Sunday, 28 January 2018

दिवस आठवणीतले...




मला आठवते आम्ही आठवी पासून कणकवलीला एस.एम हायस्कुल जाऊ लागलो. सातवीपर्यंत उनाडकी करून घालवलेला दिवस आठवीत गेल्यापासून संपता संपायचा नाही. मुलं नवीन , सर नवीन, बसायला बेंच.. सार काही न पाहीलेले. तालुक्याच्या ठीकाणी जायचे म्हटले की एस टी बसने जावे लागायचे. तीच काय ती मजा. शाळा सकाळी ११ ते ५ ह्या वेळेत असायची. शाळा सुटली रे सुटली की इन शर्ट आउट करून एस टी स्टँडकडे पळायचो. आमच्या गावात जाणारी वस्तीची गाडी ६.३० ला असायची. तो पर्यंत धीर धरवत नसायचा . तेव्हा एस एम हायसकुल ते एस.टी.स्टँड १० मिनटात गाठायची सवयच लागली होती. कणकवलीहून संध्याकाळी ५ ते ५.१५ दरम्यान तीन बस सुटायच्या. एक कुडाळ, दुसरी ओरोस मुख्यालय आणि तिसरी डांगमोडे.. आम्ही मिळेल बस पकडून वागदे स्टॉप जो मुंबई गोवा हायवेला आहे तिथे उतरायचो. तिथून आमचा गाव जेमतेम २ किमी अंतरावर आहे. तेही अंतर १० मिनटात पार करून घरी ५.३५ ला पोहचायचो. पाठीवरचे दफ्तर घरी ठेवून लगेच गाळवात (शेतीचे सपाट वाफे) यायचो. झुडपातले बांबूचे स्टंप आणि वडाच्या पारंबीच्या बँट्स काढल्या जायच्या. कोणाच्या तरी पाठीमागे नंबर पाडून नंबर नुसार बँटींग केली जायची. सिक्सरच्या जागा ठरलेल्या असायच्या. खेळायला ७ ते ८ जण असायचो. आमच्याकडे नोंदवही असायची त्या वहीत कोणी कीती सिक्सर मारले आणि कोणी कीती बोल्ड काढले याची नोंद व्हायची. आमच्या या ग्राउंडवर समोरची जागा मोकळी असली तरी स्वीप शॉटला जागा नव्हती. आणि माझा स्वीप शॉट फेवरेट होता. बॉल हरवला की सगळ्यात जास्त शिव्या मला पडायच्या. बँटींग करणाऱ्यासकट सगळे बॉल शोधायला लागायचे. सराईच्या दिवसात वाढलेल्या गवतामुळे बॉल सहजा सहजी मिळत नसायचा. बॉल शोधण्यात वाया गेलेल्या वेळेअभावी कधी कधी शेवटच्या नंबरला बँटींग मिळत नसे. आजही आठवते आम्ही १० रूपये प्राईज पासून मँचेस घेतलेल्या होत्या. आजही जुने मित्र जमलो की ह्या आठवणी निघतात. तेव्हा वाटायचे आपण लवकर मोठे व्हायला हवं. म्हणजे अभ्यास करायला नको. पण आता मोठे झाल्यावर बालपण हवेहवेसे वाटते. पण माझ्यामते आपण लहानपणी मोठ्यांसारखे नाही जगू शकत पण आता लहान होवून नक्कीच जगू शकतो.
मुलं होवून जगा..हसा आणि हसवत राहा..आनंद नक्कीच तुमचा..
नितीन राणे..( कणकवली )

No comments:

Post a Comment