Sunday, 28 January 2018

गवळदेव


गवळदेव
कोकणात भात कापून झाले की गवळदेवाचे वेध लागतात. थोडक्यात गावातील स्नेहभोजन कींवा स्नेहसंमेलनही म्हणता येईल. येथे वाद्यवृंद नसतो. तसंच ध्वनिप्रदूषणाची भीतीही नसते. ज्याचा आवाज पहाडी तो सरस ठरतो. जंगलात वावरायचं, तर जंगली प्राण्यांशी वैर पत्करून कसं चालेल? त्यातही जंगलाच्या राजाला विसरणं शक्यच नाही. सह्याद्रीत वाघाचा मुक्तसंचार आहेच. अशा वेळी जंगलात वावरताना वाघानं आपल्याला अभय द्यावं, गाई-वासरांना बिथरवू नये म्हणून वाघाला आनंदी ठेवण्यासाठी एक सोहळाच साजरा होतो. सह्याद्रीत गुराखी मंडळी आता कमी झाली. पण पूर्वी माळावर गुराख्यांचे थवेच असायचे. गाई-वासरांची झुंबड असायची. भजन, पूजन, कीर्तन असं सारं चालायचं. या गुराख्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम वर्षातून एकदा होतोच. वाघाचं स्मरण करत का होईना, गवळय़ांच्या देवाला गुराखी साकडं घालतात. गवळदेव म्हणजे गुराख्यांचा देव. रानातला देव. कृष्णानं गुरं राखताना आपल्या सवंगडय़ांना शिकवलेला उत्सव आजही मोठय़ा श्रद्धेनं साजरा होतो.
मला आठवते , आमच्याकडे पण गवळदेव साजरा होतो. आदल्या दिवशी वर्गणी काढली जाते. दुसऱ्या दिवशी सगळे जण गवळदेवाच्या ठिकाणी जमले जातात. गवळदेवाच्या स्थानाची साफसफाई केली जाते. तुळशी वृंदावनाची मातीने डागडूजी केली जाते. वाघोबा तयार केला जातो. मग जेवनासाठी लाकडे गोळा करण्याचे काम लहान मुलांवर असते. तोपर्यंत मोठ्या माणसानी चुली बनवलेल्या असतात. बाजाराला गेलेला माणूस पण येतो. प्रत्येक घरातून जमा झालेले विविध प्रकारचे तांदूळ धुवून भल्या मोठ्या टोपात भाताचे आदन ठेवले जाते. असे हे भात करणारे लोक निवडक असतात. कोणालाही मोठ्या प्रमाणावर भात करणे जमेलच असे नाही. काहीश्या दमट लाकडांमुळे चुलीतली आग पेटत नसायची. मग आम्ही पुठ्ठयाने हवा घालून आग पेटवत असू. धुराने भरलेले वातावरण चैतन्यमय असायचे. भात शिजत ठेवला की इतर कामे केली जातात. बटाटा कींवा ताज्या भोपळ्याची भाजी हमखास केली जाते. रानातल्या वरणाची चव घरच्या वरणापेक्षा वरचढच असते. ठरलेल्या मेनूत वडेही असतातच. हे वडे म्हणजे खास गवळदेवाचे. ते कधी फुगत नाहीत आणि चावूनही तुटत नाहीत. वनराईत जेवण तयार होत असताना येणारा खमंग दरवळ, हा कोणत्याही स्वयंपाकगृहातील दरवळापेक्षाही हवाहवासा वाटणारा असतो. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे सोलकढी पिण्यासाठी आम्ही खोबरे किसून झालेया करवंट्या पळवत असू. कधी खोबरे कीसून होते आणि करवंटी टाकली जाते हे आम्ही बघतच असायचो. जेवन तयार झाले की जेवायचे वेध लागतात .जेवणाच्या पंक्ती कधी बसतात याच्याकडे डोळे लागलेले असायचे.
मग गवळदेवाची पुजा सुरू होते. सगळ्या गुराढोरांना सुखी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी गवळदेवाला साकडे घातले जाते. प्रत्येक देवाच्या नावानं वाडी काढली जाते. वाघोबाला पण वेगळी वाडी (नैवेद्ध) काढली जातो. भोजनासाठी पत्रावळी या रानातल्या पानापासून तयार केलेल्या असतात. यात कुडा, चांदवड, करंजाई या वृक्ष्यांची पान वापरून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण असतात. काही जण केळीची पाने किंवा चवईची पाने पण घेवून येतात.
जंगलातच सावलीच्या आश्रयानं मग बैठका बसतात. जेवणाच्या प्रारंभी श्लोक सुरू होतात. अस्सल ग्रामीण ढंगातले श्लोक हे रानातच ऐकायला हवेत. जेवन होत आले की हा कार्यक्रम थांबवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्ती ‘हरिच्या घरी’ म्हणतात. मग श्लोक थांबतात.
जेवल्यानंतर कार्यक्रम सुरू होतो, तो सकाळी पुजलेल्या वाघाची हकालपट्टी करण्याचा.. वाघ कोण होणार यापासून ते वाघाला जेरीस कसं आणायचं याचे आडाखे बांधले जातात. वाघाच्या नावानं ठेवलेली वाडी आणि त्याशेजारी ठेवला गेलेला नारळ आणि नारळाच्या खाली लपवलेले ‘रुपये’ वाघोबा होण्यास इच्छुक असलेल्याला साद घालत असतात. वाघोबा झाल्यामुळे नारळ, पैसे मिळणार असले, तरी त्या बदल्यात मारही भरपूर खावा लागतो. हा मार ज्यानं चुकवला तो विजेता ठरतो.
वाघोबा होण्यास इच्छुक असणारी मंडळी मग जागेचा आणि आपल्या गतीचा अंदाज घेतात. प्रतिस्पर्धी काय करू शकेल याचा आडाखा मांडतात. ‘वाघ रे वाघ’चा खेळ सुरू होतो. गवळदेव आणि मातीच्या केलेल्या वाघाभोवती पाच प्रदक्षिणा मारायच्या. वाघ पुढे, त्याला हाकवणारे त्याच्या मागे. यानंतर पाचव्या फेरीत वाघोबा बनलेल्या व्यक्तीनं धाव घ्यायची आणि कुठलंही पाण्याचे ठीकाण गाठायचं. त्याला पाण्याच्या ठीकाणापासून रोखण्यास ग्रामस्थ अटकाव करतात. जोपर्यंत पाण्यापर्यंत हा वाघोबा पोहोचत नाही, तोपर्यंत त्याच्यावर शेणाचा मारा केला जातो. एकदा का वाघोबा झालेल्या व्यक्तीचे पाय पाण्याला लागले, की मारा थांबतो, अशी ही प्रथा आहे.
प्रथेप्रमाणे खेळ सुरू होतो. शेणाचे गोळे तयार केले जातात. वाघोबाला मारण्यासाठी पाच-दहा टोपल्या शेण आणलेलं असतं. वाघोबा झालेला माणूस गोलगोल फिरू लागतो. पाचव्या प्रदक्षिणेकडे साऱ्यांचंच लक्ष असते. वाघ बनलेल्याने कधी कुणाची कळ काढली असेल, तर त्याचा वचपा काढण्यासाठी ही नामी संधी असते. अशा वेळी काही जण हातातील शेणगोळय़ात दगड घालतात. हे शेणगोळे चुकवत वाघोबा बनलेला सैरावैरा पळू लागतो. एकच गलका सुरू होतो. ‘वाघ रे वाघ ऽऽ’ या शब्दाबरोबर ‘धरा-मारा’चे हाकारे-कुकारे सुरू होतात. सारं जंगल दणाणून जातं. जणू काही प्रत्यक्ष वाघच आला आहे, असं वाटावं. शेणगोळय़ांचा अक्षरश: वर्षाव केला जातो. नदीजवळ पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अनेक जण वाघाच्या आडवे येतात.
वाघ बनलेल्यालाही शेणगोळे फेकणा-यांना कसं चकवायचं, हे माहीत असतं. मधूनच तो विरुद्ध दिशेनं पळ काढतो. गर्द वनराईत तो लपूनही बसतो. मग कुणीतरी वाघच गायब झाल्याचं सांगतो आणि रान काढणं सुरू होतं. हे रान काढणंही फारच मजेशीर असतं. एखादा उंच झाडावर चढून सभोवतालचा अंदाज घेतो. कुठची डहाळी हलते का? कुठून आवाज येतो का? हे पाहिलं जातं. यात जर वाघाची बैठक समजली, तर सारे जण त्याच्या दिशेनं शेणाचा मारा करतात. नाही तर प्रत्येक झाडीत शेण मारत मंडळी पुढे रवाना होतात. याच वेळी वाघोबा वा-याच्या वेगानं पाणवठय़ावर पोहोचतो. तासभर चालणारा हा खेळ थरारक, पण तितकाच गमतीशीरही असतो. एकदा का वाघ पाण्यात पोहोचला, की मग सारं शांत होतं. सारे जण पाणवठय़ावर गोळा होतात. हसत-खेळत अंघोळ करून सारे जण घरी परततात.
असं गुराख्यांचं हे कोणत्याही सूत्रसंचालनाशिवाय होणारं एक उत्स्फूर्त स्नेहसंमेलन. सध्या असे गवळदेव गावोगाव सुरू झाले आहेत. अलीकडे जंगलापर्यंत घरं वाढल्यानं गवळदेव वस्तीच्या जवळ आले. पूर्वी ते निर्जन भागात राहत असत. एक मात्र खरं, की गवळदेवाची मजा आणि निसर्गाचं सहभोजन घेण्याबरोबर पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा ही गावाचं गावपण टिकवून आहे. हा अनुभव जे-जे अनुभवतात, त्यांना पुढच्या गवळदेवाचे वेध लागल्याशिवाय राहत नाहीत.
नितीन राणे
संदर्भ - किशोर राणे ( वाघ रे वाघ )

No comments:

Post a Comment