश्वराला काय उत्तर द्यायचे याची चिंता असते.
नितिन राणे...

No comments:

Post a Comment