Wednesday, 10 January 2018

माणसातला कैवारी..


राजाराम कट्टर साई भक्त. एक वेळ खाणं चुकेल पण पूजा नाही. वेळोवेळी बाबानी त्याला हात पुढे केला होता. राजाराम गरीब होता पण खाऊन पिऊन सुखी होता. त्याच्या घरात कायम एक चैतन्य असायचे. सुशील बायको, दोन आज्ञाधारक मुलं आणि आपल्या आईसोबत सुखात राहत होता. कधी कधी दोन वेळच्या जेवनाची भ्रांत पडायची पण त्याच्या कुटूंबात एवढा समजूतदारपणा होता की वेळ सहज निघून जायची. आलेल्या अतिथीचे जमेल तसं स्वागत करायचा ते ही हसत मुखाने.
आज राजाराम सकाळी लवकर उठला होता. दोन दिवसावर होळीचा सण होता. त्याला तालुक्याच्या ठीकाणी बाजाराला जायचे होते. काजूच्या बिया विकून सामान खरेदी करणार होता. पूजा आटोपल्यावर त्याने काजूच्या बिया मोजायला सुरूवात केली. एक एक शेर (एक लाकडी माप) मोजून काजू एका गोणात ओतत होता. त्याने स्वताचे एक माप ठरवले होते. २ शेर म्हणजे १ कीलो अशा हिशेबाने किती किलो काजूच्या बिया होतील याचा अंदाज बांधायचा. मग त्याप्रमाणे बाजाराहाट. आज ६० शेर काजुच्या बिया भरल्या होत्या म्हणजेच ३० कीलो होणार होत्या आणि सध्याचा ९६ प्रती कीलोचा दर विचारात घेता रूपये २५०० च्या वर पैसे मिळणार होते. वाडवडीलांनी लावलेल्या काजु झाडांच्या लागवडीमुळे दरवर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचे.
राजारामने काजूची गोण डोक्यावर घेतली तशी त्याची छोठी मुलगी बाहेर आली.
"बाबानू बाजारात चलत जातास काय?"
रामाराम काही बोलला नाही. तो बाजाराच्या ठीकाणी जायला बाहेर पडला की ती दफ्तरात हात घालायची आणि खाऊसाठी दिलेले पैसे बापासमोर करायची. यावेळी पण ती पैसे घेवून धावली. पोरगी आपल्या मागून येतेय हे बघून राजारामने डोक्यावरची काजूची गोण खाली ठेवली. चिमुकल्या मुठीतले पैसे हातात घेवून मी बसनेच बाजारात जातो असे सांगून राजारामने तीचा गोड गालगुच्चा घेतला. पडवीतून त्याची बायको हा कौतूक सोहळा पाहत होती. तीच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत परत गोण डोक्यावर घेवून वाटेला लागला. अशावेळी त्याची छाती आपल्या मुलांच्या आणि बायकोच्या प्रेम व समजूतपणामुळे गर्वाने फुलायची. मग तो गुरासारखा राबायचा. खुप कष्ट करायचा.
त्याने मुलीने दिलेले पैसे खिश्यात टाकून बाजारात जाणारी मधली वाट पकडली. मुलीशी खोटं बोललो, याचेच त्याला वाईट वाटत होते. पण नाविलाज होता. तीने दिलेल्या पैशात तिकीट येणारे नव्हते. घरातला सारा पैसा संपला होता. पण आता काजुचा सिझन सुरू झाला होता. यापुढे दर आठवड्याला पैसे मिळणार होते.
बाजारात पोहोचायला बरोबर १ तास लागणार होता. हळूहळू उन वाढू लागले होते. पायातले स्लीपर पातळ झाले असल्यामुळे पायाला दगड टोचत होते. डोक्यावरील वजन भारी वाटू लागले होते. आता एक घाटी (चढण) चढली की तालुक्याचे शहर येणार होते.
राजाराम वळंजूंच्या दुकानात पोचला तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. काजू विकण्यासाठी रांग होती. अजून पंधरा मिनिटे तरी लागणार होती. लोकं आपला नंबर पहीला यावा यासाठी उगाचच घाई करत होती, अशातच राजारामच्या पुढे दोघेजण गेलेच. शेवटी राजारामचा नंबर आला आणि राजाराम अपेक्षेप्रमाणे प्रमाणे पैसे घेवून बाहेर पडला. सुटे पैसे वरच्या खिशात ठेवून बाकीचे खालच्या खिशात ठेवले. मग त्याची पावले जवळच असलेल्या साईमंदीराकडे वळली. बाबांसमोर नतमस्तक होऊन सगळ्या बद्दल त्यांच्याजवळ कृतज्ञता व्यक्त केली.
" बाबा , मी जो काय आसय, तो तुमच्यामुळाच आसय, माझ्या कुटूंबावर आता परयात जशी कृपादृष्टी ठेवलास तशी कायम ठेवा, ओम साई राम"
इतक्यात घंटानाद झाला. थोडावेळ थांबून तिथून बाजारहाट करायला निघाला. अपनाबाजारच्या स्टोअर येऊन बास्केटमध्ये सामान काढू लागला. १५ ते २० मिनिटात लिस्टप्रमाणे सर्व सामान घेऊन झाले, बिल चुकते करायला खिशात हात घातला. हाताला फाटका खिसा लागला. रूमालाच्या खाली ठेवलेले सर्व पैसै रूमालासकट गायब झाले होते. हा आघात त्यासाठी सहन करण्यापलीकडचा होता आणि तो सहन न झाल्यामुळे चक्कर त्याला आल्यासारखी झाली, घशाला कोरड पडली , हात पाय थरथरू लागले. तशातच डोक पकडून खाली बसला. सर्व लोक काउंटरजवळ धावले . त्याच्याच गावातील तिथे कामाला असलेला बारक्या पण आला. त्याने राजारामला लगेच ओळखले. त्याने जवळ जाऊन त्याला पाणी दिले. राजाराम पाणी काय पिणार होता. त्याच्या डोळ्यातूनच पाण्याची धार लागली होती. परत परत आपल्या दोन्हीकडच्या खिश्यात , पिशवीत हात घालून पैसे सापडतात का बघत होता. कुठे सापडणार? खिश्याला ब्लेड मारून कोणीतरी चोरले होते. तिथला नोकर जेव्हा त्याने काढलेले सामान परत नेऊ लागला तसे त्याला खुप वाईट वाटले. त्या नोकराचा पण नाविलाज होता. पाठीमागे बरीच लोकं बिल करायला उभी होती.
" राजाकाका, तु काय्येक काळजी करू नको, सगळा काय व्यवस्थित होतला, तू हयसर येवन बस बघू" बारक्या त्याची समजूत काढायला बघत होता पण राजाराम रिकामी पिशवी घेवून दुकानाच्या बाहेर पडला. आता एकच आधार होता. साईबाबा...नंतर राजाराम बाबांच्या मंदीरात बसून राहीला, किती वेळ कोणास ठाऊक?
***********************
इकडे घरी त्याची सर्वजण वाट बघत होते. १.१५ ला येणारी एस टी बस पण येऊन गेली होती. एवढा लागणार नव्हता. कदाचित खरेदीला उशीर झाला असेल अशी मनाची समजूत काढत माऊली घरात गेली. तीने नुसता भातच लावला होता. आमटी राजाराम आल्यावरच तयार होणार होती. राजाराम बाजारातून मासे आणतो असे सांगून गेला होता. बऱ्याच दिवसानी त्यांच्या घरात मासे शिजणार होते. दुपारचे दोन वाजत आले होते, पोरं भुक भुक करत होती. शेवटी माऊलीने ताटात नुसताच भात घेवून त्यात थोडं मीठ, मसाला, कुळीथाचे पीठ टाकून तेलाची बाटली पाघळली आणि पोरांना तो भात खायला दिला. पोरानी पण तो भात काही तक्रार न करता संपवला. चिमुरडी तिला खाण्यासाठी आग्रह करत होती पण तिच्या काळजाचा घोर अद्याप संपला नव्हता. चार वाजताची बस पण येऊन गेली. तरीही राजारामचा पत्ता नव्हता. आता मात्र तीची काळजी खुपच वाढली. ना ना कुविचार मनात यायला लागले. जेव्हा शेवटची वस्तीच्या बस मधून देखील राजाराम आला नाही तशी ती त्याला बघायला घराबाहेर पडली. पण शेजारचे पांडूरंग काका तीला जायला देईनात. ते स्वता आणि चार पोरांना घेऊन शोधायला निघाले. शेजारच्या बायका तीला धीर द्यायला लागल्या. पण तिचे समाधान फक्त आणि फक्त राजारामला बघूनच होणार होतं.
***********************
मंदीरात जेव्हा सायंकाळच्या धुपआरतीसाठी लोकं आली तेव्हा खाबांला टेकून बसलेला राजाराम दिसला. त्यांनी त्याला हलवून उठवले. तसा तो उठला. पुर्ण जागा झाला तेव्हा त्याला वेळेचे भान आले. बाबांना परत एकदा नमस्कार करून रीकामी पिशवी उचलू लागला. तितक्यात कोणीतरी प्रसादाची चार केळी पिशवीत टाकली. मंदीराच्या पायऱ्या उतरताना तो स्वतालाच मारून घेत होता. इतका वेळ आपण का बसून राहीलो. जराही घरच्यांचा विचार मनात आला नाही. कशी झोप लागली मला ? आणि केव्हा लागली. तो आठवायचा प्रयत्न करू लागला. खुप ताण दिल्यावर त्याला आठवले. मंदीरात आल्यावर आपल्याला काहीच सुचेनासे झाले होते. घरी काय आणि कोणत्या तोंडाने जायचे हा विचार सतावत होता. डोळ्यासमोर कुटूंबातील चार निरागस चेहरे दिसत होते जे आपल्या येण्याकडे डोळे लावून होते. विचार करून डोकं ठणकायला लागले होते. नंतर आपण बाबांच्या समोर बसून साई स्तुती वाचू लागलो पण डोळ्यात तराळणाऱ्या पाण्यामुळे अक्षरे दिसेणाशी झाली होती. आणि नंतर आपण साई जप सुरू केला. जप करता करताच झोप लागली होती. सारं काही आठवले. अपराधीपणाची भावना मनात घर करून राहीली.
राजाराम आपली पावले अंगात त्राण नसून पण जोर जोरात टाकत होता. एव्हाना ७ वाजत आले होते. शेवटची वस्तीची एस टी बस तरी मिळेल या आशेवर चालत होता. पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. प्रसादाची केळी होती पण ती खायचे धाडस त्याला झाले नाही. वरच्या खिशात मोजून ३४ रूपये होते. ते ही खर्च करायची इच्छा राहीली नव्हती. राजाराम एस टी स्टँडला पोचला तेव्हा वस्तीची बस निघून गेली होती. आज त्याच्या नशीबात निराशेशिवाय काहीच आले नव्हते. तो स्टँडच्या बाहेर आला , समोरून बाईकवरून शेजारच्या गावातील बाबी येताना दिसला. डबलसीट होता. पण बाबीने बाईक थांबवून त्याला मागे बसवले. राजाराम तेवढेच बरे वाटले. थोडे अंतर गेले असेल आणि बाबीला एक फोन आला तशी त्याने बाईक बाजुला थांबवली. फोनवरील संभाषण संपल्यावर बाबी राजाराम जवळ आला आणि बोलला.
" राजा, तुझ्या नशीबात चलतच येवचा लिवला हा रे, मुंबयची एक पार्टी आसा तेका सरपंचानी बाईकवरना हाडूक सांगल्यानी हा, तो पुढच्या नाक्यार थांबलो हा, आणि माझ्या मागे बसलो हा तेका चलत येवक सांगान तर तो राती मुंबयक जावचो हा , मुंबयच्या पार्टीक माका जातीन लक्ष घालून हाडूक सांगल्यानी हा रे, नायतर तुका उतराक सांगलय नसतय, वायट वाटान घेव नको, राजा माका माफ कर "
राजाराम नुसती मान हलवून चालू लागला.
" अरे बाबा, पुढच्या नाक्या परयात बस" बाबी बोलला.
पुढच्या नाक्यावर एक व्यक्ती उभी होतीच. बाईक वरून तीसरा माणूस त्याच्यासाठी उतरताना बघून त्या व्यक्तीलाही वाईट वाटले. जवळ जवळ अंधार पडला होता. राजाराम काही न बोलता चालत सुटला. बाईक जेव्हा राजारामच्या पुढे गेली तेव्हा मागे बसलेली व्यक्ती मागे वळून वळून बघत होती. पण राजाराम मान खाली घालून चालत राहीला. पुढे एका दुकानावर राजारामने पाणी प्यायला. रिकामी पोटी प्यायलेले पाणी पोटात चांगलेच झोंबले. पण थोडी तरतरी आली होती. राजाराम चालत असलेला रस्ता लॉंगकट होता. शॉर्टकटच्या रस्त्याने जायचे म्हटले तर विजेरी लागणार होती. या लॉंगकटच्या रस्त्याने घरी पोचायला दिड तास तरी लागणार होता.
***********************
शोधायला गेलेली माणसे राजारामला मोठ्या घाटीलाच मिळाली. राजारामची अवस्था बघून कोणीच काही बोलले नाही. राजाराम कुंपणाचा दरवाजा उघडून आत आला तेव्हा , त्याची बायको, दोन मुलं आणि आई पडवीत उभी राहून त्याचीच वाट बघत होती. राजाराम घरी आल्या आल्या दोन्ही मुलांनी त्याच्या पायाला मिठी मारली. पण त्यावेळी राजारामचा पडलेला चेहरा पाहून कोणी काहीच बोलले नाही. त्याच्या हातातली रिकामी पिशवी बरेचं काही सांगून गेली होती. पोर जाऊन एका कोपऱ्यात उभी राहीली. आईने डोक्यावरून हात फिरवताच राजारामचा बांध फुटला. लहान मुलासारखा मुसमुसू लागला. वाट बघत असलेल्या आपल्या कुटूंबासाठी आपण काहीच करू शकलो नाही याची सल त्याला सलत होती. पोरांचे निराश चेहरे त्याला बघवत नव्हते. त्यांच्या डोळ्यातील आशा कधीच मावळली होती. मुलांना बाप आल्याचा आनंद होताच पण त्याहून जास्त दुख: त्याचे रडणे पाहून होत होते. त्याच्या बायकोला आपला नवरा सुखरूप घरी आला यातच भरून पावले होते. तो रडताना पाहून तिलाही भरून आले होतेच पण तिला कमजोर होऊन चालणार नव्हते. तर त्याच्या पाठीशी खंबीर राहायची वेळ होती. त्याला उशीर होण्यामागचे कारण न विचारता त्याच्यासाठी आंघोळीला गरम पाणी काढले. थोड्या वेळात राजारामने स्वताला सावरले आणि न्हानीघरात गेला.
***********************
आंघोळ करून राजाराम साईंसमोर बसला असतानाच बाहेर बारक्या आल्याचे समजले. तो बाहेर पडवीत आला.
"राजाकाका खय हूतास तुम्ही? आता पयल्याआवाटातलो शिरगो माका बोललो की, तुम्ही साडेआठाक घराक इलास, तुम्ही तर दुपारीच निघालास ना?" बारक्या असे बोलल्यावर राजाराम काय बोलणार होता. पण बायको, आई मुलं , या सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हे बघून त्याने सगळा वृत्तांत कथन केला. हे ऐकताना माऊली मात्र पार गलबलून गेली. डोळ्याला पदर लावत घरात गेली. बारक्या आणि सोबत आलेला त्याचा मोठा भाऊही चकीत झाले. त्यांनी सोबत आणलेले काही किराणा सामान राजारामच्या स्वाधीन केले.
" राजाकाका नाय म्हना नको, आमच्या कडना थोडीशी मदत म्हनान ठेव, दुपारी जा झाला ता लय वायट झाला, जेणी कोणी तुझे पैसे मारल्यान तेका ते पचाचे नाय" बारक्याच्या मोठा भाऊ बोलला.
एवढ्यात चहा घेऊन त्याची बायको बाहेर आली. चहापावडर नसलेला चहा त्या दोन भावाना देताना मात्र माऊलीला लाज वाटली. चहापावडर नसल्यामुळे धने आणि साखर टाकून चहा बनवला होता. चहा पिऊन झाला तसा बारक्या सामानाची पिशवी घरात ठेऊन आला. राजारामचा निरोप घेऊन दोघे निघाले.
राजारामने पिशवीत ठेवलेली प्रसादाची चार केळी चौघांना दिली. त्याला काहीच उरले हे लक्षात आल्यावर चौघांनीही आपल्या जवळची केळी पुढे केली. हे खरं प्रेम होतं जे राजाराम अनुभवत होता.
बाबांचा हात परत एकदा मदत करून गेला होता. छोटी का होईना मदत ही मदत असते, ज्याला मिळते त्याला ती फार मोलाची असते. त्यामुळेच तर रात्री राजारामचे कुटूंब सुखाचे चार घास खावू शकले. राजारामला शरीर थकून पण झोप लागत नव्हती. माऊलीचा हात डोक्यावरून फिरताना त्याला खुप बरे वाटत होते. आजचे झालेले नुकसान कसे भरून काढायचे याचाच विचार करत राजाराम झोपी गेला.
***********************
दुसऱ्या दिवशी राजाराम लवकर उठून नव्या उमेदीने कामाला लागला . पुजा वगैरे आटपून काजू काढायला जाणार होता इतक्यात बाहेरून कोणीतरी हाक मारली. बाहेर येऊन बघतो तर शेजारच्या गावातील बाबी आणि ज्या व्यक्ती मुळे बाईकवरून उतरायला लागले होते ती व्यक्ती अंगणात उभे होते. त्यांना आत बोलवले.
" राजा हे विक्रांत सुखठणकर. मुंबैयत आसतत, काल हेंच्यामुळा तुका बाईकवरना उतराचा लागला. त्या आधी घडलेली घटना पण आमका समाजली हा. आमका सगळ्यांका लय वाईट वाटला. झालेला होवन गेला, तेचो इचार नको करू, विक्रांत भाऊंका तुका भेटाचा हूता म्हणान
आता इलाव" बाबीने आपली हळहळ व्यक्त केली.
माऊलीने दिलेला चहा घेता विक्रांत बोलू लागले.
" राजाभाऊ काल तुम्हाला बाईक वरून उतरवून स्वत: बसताना मला खुप वाईट वाटत होते. पण माझं कामही खुप महत्वाचे होते. सरपंचांसोबत चिरेखाणीमध्ये पार्टनरशिप संदर्भात काल रात्री मिटींग होती. त्यासाठी अजून चार जण इच्छूक होते. पण शेवटी मला भागीदारी मिळाली. मी वेळेत गेलो नसतो तर कदाचित मला भागीदारीला मुकावे लागले असते. हे सर्व तुमच्यामुळे शक्या झाले असे मी समजतो आणि माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी मदत देऊ इच्छीतो, कृपया नाही बोलू नका, काल तुमच्या बाबतीत जे काही घडले ते मला कळलेय, ते खूप वाईट होते, तुमचे किती नुकसान झाले ते माहित नाही मला पण थोडा हातभार तरी लावू शकेन असं वाटते."
" ह्याची काय गरज नाय हूती ओ, झाला ता झाला" असे बोलून राजाराम ते पैशाचे पाकीट परत देऊ लागला. पण विक्रांत माघार घेणारे नव्हते. त्यानी ते पाकीट घरात जाऊन देवासमोर ठेवले. त्या मागोमाग राजारामही आत गेला. साईबाबासमोर ठेवलेले पैशाचे पाकीट उचलायचे धाडस मात्र त्याला होईना. गेलेली लक्ष्मी परत एकदा देव्हाऱ्यात परतली होती. बाबानी न मागताही त्याला कृतार्थ केले होते. बाबांकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य मनाला सुखावत होते.
◆◆◆◆◆◆◆
शब्दांकण - नितीन राणे
सातरल - कणकवली
९००४६०२७६८

No comments:

Post a Comment