Sunday, 28 January 2018

शेखू....


शेखू....
शरदचे अकाली जाणे संपूर्ण गावाला धक्का देवून गेल होतं. सगळ्यांशी प्रेमाने वागणारा , अगदी लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यानां हवाहवासा वाटणारा शरद तापाचे निमित्त होऊन गेला. मला फोन आला तसा गाडीत बसलो. गाडी बसल्या बसल्या विचार करू लागलो . असं शरदच्या बाबतीत का घडले असेल? कायम सगळ्यांची काळजी करणारा स्वताची काळजी घ्यायला विसरला असेल का? कॉलेज संपून एकच वर्ष झालं होतं. मी मुंबईला आलो आणि तो गावीच राहीला. जेव्हा तो पहील्यांदा शालीनीच्या प्रेमात पडला तिथ पासून ते अगदी परवा पर्यंत तीचे कौतूक सांगत होता. तिचे काय होईल आता? सगळेच अनाकलनीय होते. त्याच्या आठवणीने जीव व्याकूळ होत होता. जीवाभावचा मित्र गमावला होता मी.
सकाळी आठ वाजता घरी पोचलो. थोडावेळ बसून राहीलो. जाऊन काय करू? गेलेल्या मित्राचे कलेवर पाहू? पाहवेल का आपल्याला? शेवटी तसाच उठलो आणि शरदच्या घरी निघालो. वाटेत माझे बाबा भेटले. त्यांचा चेहरा बघून रडूच कोसळले मला. शरदचे बाबा आणि माझ्या बाबांची खास मैत्री होती. एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलो. दोघांच्या दूख:चा बांध एकाचवेळी फुटला होता. शरदच्या कुंटूंबाला आधार देणारे बाबा आता ओक्साबोक्शी रडत होते. माझीही तीच हालत होती. ढोल वाजला तसा दोघेही भानावर आलो. एकमेकांना सावरून शरदच्या घराकडे निघालो. रडणाऱ्यांचा आवाज ऐकून काळीज गलबलत होतं. अंगणात पाय ठेवणार इतक्यात शेखूने माझ्या अंगावर झेप घातली आणि मिठी मारली. त्याची मिठी मला अनपेक्षीत होती. अगदी माणसासारखा रडू लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रूंना थारा नव्हता. थोडावेळ त्याला तसेच राहू दिले. त्याचे सांत्वन करावे लागेल अशी तसूभरही कल्पना नव्हती. एरव्ही अनोळखी माणसांना शरदच्या घरी जाताना विचार करायला लागायचा. अनोळखी माणूस दिसले की शेखू भुंकायला लागून अंगावर जायचा पण आज तोच घायाळ झाला होता. रडून रडून डोळे पार लाल झाले होते. शेखूला बाबांकडे देऊन मी घरात गेलो. सगळीकडे रडारड चालू होती. कोणाचे सांत्वन करायचे. कोणीही धीर द्यायच्या मनस्थितीत नव्हते. शरदचे वळयमध्ये भींतीला टेकवून ठेवलेले कलेवर पाहून मला खुप गहीवरून आले. त्याचे आईबाबा तर शुद्धीवरच नव्हते. बहीन पायात डोकं घालून आपल्या अश्रुंना वाट करून देत होती. परत ढोल वाजला तसे लोक शरदला आंघोळीला घेवून जाऊ लागले तसा शेखू धावला. घेवून जाणाऱ्यांना मज्जाव करू लागला. शेवटी मी त्याला आवरले होते.
शेखू शरदचा जीव की प्राण होता. तालूक्याच्या ठीकाणी परीक्षा देवून येताना जखमी अवस्थेत पडलेले कुत्र्याचे पिल्लू पाहून शरदचे मन द्रवले. कपड्यांची पर्वा न करता एस टी प्रवास करून घरी घेवून आला होता. त्याची मलमपट्टी करून बरे केले होते. शेखूला खायला दिल्याशिवाय स्वत: काहीच खात नसे. आणि शेखू पण शरद आल्याशिवाय अन्नाला शिवत नसे. शरद मुंबईला न येण्याचे कारण शेखूच असावा. पण तो न येण्याचे कारण सांगत नव्हता.
शरदला स्मशानात नेताना शेखूची हालत खुप बेकार झाली . कधी नव्हे त्या साखळीत अडकवलेला शेखू रडून हतबल झाला. जोरजोरात विव्हळू लागला. त्याचे ते विव्हळणे आजही माझ्या कानात गुंजत असते. मलाही त्याला असे बांधून ठेवने पटले नाही. पण सावधानता म्हणुन तसे करावे लागले. आईबाबा असल्यामुळे मला स्मशानात जायला प्रतिबंध होता. जिवलगाचे शेवटचे दर्शन घेवून स्मशान दिसेल अशा ठीकाणी उभा राहीलो. स्मशानतल्या विधी पाहायची वेळ माझ्यावर पहील्यांदाच आली होती. शरदचे शव सरणावर ठेवून त्यावर लाकडे ठेवताना पाहून मला हूंदका आवरला नाही. मनात आलं ओरडून सांगाव सगळ्यांना, अरे त्याला लागेल. पण लोक मात्र तटस्थपणे त्यांचे काम करत होते. जेव्हा आपला जिवलग जातो तेव्हाच काय तो माणूस ह्या गोष्टी पर्सनली घेतो. अनथ्या सगळे निर्विकारपणे पार पाडले जाते.
अग्नी देताना शरदचे बाबा अक्षरक्ष कापत होते. सरणाने पेट घेतला होता. शरद जळू लागला तसे म़ाझ्या मनाला चटके बसू लागले. मला ते चित्र पाहवेना. घरचा रस्ता पकडणार इतक्यात लांबून शेखू धावत येताना दिसला. त्याची मान रक्तबंबाळ
झाली होती. गळ्यात साखळी लोंबत होती . लोकानी अडवण्याचा खुप प्रयत्न केले. पण त्याने या वेळी सगळ्यांना चुकवले. धावत आला तसाच स्मशानात घुसला. तिथे चार पाच लोक होते. ते सरणावर मीठ मारत असताना शेखूने भडकलेल्या सरणात उडी घेतली. अरे देवा काय झाले हे. काळजाचे पाणी करणारी घटना आम्ही पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही. बाबी काकानी त्याला लाकडाने बाहेर ढकलण्याचा असफल प्रयत्न केला. पण मधोमध जळणाऱ्या शेखूचे रडणे भडकलेल्या आगीत विरत गेले. अखेर आपल्या धन्यासोबत जाण्याचे भाग्य शेखूलाच मिळाले .
नितीन राणे.

No comments:

Post a Comment