Sunday, 28 January 2018

चुल




चुल बघीतली की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. थंडी असो वा कोणताही ऋतु , सकाळी अंथरूणातून उठून पहीले कुठे जात असू तर चुलीकडे. आई भाकरी करत असेल तर , भाकरी थापण्याचा आवाज, घावणे करत असेल तर एक वेगळाच आवाज. हा आवाज येणे कधी बंद नाही झाले. अविरतपणे चालूच राहीला. आज 'किचन' मध्ये मात्र ती गंमत येत नाही. आग पेटवायला तेवढा वेळ लागत नाही. मला आठवते आम्ही भावंडे बाबांसोबत बसून धगाचा आनंद घेत असू. मी तर मोक्याची जागा पकडण्यासाठी लवकर उठायचो. पण अगोदर बाबाच चुलीजवळ बसलेले असायचे. आईच्या चार पाच भाकऱ्या झालेल्या असायच्या. वायलावर पाणी गरम असायचे. चुल स्वच्छ झाडलेली असायची. सणासुदीला तर चुलीला गिलावा (कलर) दिला जायचा. त्या गिलाव्याचा गंध अजूनही आठवतो. चुलीच्या बाजूला लाकडांचा ढिग आणि त्यावर बसलेली मांजरे मी चुलीकडे गेलो की धावत येवून टूरटूरत मांडीवर बसायची. चुली जवळची फुकणी आग रूसली की फुंकर घालून रूसलेल्या आगीला हसवायची. पाटणावरच्या काडेपेटेची जागा कधी कोणी घेतली नाही. चुलीची एका बाजूची खोलगट चौकोनी जागा पक्की असायची. चुलीवरचा उतव पण कधी मातला नाही.
चुलीवरच्या जेवनाची चव काही औरच असायची. आजही चुलीबरोबर केलेल्या गोष्टी आठवल्या की परत गावी जावेसे वाटते. चुलीत भाजलेली सुखी मच्छी, करपूस भाजलेले.कोंबडीचे पाय किंवा आईने मुंबरात भाजलेले वाटनासाठी असलेले कांदा खोबरे असेल. खोकला झाला असेल तर कोरफडीची पात याच चुलीच्या मुंबरात भाजली गेलीय. धुप जाळण्यासाठी निखारे चुलीनेच दिलेत. म्हणूनच चुलीला आजही आपल्याकडे देवतेचा दर्जा आहे. आजही चुलीला पाय लागला तर नमस्कार केला जातो. सणासुदीला पुजा करून नैवेद्य दाखवला जातो. आज लोक परत जुण्याकडे वळली आहेत . चुलीवरच्या जेवनाचा आग्रह धरू लागलीत. नव्या गोष्टी आपल्याशा करताना जुन्याना विसरता कामा नये. काळासोबत चालण्याच्या नादात कुठेतरी खरे जगणे विसरले जातेय.
नितीन राणे...

होडीचा साना



दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गावी जाणे झाले. कोकणरेल्वेचे Timetable पावसामुळे पार कोलमडुन गेलेले. गाडी कणकवली स्टेशनमधे शिरत होती. माझी बँग घेवन मी दरवाज्यात तयार होतो. मी एकटा असल्यामुळे फारसे सामान सोबत घेतले नव्हते. माझ्या मागे एक माणूस उतरायला घाई करत होता. त्याच्या सोबत त्याची बायको आणि दोन मूलं होती. शिवाय सामान वेगळेच. त्यांच्या हातातली एक जड बँग घेवून मी उतरलो. त्यांच्याकडचे बाकीचे सामान बघून मी त्यांची बँग स्टेशनबाहेर वाहून न्यायचे ठरवले. रिक्षा स्टँडकडे सोडून मी बसच्या लाईनमध्ये उभा राहीलो. नेमकी त्याच दिवशी सगळीकडे पुरग्रस्त परीस्थिती होती. त्या माणसाला रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ चार पाच रिक्षावाल्यांसोबत Bargaining करून सुद्धा कोणी रू २५० पेक्षा खाली येत नव्हते. आणि माझ्या मते १०० भाडे ठीक होते. फक्त ५ ते ६ किमी अंतर होते. शेवटी त्या माणसाचा फँमिली असल्यामुळे नाविलाज झाला आणि ते ती रीक्षा पकडून निघून गेले. 
मी ही बस पकडून S T स्टँडला आलो. मस्त नाष्टा करून आचरा बस पकडली. मला वरवडेला उतरून सातरल या माझ्या गावी जायचे होते. पण रोजचा मार्ग पुरामुळे बंद असल्यामुळे दूरच्या मार्गाने जावं लागत होतं. पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे खिडकी बंद केली. खिडकीतून दिसणारा नजारा तर कोकण खुप सुंदर आहे अस वाटत होत पण थोड्यावेळापूर्वीचा प्रसंग आठवल्यावर कोकणी माणसाने असे वागू नये असे वाटत होते. जेणेकरून कोकणी माणसाच्या "काळजात भरलेली शहाळी" नासकी निघावी. 
सगळीकडे अस चालत अस नाही. पण कोणा एकामुळे सगळ्यांकडे संशयाने पाहीले जाते. माझा स्टॉप आला तसा मी उतरलो आणि नदीच्या दिशेने चालायला लागलो. होडी चालू असूदे अशी प्रार्थना करुन वाट धरली होती. पाऊस तर रपरप पडत होता. गणपतीचा दिवस असल्यामुळे प्रत्येक घरात लगबग चालू होती. काही वेळातच मी नदीच्या सान्यावर पोहोचलो. अगोदरच तीथे गर्दी झाली होती. २० ते २५ माणसे पलीकडे जायला उभी होती. नदीचे पाणी पार वरपर्यंत आले होते. ती एक अशी जागा होती की, तिथे पाणी संथ होते. पाणी थोडेफार प्रवाही होते पण होडीवाले "तारी काका" ते आव्हान लिलया पेलायचे. त्यांची एक नदीच्या तीरावर खुणा होती. त्या खुणेला पाणी लागले की होडी पाण्यात घालत नसत. आज अजून तीथे पाणी लागले नव्हते. 
तिथे पण मला वाट पाहावी लागणार होती. एका वेळेस होडीतून आठ जनांना जाता येत होतं. थोडा पुढे गेलो तसा ती मघाशी भेटलेली फँमिली पण होडीसाठी उभी होती. निव्वळ योगायोग. त्यानी पण मला ओळखले. ते कासरल या गावी जाणार होते. सातरल आणि कासरल हे गाव नदीकीनारी बाजूबाजूला वसलेले होते पण बरीच वर्षे मी मुंबईस्थित असल्यामुळे काहींना ओळखता येत नव्हते. शेवटी आमचा नंबर आला. होडीतून जायची मजा काय औरच होती. गढूळ पाण्याचा प्रवाह जरी संथ असला तरी उरात धडकी भरवत होता. आमच्या दिशेने पाण्याबरोबर वाहून येणारा छोटासा ओंडका होडीवाल्या काकानी मोठ्या कौशल्याने चुकवला. पाच मिनटात पैलतीरी पोचलो. 
"कीती झाले" माझा प्रश्न.
"अडीज रुपये देवा" होडीवाल्याकाकांचे चार्जेस ऐकून मी अवाक झालो, सोबत असलेली फँमिली पण.
"लवकर देवा ओ, तकडे लोका खोळांबली हत" त्याच्या बोलण्याने भानावर आलो. मी सरळ २० रूपयाची नोट त्याना दिली. परत द्यायला त्यानी पिशवीत हात घातला. मी त्यांचा तशाच धरून राहूदे बोललो. सोबतच्या माणसांनी देउ केलेले अधिकचे पैसे पण सुरूवातीला घेत नव्हते. शेवटी लोकांच्या आग्रहापोटी ते घेवून संतुष्ट होवून गेले.
हा माणूस आणि संधीचा फायदा घेवून लूटणारी माणसे यापैकी कोणाच्या काळजात शहाळी भरली आहेत? या माणसाला संधी नव्हती का? गरज नव्हती का? संसार नव्हता का? सगळे काही होत पण अशा माणसांची मन शहाळ्याच्या पाण्यासारखी स्वच्छ आणि नितळ होती . अशांना उद्याची चिंता नसते. त्यांना फक्त परमेश्वराला काय उत्तर द्यायचे याची चिंता असते.
नितिन राणे...

घर घर की राणी...


हातात चार पिशव्या घेवून येणाऱ्या राघवकडे बघून त्याला विचारले
"काय रे एकटाच का? भार्या कुठेय?
"अरे, वाटेत साड्यांचा सेल लागलेला बघून अर्ध्या वाटेतच रिक्षेतून उतरलीय" कपाळावरच्या आठ्या तशाच ठेवत राघव बोलला.
माझं लग्न अजून झालं नाही म्हणून देवाचे आभार मानले.
"मॉल मध्ये पाच तास खरेदी करून आलोय, तरी हीचे मन भरले नाहीय." असे बोलून राघव सोसायटी गेट समोरच बसला.
आणि पुढे सांगू लागला बायकोसोबत मॉल मध्ये जाणे म्हणजे स्वताहून आपल्या पायाची वाट लावून घेणे. सुरूवातीला पुरा मॉल फिरतील. का तर कुठे नवीन दुकान सुरू झालय का? कुठे डीस्काउंटची पाटी लागलीय का? अगदीच नाहीतर कुठेतरी उभे राहून आकडी आल्यासारख्या करतील आणि नॉर्मल चेहरा न ठेवता सेल्फी काढतील. सोलो सेल्फी झाला की नवरोबाची पाळी. त्याने पण मग आकडी आल्यासारखे उभे राहूनच बायको करील तसेच (अगदी तसेच हा) चेहरा करावा लागतो. सोबत मुलं असतील तर जरा जास्तीचा वेळ विचारात घ्यावा. हे सर्व करून होईपर्यंत १ तास कसाच झालेला असतो. मग एखाद्या स्टोअर मध्ये जाण्याआधी बँगेज काउंटरला १५ गेलीच समजा. सोबत येताना एखादा मँचींगसाठी ड्रेस आणलेला असतो त्याचा गेटपास बनविण्यात वेळ गेलेला असतो दरम्यान हे आटपेस्तोवर कुठेतरी बसणार इतक्यात भार्याची हाक कानावर पडलेली असते.
स्टोअर आत शिरल्यावर थंडगार झुळूक छान वाटते पण तो थंडपणा काही काळच टिकतो. बायकोच्या मागे मागे करून डोकं भर एसी मध्ये पण गरम होते. तासभर सगळे पारखण्यात जातो. आणि एखादा पसंद पडलाच तर त्यामध्ये हवी साईज नसते. साईज मिळाली तर कलर नसतो. मग सगळा लवाजमा दुसरीकडे वळतो. प्रत्येक ठिकाणी खरेदी न करण्याची कारणे ऐकून थक्क व्हायला होते.
किमान दोन ते तीन तास फिरल्यावर एक काहीतरी पसंत पडते. अगदी कलर, साईज आणि पँटर्ण पण , फक्त घालून बघायचे बाकी असते.
"मी अजून काहीतरी मिळते का बघते, तुम्ही ट्रायल रूम जवळ लाईन लावा." एवढ्या सगळ्या वेळात नेमके हेच सांगताना आपला लक्ष मोबाईल कींवा दुसरीकडे असतो.
"अहो, मी काय सांगतेय? "
"काय?" आपण पुरते गोंधळलेलो असतो.
सगळे परत चिडत चिडत सांगीतले जाते. हातात रिकामे बास्केट घेवून (नवीन स्टोअर असेल तर) नवरोबा ट्रायल रूम शोधायला लागतो. बास्केट जेव्हा भरेल तेव्हा समजायचे खरेदी आटोक्यात आलीय. बर ही ट्रायल रूम पण सहजा सहजी सापडणारी गोष्ट नसते. सापडलीच तर लाईनमध्ये बायकांसोबत उभे राहणे थोडे वॉकवर्ड फील करणारे असते. पण तिथे समदुखी: दोन तीन नवरोबा बघून हायसे वाटते. बर ही ट्रायल रुमची लाईन कधी पुढे सरकेल ते आत गेलेल्या बायकांच्या स्पीडवर अवलंबून असते. नेमके त्याच दिवशी आपले पाय दुखू लागतात. तितक्यात बायको तीन चार प्रकारचे कपडे घेवून तिथे येते. आणि आपली थोड्या वेळासाठी सुटका होते. कुठे बसायला जागा मिळतेय का ते बघणार इतक्यात लाईनमधुनच आवाज येतो .
" माझा नंबर येईस्तोवर, तुम्हाला काय घ्यायचे असेल ते पटकण पाहून घ्या गडे"
गडेला मात्र टाईम लिमिट. मग काय ट्रायल रूम कडे लक्ष ठेवत बिचारा नवरोबा काय समोर दिसेल ते घेतो आणि वेळेच्या अगोदरच बरोबर ट्रायल रूम समोर उभा राहतो. इथे खरी कसोटी सुरू होते. बायकोचा नंबर लागलेला असतो. कपडे बदलून बाहेर येईपर्यंत नवरोबाला बॉसचा कॉल येतो. फोनवर बोलण्याच्या नादात हातवारे करून छान दिसतेस असा सांगण्याचा असफल प्रयत्न केला जातो. मला एक कळत नाही. कपडे स्वताला घालायचे असतात, रूममध्ये चांगले फुलसाईज आरसे असतात. पण नवरोबाचे मत हवेच कशाला? आणि मत मांडले तरी आपले तेच खरे होते. नवरोबा पण सावध प्रतिक्रीया देतो. खुप वेळा दिली जाणारी प्रतिक्रीया सकारात्मकच असते. चुकून कधी घातलेले कपडे छान दिसत नाही आहेत असे बोललात तर नेमके तेच पसंत केले जातात आणि खरेदी कमीत कमी वेळेत होते. खुप वेळा ही नकारात्मक प्रतिक्रीया कामी येते. पण रोष ओढवला जाउ शकतो. हे सगळे सुरळीत पार पडलेच तर पुढे जाउ शकतो. बिल चुकते होईपर्यंत खरेदी झाली असे ठरवता येत नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत खरेदी चालू असते. आणि आज तर हद्द झाली अर्ध्या वाटे रिक्षेतून उतरून खरेदी.
राघवचे हे पुराण मी अनेकांच्या तोंडून ऐकले होते. मी राघवला एवढेच बोललो, "ही तर घर घर की राणी है"...
नितीन राणे...

दिवस आठवणीतले...




मला आठवते आम्ही आठवी पासून कणकवलीला एस.एम हायस्कुल जाऊ लागलो. सातवीपर्यंत उनाडकी करून घालवलेला दिवस आठवीत गेल्यापासून संपता संपायचा नाही. मुलं नवीन , सर नवीन, बसायला बेंच.. सार काही न पाहीलेले. तालुक्याच्या ठीकाणी जायचे म्हटले की एस टी बसने जावे लागायचे. तीच काय ती मजा. शाळा सकाळी ११ ते ५ ह्या वेळेत असायची. शाळा सुटली रे सुटली की इन शर्ट आउट करून एस टी स्टँडकडे पळायचो. आमच्या गावात जाणारी वस्तीची गाडी ६.३० ला असायची. तो पर्यंत धीर धरवत नसायचा . तेव्हा एस एम हायसकुल ते एस.टी.स्टँड १० मिनटात गाठायची सवयच लागली होती. कणकवलीहून संध्याकाळी ५ ते ५.१५ दरम्यान तीन बस सुटायच्या. एक कुडाळ, दुसरी ओरोस मुख्यालय आणि तिसरी डांगमोडे.. आम्ही मिळेल बस पकडून वागदे स्टॉप जो मुंबई गोवा हायवेला आहे तिथे उतरायचो. तिथून आमचा गाव जेमतेम २ किमी अंतरावर आहे. तेही अंतर १० मिनटात पार करून घरी ५.३५ ला पोहचायचो. पाठीवरचे दफ्तर घरी ठेवून लगेच गाळवात (शेतीचे सपाट वाफे) यायचो. झुडपातले बांबूचे स्टंप आणि वडाच्या पारंबीच्या बँट्स काढल्या जायच्या. कोणाच्या तरी पाठीमागे नंबर पाडून नंबर नुसार बँटींग केली जायची. सिक्सरच्या जागा ठरलेल्या असायच्या. खेळायला ७ ते ८ जण असायचो. आमच्याकडे नोंदवही असायची त्या वहीत कोणी कीती सिक्सर मारले आणि कोणी कीती बोल्ड काढले याची नोंद व्हायची. आमच्या या ग्राउंडवर समोरची जागा मोकळी असली तरी स्वीप शॉटला जागा नव्हती. आणि माझा स्वीप शॉट फेवरेट होता. बॉल हरवला की सगळ्यात जास्त शिव्या मला पडायच्या. बँटींग करणाऱ्यासकट सगळे बॉल शोधायला लागायचे. सराईच्या दिवसात वाढलेल्या गवतामुळे बॉल सहजा सहजी मिळत नसायचा. बॉल शोधण्यात वाया गेलेल्या वेळेअभावी कधी कधी शेवटच्या नंबरला बँटींग मिळत नसे. आजही आठवते आम्ही १० रूपये प्राईज पासून मँचेस घेतलेल्या होत्या. आजही जुने मित्र जमलो की ह्या आठवणी निघतात. तेव्हा वाटायचे आपण लवकर मोठे व्हायला हवं. म्हणजे अभ्यास करायला नको. पण आता मोठे झाल्यावर बालपण हवेहवेसे वाटते. पण माझ्यामते आपण लहानपणी मोठ्यांसारखे नाही जगू शकत पण आता लहान होवून नक्कीच जगू शकतो.
मुलं होवून जगा..हसा आणि हसवत राहा..आनंद नक्कीच तुमचा..
नितीन राणे..( कणकवली )

वावडींग - एक औषधी वनस्पती

मी गावी शिकत असताना शेतीसोबत बरेच शेतीपूरक व्यवसाय केले आहेत.. वर्षभर चालणारा व्यवसाय म्हणजे टोपलीतून केळी विकणे. आमच्या बागेतील गावठी केळी हातोहात खपायची.काही मुले मला केळीवालाही बोलायची. अगदी एस टी बस पासून बाजारात बसून पण मी केळी विकली आहेत. आंब्या काजूच्या मोसमला आंबे काजू विकले आहेत. हे सगळे करताना मला कधीच लाज नाही वाटली. अजून एक सीजन असतो. साधारण भात कापणीच्या वेळेला त्रिफळे आणि इंगळा ( शुद्ध मराठीत वावडींग) यांचा मोसम असतो. त्रिफळा काठीच्या साहाय्याने काढली जातात. कारण त्या झाडाचे खोड काटेरी असल्यामुळे चढणे कठीण काम असते. ती सुकवून बाजारात विकली जातात. त्या उलट वावडींगाचे. त्याची फळे अगदी हाताला मिळतील एवढ्या उंचीला वाढते. एक प्रकारचे झुडूप कींवा वेलही म्हणता येईल. मिरीच्या आकाराची वावडींगे खुप औषधी आहेत. या वावडींगाना औषधी कंपण्यांनमध्ये भरपूर मागणी आहे. त्याबद्दल सविस्तर माहीती खाली देतोय. तर अशी ही वावडींग साधारण अर्धी कच्ची लालसर झाली की ती तोडायला आम्ही मुले गोण घेवून माळावर जायचो. ज्याला दिसेल ती झाळ (अनेक झुडपांचा समुह) त्याची. बऱ्याच झुडपांच्या मध्ये एखादे वावडींगाचे झुडूप असायचे. त्यावरची हिरवी लाल वावडींग क्षणार्धात काढून व्हायची. काही लोक तर वावडींगाचे पूर्ण झुडूपच कोयत्याने तोडून घ्यायचे. हेच मला आवडत नसे. जर आपल्याला पुढच्या वर्षी वावडींग हवी असतील तर पूर्ण झुडूप न तोडता फक्त फळाचीच तोडणी करायला हवी ना. ही गोष्ट कमी लोकांना समजते. वावडींगाची तोडणी झाली की ती उन्हात सुकवली जातात. सुवकवलेली लालसर वावडींग विक्रीयोग्य होतात. लहरी वातावरणामुळे वावडींग सुकवणे फार जिकरीचे काम असते. कारण वावडींगाच्या सीजनला पाऊस असतोच. चांगले उन मिळाले नाही तर वावडींगे काळी पडतात. अशांना चांगला दर मिळत नाही. आमच्या शेजारच्या गावाला विस्तीर्ण माळरान लाभलय. तिथे एका शेतकऱ्याने वावडींगाचे महत्व लक्षात घेवून एका प्लॉटला संपूर्ण वावडींगाची लागवड केलीय. सुरूवातीला त्याला खुप लोकांनी वेड्यात काढले. पण जेव्हा समाधानकारक उत्पन्न मिळायला लागले तसे गप्प बसले. माझ्या मते ज्यांच्याकडे पडीक जमीन आहे त्यानी असा प्रयोग करायला हरकत नाही. वावडींगाची फांदी जरी लावली तरी जगते. सध्याचा सुक्या वावडींगाचा रूपये ५०० ते ६०० प्रती किलो दर आहे. गावी असलेल्या बांधवाना माझी अशी विनंती आहे ओसाड पडलेली माळराने या वनस्पतीची लागवड करून आपण हीरवीगार करू शकतो. फक्त लागवड केल्या नंतर कुंपन करायला हवे. कारण चरायला जाणारी गुरे या झुडपांची नासाडी करू शकतात. एका वावडींगाच्या झुडूपापासून साधारणपणे एक कीलोच्या आसपास सुकी वावडींगे मिळतात. आता पुढचे अर्थशास्त्र तुम्हीच करू शकता. वावडींगाची लागवड काजू कींवा आंब्याच्या बागेत करून आंतरपीक म्हणुनही घेऊ शकता. आपल्या कोकणाच्या आर्थिक संपन्नेतेमध्ये या पीकाची भर घालू शकतो. वावडींगाची सविस्तर महीती "औषधीसंग्रह्- डॉ. वामन गणेश देसाई" यांच्या पुस्तकातून देत आहे.
वावडिंगाचा खूप लांब असा वेल असतो. दुसऱ्या झाडाभोवती विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.वेलाचे खोड सडपातळ पण खरखरीत असून त्यास पुष्कळ गाठी असतात. पाने दोन्ही टोकास निमुळती, फुले पांढरी व मोठाल्या तुऱ्यातुऱ्यांनी येतात; फळे मिऱ्यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात. वावडिंगे मिऱ्यांसारखी वा कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व टोकाकडे लहान काटा असतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुने झाले की काळे पडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.
रसशास्त्र:- वावडिंग रूचकर पण जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत त्याच्या वजनाच्या अडीच टक्के असे एक अम्लधर्मी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) असते.
गुण:- वावडिंग हे उष्ण, दीपक, पाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस ्शक्ती देणारे, रक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथींवर होत असते. त्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजना मिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूर पडत नाही.
उपयोग:
मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात व ते दूध देतात.
आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.
त्वचारोगांत वावडिंग पोटात देतात व त्याचा लेप करतात. कधी धुरीहि देतात.
तर्‍हेतऱ्हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमी मरून पडतात..
नितीन राणे...

शेखू....


शेखू....
शरदचे अकाली जाणे संपूर्ण गावाला धक्का देवून गेल होतं. सगळ्यांशी प्रेमाने वागणारा , अगदी लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यानां हवाहवासा वाटणारा शरद तापाचे निमित्त होऊन गेला. मला फोन आला तसा गाडीत बसलो. गाडी बसल्या बसल्या विचार करू लागलो . असं शरदच्या बाबतीत का घडले असेल? कायम सगळ्यांची काळजी करणारा स्वताची काळजी घ्यायला विसरला असेल का? कॉलेज संपून एकच वर्ष झालं होतं. मी मुंबईला आलो आणि तो गावीच राहीला. जेव्हा तो पहील्यांदा शालीनीच्या प्रेमात पडला तिथ पासून ते अगदी परवा पर्यंत तीचे कौतूक सांगत होता. तिचे काय होईल आता? सगळेच अनाकलनीय होते. त्याच्या आठवणीने जीव व्याकूळ होत होता. जीवाभावचा मित्र गमावला होता मी.
सकाळी आठ वाजता घरी पोचलो. थोडावेळ बसून राहीलो. जाऊन काय करू? गेलेल्या मित्राचे कलेवर पाहू? पाहवेल का आपल्याला? शेवटी तसाच उठलो आणि शरदच्या घरी निघालो. वाटेत माझे बाबा भेटले. त्यांचा चेहरा बघून रडूच कोसळले मला. शरदचे बाबा आणि माझ्या बाबांची खास मैत्री होती. एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलो. दोघांच्या दूख:चा बांध एकाचवेळी फुटला होता. शरदच्या कुंटूंबाला आधार देणारे बाबा आता ओक्साबोक्शी रडत होते. माझीही तीच हालत होती. ढोल वाजला तसा दोघेही भानावर आलो. एकमेकांना सावरून शरदच्या घराकडे निघालो. रडणाऱ्यांचा आवाज ऐकून काळीज गलबलत होतं. अंगणात पाय ठेवणार इतक्यात शेखूने माझ्या अंगावर झेप घातली आणि मिठी मारली. त्याची मिठी मला अनपेक्षीत होती. अगदी माणसासारखा रडू लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रूंना थारा नव्हता. थोडावेळ त्याला तसेच राहू दिले. त्याचे सांत्वन करावे लागेल अशी तसूभरही कल्पना नव्हती. एरव्ही अनोळखी माणसांना शरदच्या घरी जाताना विचार करायला लागायचा. अनोळखी माणूस दिसले की शेखू भुंकायला लागून अंगावर जायचा पण आज तोच घायाळ झाला होता. रडून रडून डोळे पार लाल झाले होते. शेखूला बाबांकडे देऊन मी घरात गेलो. सगळीकडे रडारड चालू होती. कोणाचे सांत्वन करायचे. कोणीही धीर द्यायच्या मनस्थितीत नव्हते. शरदचे वळयमध्ये भींतीला टेकवून ठेवलेले कलेवर पाहून मला खुप गहीवरून आले. त्याचे आईबाबा तर शुद्धीवरच नव्हते. बहीन पायात डोकं घालून आपल्या अश्रुंना वाट करून देत होती. परत ढोल वाजला तसे लोक शरदला आंघोळीला घेवून जाऊ लागले तसा शेखू धावला. घेवून जाणाऱ्यांना मज्जाव करू लागला. शेवटी मी त्याला आवरले होते.
शेखू शरदचा जीव की प्राण होता. तालूक्याच्या ठीकाणी परीक्षा देवून येताना जखमी अवस्थेत पडलेले कुत्र्याचे पिल्लू पाहून शरदचे मन द्रवले. कपड्यांची पर्वा न करता एस टी प्रवास करून घरी घेवून आला होता. त्याची मलमपट्टी करून बरे केले होते. शेखूला खायला दिल्याशिवाय स्वत: काहीच खात नसे. आणि शेखू पण शरद आल्याशिवाय अन्नाला शिवत नसे. शरद मुंबईला न येण्याचे कारण शेखूच असावा. पण तो न येण्याचे कारण सांगत नव्हता.
शरदला स्मशानात नेताना शेखूची हालत खुप बेकार झाली . कधी नव्हे त्या साखळीत अडकवलेला शेखू रडून हतबल झाला. जोरजोरात विव्हळू लागला. त्याचे ते विव्हळणे आजही माझ्या कानात गुंजत असते. मलाही त्याला असे बांधून ठेवने पटले नाही. पण सावधानता म्हणुन तसे करावे लागले. आईबाबा असल्यामुळे मला स्मशानात जायला प्रतिबंध होता. जिवलगाचे शेवटचे दर्शन घेवून स्मशान दिसेल अशा ठीकाणी उभा राहीलो. स्मशानतल्या विधी पाहायची वेळ माझ्यावर पहील्यांदाच आली होती. शरदचे शव सरणावर ठेवून त्यावर लाकडे ठेवताना पाहून मला हूंदका आवरला नाही. मनात आलं ओरडून सांगाव सगळ्यांना, अरे त्याला लागेल. पण लोक मात्र तटस्थपणे त्यांचे काम करत होते. जेव्हा आपला जिवलग जातो तेव्हाच काय तो माणूस ह्या गोष्टी पर्सनली घेतो. अनथ्या सगळे निर्विकारपणे पार पाडले जाते.
अग्नी देताना शरदचे बाबा अक्षरक्ष कापत होते. सरणाने पेट घेतला होता. शरद जळू लागला तसे म़ाझ्या मनाला चटके बसू लागले. मला ते चित्र पाहवेना. घरचा रस्ता पकडणार इतक्यात लांबून शेखू धावत येताना दिसला. त्याची मान रक्तबंबाळ
झाली होती. गळ्यात साखळी लोंबत होती . लोकानी अडवण्याचा खुप प्रयत्न केले. पण त्याने या वेळी सगळ्यांना चुकवले. धावत आला तसाच स्मशानात घुसला. तिथे चार पाच लोक होते. ते सरणावर मीठ मारत असताना शेखूने भडकलेल्या सरणात उडी घेतली. अरे देवा काय झाले हे. काळजाचे पाणी करणारी घटना आम्ही पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही. बाबी काकानी त्याला लाकडाने बाहेर ढकलण्याचा असफल प्रयत्न केला. पण मधोमध जळणाऱ्या शेखूचे रडणे भडकलेल्या आगीत विरत गेले. अखेर आपल्या धन्यासोबत जाण्याचे भाग्य शेखूलाच मिळाले .
नितीन राणे.

गवळदेव


गवळदेव
कोकणात भात कापून झाले की गवळदेवाचे वेध लागतात. थोडक्यात गावातील स्नेहभोजन कींवा स्नेहसंमेलनही म्हणता येईल. येथे वाद्यवृंद नसतो. तसंच ध्वनिप्रदूषणाची भीतीही नसते. ज्याचा आवाज पहाडी तो सरस ठरतो. जंगलात वावरायचं, तर जंगली प्राण्यांशी वैर पत्करून कसं चालेल? त्यातही जंगलाच्या राजाला विसरणं शक्यच नाही. सह्याद्रीत वाघाचा मुक्तसंचार आहेच. अशा वेळी जंगलात वावरताना वाघानं आपल्याला अभय द्यावं, गाई-वासरांना बिथरवू नये म्हणून वाघाला आनंदी ठेवण्यासाठी एक सोहळाच साजरा होतो. सह्याद्रीत गुराखी मंडळी आता कमी झाली. पण पूर्वी माळावर गुराख्यांचे थवेच असायचे. गाई-वासरांची झुंबड असायची. भजन, पूजन, कीर्तन असं सारं चालायचं. या गुराख्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम वर्षातून एकदा होतोच. वाघाचं स्मरण करत का होईना, गवळय़ांच्या देवाला गुराखी साकडं घालतात. गवळदेव म्हणजे गुराख्यांचा देव. रानातला देव. कृष्णानं गुरं राखताना आपल्या सवंगडय़ांना शिकवलेला उत्सव आजही मोठय़ा श्रद्धेनं साजरा होतो.
मला आठवते , आमच्याकडे पण गवळदेव साजरा होतो. आदल्या दिवशी वर्गणी काढली जाते. दुसऱ्या दिवशी सगळे जण गवळदेवाच्या ठिकाणी जमले जातात. गवळदेवाच्या स्थानाची साफसफाई केली जाते. तुळशी वृंदावनाची मातीने डागडूजी केली जाते. वाघोबा तयार केला जातो. मग जेवनासाठी लाकडे गोळा करण्याचे काम लहान मुलांवर असते. तोपर्यंत मोठ्या माणसानी चुली बनवलेल्या असतात. बाजाराला गेलेला माणूस पण येतो. प्रत्येक घरातून जमा झालेले विविध प्रकारचे तांदूळ धुवून भल्या मोठ्या टोपात भाताचे आदन ठेवले जाते. असे हे भात करणारे लोक निवडक असतात. कोणालाही मोठ्या प्रमाणावर भात करणे जमेलच असे नाही. काहीश्या दमट लाकडांमुळे चुलीतली आग पेटत नसायची. मग आम्ही पुठ्ठयाने हवा घालून आग पेटवत असू. धुराने भरलेले वातावरण चैतन्यमय असायचे. भात शिजत ठेवला की इतर कामे केली जातात. बटाटा कींवा ताज्या भोपळ्याची भाजी हमखास केली जाते. रानातल्या वरणाची चव घरच्या वरणापेक्षा वरचढच असते. ठरलेल्या मेनूत वडेही असतातच. हे वडे म्हणजे खास गवळदेवाचे. ते कधी फुगत नाहीत आणि चावूनही तुटत नाहीत. वनराईत जेवण तयार होत असताना येणारा खमंग दरवळ, हा कोणत्याही स्वयंपाकगृहातील दरवळापेक्षाही हवाहवासा वाटणारा असतो. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे सोलकढी पिण्यासाठी आम्ही खोबरे किसून झालेया करवंट्या पळवत असू. कधी खोबरे कीसून होते आणि करवंटी टाकली जाते हे आम्ही बघतच असायचो. जेवन तयार झाले की जेवायचे वेध लागतात .जेवणाच्या पंक्ती कधी बसतात याच्याकडे डोळे लागलेले असायचे.
मग गवळदेवाची पुजा सुरू होते. सगळ्या गुराढोरांना सुखी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी गवळदेवाला साकडे घातले जाते. प्रत्येक देवाच्या नावानं वाडी काढली जाते. वाघोबाला पण वेगळी वाडी (नैवेद्ध) काढली जातो. भोजनासाठी पत्रावळी या रानातल्या पानापासून तयार केलेल्या असतात. यात कुडा, चांदवड, करंजाई या वृक्ष्यांची पान वापरून तयार केलेल्या पत्रावळी आणि द्रोण असतात. काही जण केळीची पाने किंवा चवईची पाने पण घेवून येतात.
जंगलातच सावलीच्या आश्रयानं मग बैठका बसतात. जेवणाच्या प्रारंभी श्लोक सुरू होतात. अस्सल ग्रामीण ढंगातले श्लोक हे रानातच ऐकायला हवेत. जेवन होत आले की हा कार्यक्रम थांबवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्ती ‘हरिच्या घरी’ म्हणतात. मग श्लोक थांबतात.
जेवल्यानंतर कार्यक्रम सुरू होतो, तो सकाळी पुजलेल्या वाघाची हकालपट्टी करण्याचा.. वाघ कोण होणार यापासून ते वाघाला जेरीस कसं आणायचं याचे आडाखे बांधले जातात. वाघाच्या नावानं ठेवलेली वाडी आणि त्याशेजारी ठेवला गेलेला नारळ आणि नारळाच्या खाली लपवलेले ‘रुपये’ वाघोबा होण्यास इच्छुक असलेल्याला साद घालत असतात. वाघोबा झाल्यामुळे नारळ, पैसे मिळणार असले, तरी त्या बदल्यात मारही भरपूर खावा लागतो. हा मार ज्यानं चुकवला तो विजेता ठरतो.
वाघोबा होण्यास इच्छुक असणारी मंडळी मग जागेचा आणि आपल्या गतीचा अंदाज घेतात. प्रतिस्पर्धी काय करू शकेल याचा आडाखा मांडतात. ‘वाघ रे वाघ’चा खेळ सुरू होतो. गवळदेव आणि मातीच्या केलेल्या वाघाभोवती पाच प्रदक्षिणा मारायच्या. वाघ पुढे, त्याला हाकवणारे त्याच्या मागे. यानंतर पाचव्या फेरीत वाघोबा बनलेल्या व्यक्तीनं धाव घ्यायची आणि कुठलंही पाण्याचे ठीकाण गाठायचं. त्याला पाण्याच्या ठीकाणापासून रोखण्यास ग्रामस्थ अटकाव करतात. जोपर्यंत पाण्यापर्यंत हा वाघोबा पोहोचत नाही, तोपर्यंत त्याच्यावर शेणाचा मारा केला जातो. एकदा का वाघोबा झालेल्या व्यक्तीचे पाय पाण्याला लागले, की मारा थांबतो, अशी ही प्रथा आहे.
प्रथेप्रमाणे खेळ सुरू होतो. शेणाचे गोळे तयार केले जातात. वाघोबाला मारण्यासाठी पाच-दहा टोपल्या शेण आणलेलं असतं. वाघोबा झालेला माणूस गोलगोल फिरू लागतो. पाचव्या प्रदक्षिणेकडे साऱ्यांचंच लक्ष असते. वाघ बनलेल्याने कधी कुणाची कळ काढली असेल, तर त्याचा वचपा काढण्यासाठी ही नामी संधी असते. अशा वेळी काही जण हातातील शेणगोळय़ात दगड घालतात. हे शेणगोळे चुकवत वाघोबा बनलेला सैरावैरा पळू लागतो. एकच गलका सुरू होतो. ‘वाघ रे वाघ ऽऽ’ या शब्दाबरोबर ‘धरा-मारा’चे हाकारे-कुकारे सुरू होतात. सारं जंगल दणाणून जातं. जणू काही प्रत्यक्ष वाघच आला आहे, असं वाटावं. शेणगोळय़ांचा अक्षरश: वर्षाव केला जातो. नदीजवळ पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अनेक जण वाघाच्या आडवे येतात.
वाघ बनलेल्यालाही शेणगोळे फेकणा-यांना कसं चकवायचं, हे माहीत असतं. मधूनच तो विरुद्ध दिशेनं पळ काढतो. गर्द वनराईत तो लपूनही बसतो. मग कुणीतरी वाघच गायब झाल्याचं सांगतो आणि रान काढणं सुरू होतं. हे रान काढणंही फारच मजेशीर असतं. एखादा उंच झाडावर चढून सभोवतालचा अंदाज घेतो. कुठची डहाळी हलते का? कुठून आवाज येतो का? हे पाहिलं जातं. यात जर वाघाची बैठक समजली, तर सारे जण त्याच्या दिशेनं शेणाचा मारा करतात. नाही तर प्रत्येक झाडीत शेण मारत मंडळी पुढे रवाना होतात. याच वेळी वाघोबा वा-याच्या वेगानं पाणवठय़ावर पोहोचतो. तासभर चालणारा हा खेळ थरारक, पण तितकाच गमतीशीरही असतो. एकदा का वाघ पाण्यात पोहोचला, की मग सारं शांत होतं. सारे जण पाणवठय़ावर गोळा होतात. हसत-खेळत अंघोळ करून सारे जण घरी परततात.
असं गुराख्यांचं हे कोणत्याही सूत्रसंचालनाशिवाय होणारं एक उत्स्फूर्त स्नेहसंमेलन. सध्या असे गवळदेव गावोगाव सुरू झाले आहेत. अलीकडे जंगलापर्यंत घरं वाढल्यानं गवळदेव वस्तीच्या जवळ आले. पूर्वी ते निर्जन भागात राहत असत. एक मात्र खरं, की गवळदेवाची मजा आणि निसर्गाचं सहभोजन घेण्याबरोबर पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा ही गावाचं गावपण टिकवून आहे. हा अनुभव जे-जे अनुभवतात, त्यांना पुढच्या गवळदेवाचे वेध लागल्याशिवाय राहत नाहीत.
नितीन राणे
संदर्भ - किशोर राणे ( वाघ रे वाघ )

Wednesday, 24 January 2018

कोनवाडा


     पक्याचा निरोप ऐकून आबा मटकन खालीच बसले. त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. पुढ्यातली भाकरी तशीच घरात ठेवून चुळ भरली.  लक्ष्मी काकी पण घरी नव्हती. दुपारचे ११ वाजले होते. पायात चपला सरकवून कोनवाड्याच्या दिशेने चालू लागले. शर्टाच्या वरच्या खिशातले १० रूपये चाचपत स्वताशीच कायतरी पुटपुटले. त्यांची पावले पटापट पडत होती. विचाराच्या तंद्रीत आबा भुतकाळात जाऊ लागले.
सकाळची वेळ होती. आबानी कोरी चहा पिऊन शमी गायीला कुरणात सोडून आले होते. तो त्यांचा नित्यक्रमच होता. तिच्या जीवावरच त्या दोघांची गुजरान होत होती. त्यांचा एकूलता एक मुलगा शहरात नोकरीला होता. गावी कधीतरी फिरकायचा. पण आई वडीलांना किंमत देत नव्हता. चंगळ म्हणून गावी यायचा. आबानी तर तो सुधरायची आशाच सोडली होती. वडील म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडून देखील त्यांना उतार वयात विचारत नव्हता. आबा बिचारे आपले मन बायकोजवळ आणि त्यांच्या आवडत्या शमी गायीजवळ मोकळे करायचे. त्यांना प्राण्यांशी बोलायची सवय होती. शमीला चारायला घेवून गेले कि शमीशी तासंनतास गप्पा मारायचे. लोक त्यांना वेड्यात काढायचे. पण आबांचे प्राण्यांशी चाललेले हितगुज काही कमी होत नसे.

आज मात्र जे घडू नये ते घडले होते. पण असे कसे झाले याचाच विचार ते करत होते. शमीला कुरणात सोडून आल्यावर आबानी बरीच कामे केली होती. भाकरी खाऊन तिलाच आणायला जाणार होते आणि पक्याने शमी गायीला गोपाळरावांच्या मुलाने कोनवाड्यात टाकले अशी बातमी दिली होती. ती बातमी ऐकूनच आबा विचलित झाले होते. विचाराच्या तंद्रीत कधी कोनवाड्याजवळ पोचले कळलेच नाही. कोनवाड्याच्या बाजूलाच श्रीपतरावांचे घर होते. तेच कोनवाड्याचा कारभार पाहत. ते दारातुनच आबांना पाहत बोलले.
"आबा गुरे राखता येत नसतील तर बिनधास्त सोडून कशे देता? " श्रीपतराव आबांवर ओरडले.
"तुमचो कायतरी गैरसमज झालोहा, आमची गाय कधी कोणाच्या कुडणात गेली नाय की कोणाच्या जित्रापात. (शेतीत) " आबांचा आवाज ऐकून वाड्यातून शमी हंबरली.
"मग त्यांनी हीला काय असचं पकडून आणलय काय?" श्रीपतराव आबांशी उद्धटपणे वागत होते.
आबा मनात असुन पण काही बोलू शकले नाहीत. श्रीपतरावांकडे दुर्लक्ष करून वाड्याकडे धावले. आबा वाड्याच्या टोकाला आले तशी शमी दाव्याला हिसका देऊ लागली. आबा तिच्या जवळ गेले. तिचे तोंड हातात घेऊन कुरवाळले.
तिच्या पाठीवरचे माराचे वळ बघून आबांच्या डोळ्यात पाणी तराळले. शमीच्या शरीरावर सगळीकडे माराचे वळ होते. तिच्या डोळ्यातील अश्रु केव्हाच सुकून गेले होते. आबांचा मायेचा हात फिरताच ते परत ओले होत होते.
"श्रीपतराव बघा ओ कसो कसायासारख्या मारल्यानी हा."
"नुकसान केलयं म्हटल्यावर मार बसणारच ना" श्रीपतरावांचे हे उत्तर ऐकून आबांना त्यांचा राग आला.
"आता हे दहा रूपये ठेवा आणि गायक घेवन जावक देवा" आबा खिशातले दहा रूपये काढत बोलले.
"अहो वेडे झालात का? कोनवाड्याचा दंड, चारा पाण्याचा खर्च कोण देणार? एका दिवसाचे एकुण ५६० रूपये होतील." श्रीपतराव बोलून गेले.
शमीच्या दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. शमीला इथे ठेवने म्हणजे खुपच नुकसान होणार होते. आबा गयावया करू लागले. हातापाया पडू लागले. पण त्याला श्रीपतराव काही धजले नाहीत. आबांना त्याचा मगरूर स्वभाव माहीत होता. त्यांनी ५६० चा हीशोब देखील मागीतला नाही. परत एकदा वाड्यात डोकावत शमीला पाहीले. तिच्या पुढ्यात गवताची काडी देखील नव्हती. तिला इथे आणून दोन तास झाले नसतील पण जुलमी दंड मात्र अवाजवी लावला होता. शमीच्या पाठीवरून हात फिरवत लवकरच तुला इथून घेऊन जातो असं बोलले. त्याबरोबर शमीने मान हलवली.

आबा कोनवाड्यातुन निघाले तेव्हा बरीच दुपार झाली होती. रणरणत्या उन्हातून आपले पाय ओढत कोणाकडे पैशाची काही सोय होते का पाहायला गावा चालले होते. काहीही करून शमीला सोडवायचे होते. डेअरी मध्ये जाऊन काही फायदा नव्हता. दुधाच्या पैशाची बरीच उचल गावच्या जत्रेच्या वेळेला घेतली होती. ते सर्व पैसे जत्रा आणि बायकोच्या औषधोपचारातच संपले होते. पोराला कळवून पण त्याने पैशाची व्यवस्था केली नव्हती. कधी कधी त्यांना वाटायचं आपण निपुत्रिक असतो तर बरं झालं असते, निदान भाबडी आशा तरी लागली नसती.

ते मोहनच्या दुकानासमोर आले तेव्हा तो दुकान बंद करून निघायच्या बेतात होता. आबांचा अवतार पाहून त्यांना बसायला खुर्ची देऊन थंडगार पाणी दिले. थोडे सावध झाल्याबरोबर आबानी मोहनजवळ पैशाचा विषय काढला. पण त्याच्याकडेही पैसे नव्हते. तिथे निराशा आल्याबरोबर आबा वेळ न दवडता अजून एका माणसाकडे पैसे मिळतील या आशेवर पुढे चालू लागले. काट्याने दुखावलेला पाय खुपच ठुसठुसत होता पण हृदयातील दुख: त्याहून सलत होते. थोडे उभे राहीले कि पाय दुखायचा थांबत होता पण मनातले दुख: त्यांना स्वस्थ उभे राहू देत नव्हते . ते टेमकारांच्या घराजवळ आले तेव्हा टेमकार नुकतेच जेवून हात धुवत होते. आबाना बघून खळ्यात आले. आबांची विचारपुस केली. जेवण्यासाठी आग्रह देखील केला पण त्यांच्याने पैशाचे काम काही होणार नव्हते. त्यांनी एक मार्ग मात्र सांगितला. तिथे जाऊन आबांचे काम होऊ शकते असे सुचवले. पण बंडू खोताचे घर गावापासून थोडे दुर होते. त्यांच्यासाठी आता फक्त तोच एक मार्ग उरला होता. डोक्यावर टॉवेल टाकत आबा उठले आणि चालायला लागले. शमीचा गरीब चेहरा समोर आणत अंतर कापू लागले. उन्हाचे चटके अंगाला बसत होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. रिकामी पोटी पिलेले पाणी पोटात चांगलेच झोंबत होते. बायको अजून जेवली नसेल , आपली काळजी करत असेल याचापण विचार मनात थैमान घालत होता. शमी पण गवताच्या काडीला तोंड लावणार नव्हती. तिची सवय त्यांना चांगलीच माहीत होती एकदा असेच दोन दिवसासाठी आबा आणि लक्ष्मी पाहुण्यांकडे गेले असताना तिने अन्न पाणी सोडले होते. शेवटी शेजाऱ्यांनी आबांना बोलावून घेतले होते. विचाराच्या तंद्रीत आबा एका दगडाला ठेचाळले तशी त्यांना जोराची कळ लागली. पायाचा ठेचाळलेल्या अंगठ्याचे वर उचललेले नख खाली दाबत ते खाली बसले. रक्ताची धार सुटली. दुपारची वेळ असल्यामुळे रक्त थांबता थांबत नव्हते. कुठे पाणी मिळेल असं आजुबाजूला घरे देखील नव्हती. एका हाताने खिशातला चुण्याची डबी काढत , चुणा त्या घावावर भरला. त्याबरोबर थोडेफार रक्त थांबले. थोडावेळ सावलीत बसून परत चालू लागले. आता बंडु खोताचे घर दृष्टीक्षेपात येत होतं. घराचा दरवाजा बंद होता. मांडवात लावलेल्या चाराचाकी गाडीला टेकून आबा बसले तसा बाजूला खेळत असलेला बंडू खोताचा छोटा मुलगा घरात गेला. तो परत बाहेर आला तेव्हा त्यासोबत त्याची आई म्हणजे बंडू खोताची बायको हातात पाण्याचा तांब्या घेऊन आबांकडे येत होती.
" बंडू , हा काय घरात?" आबानी तिला विचारले.
"हो आहेत ना. झोपले आहेत, कोण आलयं असं सांगु?" तिने आबांना कधी पाहीले नव्हते. त्यामुळे ओळखले नाही.
बाहेरचा आवाज ऐकून बंडू वैतागतच बाहेर आला. बंडू बापाच्या पैशावर ऐश करणाऱ्यापैकी होता. बाप गेल्यापासून सगळी सुत्रं हाच सांभाळायचा.
"आबा, दुपारचा काय काढलस ?" आबांच्या वयाचा मान न राखता त्यांना सरळ सरळ एकेरी संबोधले हे त्याची बायको हेमाला ते पटले नसावे. एक तिरका कटाक्ष नवऱ्याकडे टाकत नाराजी व्यक्त केली. पण बंड्या तिला जुमानणारा नव्हता.
आबानी तोही अपमान सहन करत आपली करूण कहानी सांगितली. घाबरत घाबरतच पैशाची मागणी केली. बंड्या पैसे द्यायला तयार झाला पण त्याबदल्यात त्या घरसमोरील बागेत दोन दिवस खड्डे खोदायचे काम करायचे असे बोलला. हेमाला हे सर्व अविवेकी, जुलमी वाटत होतं. एखाद्याच्या मजबुरीचा असा फायदा घेणं तिला पटतं नव्हते. पण नवऱ्यापुढे तिचं काही चालत नव्हते.
आबानी मनाशी विचार केला आज काय आपली शमी घरी जाणार नाही. त्या विचारानेच त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. आबा तिथेच बसलेले पाहून बंड्याला आबा मजुरी करायला तयार आहेत असे त्याला वाटले. त्यांना काम सांगून तो झोपायला निघून गेला. आबा मात्र निशब्ध बसून होते. दुहेरी काळजीने मन अस्वस्थ झाले होते.
"आबा तुम्ही जेवलात का? " हेमाच्या प्रेमळ हाकेने ते भानावर आले. त्याबरोबर त्यांना हुंदका आवरला नाही. एकंदरीत आबांच्या परिस्थितीवरून ते जेवलेले आहेत असे काही वाटत नव्हते. तिने त्यांना पडवीत बसायला सांगीतले आणि जेवन आणायला आत गेली. आबांनी जेवनासाठी नकार देऊन पण ती ऐकली नव्हती. तिच्या मागोमाग 'आजोबाच्या पायातून रक्त येतयं' असं ओरडत तो मुलगा आत गेला.
आबा मात्र पुढ्यात येणाऱ्या अन्नाला नाही कसे बोलायचे या विवंचणेत पडले.
"आबा, हात पाय धुवून घ्या, आणि त्या जखमेला हळद भरून बांधुन ठेवूया" हेमा बाहेर येता येता बोलून गेली.
आबानी यंत्रवत हातपाय धुतले. जेव्हा ते पडवीत आले तेव्हा हेमा सुती कापड घेवून तयार होती. आबा खुर्चीत बसल्याबरोबर तीने जखमेवर हळद भरून उखडलेल्या नखासकट अंगठा बांधला.
" पोरी एक काम करशील, मला माझ्या बायकोशी बोलायचे आहे, हा नंबर लावून देशील, ती अजून जेवली नसेल" खिशातून एक मळकट डायरी काढत आबा बोलले.
हेमाने फोन लावला आणि आबांजवळ दिला. आबानी फोन कानाला लावला आणि बोलू लागले. बायकोला फोनवर बोलवायला सांगणार तोच समोरून लक्ष्मी काकी चक्कर येऊन पडलीय असा निरोप दिला गेला. आबांच्या हातातला फोन गळून पडला. डोळ्यात आलेले पाणी सांभाळत घराकडे धावत सुटले. हेमा बघतच राहीली. जेवनाचे भरलेले ताट तसेच पडले होते. त्यानी दिलेली डायरी तिच्या हातात तशीच होती. तीने परत तो फोन नंबर डायल केला तेव्हा कळले की आबांची बायको आजारी आहे.

आबा घरी पोहचे पर्यंत अंगठा पुरता ठेचाळून गेला होता. त्याची तमा न बाळगता धावत सुटले होते. आबा घरी आले. तेव्हा लक्ष्मीला बेफाम ताप भरला होता. शमी आणि आबांची काळजी, शिवाय जेवन न केल्यामुळे तीला चक्कर आली होती. आबानी तीला जेऊ घातले, स्वता मात्र जेवले नाहीत. जेवनावरची त्यांची आसच उडाली होती. काहीच मनासारखे घडत नव्हते. आबांनी आपले मन लक्ष्मीकडे मोकळे केले. तिने पण त्यांना धीर दिला.

आबा परत बंडू खोताच्या घरी आले तेव्हा ४ वाजुन गेले होते. हेमा त्यांची वाटच बघत होती.
बंडू उठला नव्हता . हेमाने दिलेली चहा पिऊन आबानी कामाला सुरूवात केली. काम करताना छोट्या मुलाची चाललेली लुडबुड पाहून त्यांना त्याच्या मुलाची आठवण आली. तोही असाच लुडबुडायचा. आता त्याची लुडबुड पुर्ण थांबली होती. त्याच्या त्या बाललिला , खोड्या त्यानी झेलल्या होत्या आज मात्र त्यांच्या म्हातारपणाचा सहवास पण त्याला नकोसा झाला होता. काहींना म्हातारचळ लागतं, साठी बुद्धी नाठी होते असं बोलतात पण तसं नसतं तर त्या वार्धक्यलीला असतात. हे ज्यांना समजते त्यांचे आई वडील कधीच एकटे पडत नसतात.
"आबा , झालं काय रे काम, उद्या पण येऊन काम करायचे." बंड्या आळस झटकत बोलला.
आबानी मान हलवली.

काळोख पडायला थोडा अवकाश असताना आबा निघाले. जाताना कोनवाड्याच्या रस्त्याने गेले. जेव्हा ते कोनवाड्याजवळ पोचले तेव्हा वाड्यात काहीतरी गोंधळ चाललेला ऐकायला आला. पुढे जाऊन वाड्यात डोकावून पाहतात तर शमीगायीचे मागचे पाय बांधुन श्रीपतरावाचा मुलगा दुध काढायचा प्रयत्न करत होता. पण तीने पान्हा चोरून ठेवल्यामुळे दुधाचा थेंब देखील येत नव्हता. तोच राग मनात ठेऊन तिच्या पाठीवर रपारप मारायला लागला. त्या बरोबर तीने हिसका दिला, गायीला तोंडाकडुन पकडलेल्या श्रीपतरावांना याचा जोरात धक्का लागला. हे पाहून त्यांचा मुलगा अजुनच चिडला. सपुर्ण ताकतीनीशी तिला मारू लागला. मुकं जनावर ओरडू लागले.
"अरे खयसर फेडश्यात ही पापा? " असे बोलत आबा धावत जाऊन मध्ये पडले. आबांना बघुन गायीने हंबरडा फोडला. तिची हालत बघून आबांनाही अश्रु अनावर झाले. तीच्या फुगलेल्या वळावर हात फीरवत आपल्या गरीबीला दोष देऊ लागले.

आबा घरी आले तेव्हा वाड्यात डोकावले. शमीशिवाय घरचा वाडा खुपच सूना वाटत होता. त्या रात्री आबा नीट झोपले नाहीत. त्यांना खुप रडावसं वाटत होतं पण आपल्या बायकोची हालत बघवत नव्हती, सारखी झोपेत बडबडत होती. तीच्यासाठी ते खंबीर राहीले होते.

हेमाला रात्री कधीतरी जाग आली. कोणीतरी दाराची कडी वाजवत होतं. बंडु असावा. अर्धवट झोपेतून उठत दरवाजा उघडला. बंडुच्या तोंडाचा दर्प नाकात घुसला. त्याचे हे रोजचेच झाले होते. त्याने आल्याआल्या तिला बेडवर ढकलले. तिचा थोडा प्रतिकार झाला. त्याबरोबर त्याने तिच्या मुस्कटात मारले. त्याच्या ताकतीपुढे तिचे काही चालले नाही. त्याने कार्यभाग उरकला आणि लगेचच झोपुन गेला. ती मात्र आतल्या आत हंबरत राहीली शमी सारखी.

आबा सकाळीच सगळे आवरून बंडूच्या घरी पोचले होते. आज काम संपवून शमीला घेऊनच जायचे असे ठरवले. दिवस वाढल्यामुळे अजुन एका दिवसाचा दंड वाढणार होता.
हेमा मागच्या दाराला बसली होती. आबांना टिकावाने खड्डे खनताना बघून त्यांची दया येत होती. त्यांच्याने टिकाव उचलत नव्हते. पण कसेतरी खोदत होते. दिवसभरात १५ खड्डे खोदले तर पुरेसे पैसे मिळणार होते.

आबांना न्याहरी देवून हेमा शेतातल्या कामगारांना मजुरी द्यायला निघाली. आडवाटेने जात असताना दोन माणसे आपापसात बोलत असल्याचे ऐकायला आले त्यात आबांच्या नावाचा उल्लेख झाला. ती कान देवून ऐकू लागली. ते बोलणे ऐकल्यावर तिच्या सारा प्रकार लक्षात आला. समजलेली हकीकत अशी होती.
आबांच्या कुरणाला लागुन गोपाळरावांचे कुरण होते. दोन बैल झुंजत झुंजत आब़ाच्या कुरणात आले. तिथे शमी गाय चरत होती. ती घाबरून पळू लागली. त्याबरोबर झुंज सोडून एक बैल तिच्या मागे लागला आणि ती जीव वाचवण्यासाठी गोपाळरावांचे कुंपण तोडून आत गेली. इतक्यात झुंजणाऱ्या बैलांचा मालक येऊन त्यांना घेऊन गेला. शमीला आलेल्या वाटेने बाहेर पडायला मिळेना आणि थोड्या वेळाने गोपाळरावांच्या मुलाच्या ताब्यात सापडली. शमी गायची काहीही चुक नसताना तीला बदडत नेणाऱ्या गोपाळरावांच्या मुलाचा राग आला. कारण त्या बैलाच्या मालकाने त्याला ती चुकून आत गेली असे सांगुन सुद्धा निव्वळ श्रीपतरावांच्या मुलाचा दंडाकरवी फायदा व्हावा यासाठी तीला पकडून कोनवाड्यात टाकले होते. हेमाच्या लक्षात आले गायीवर अन्याय झालाय. तीला यातून सोडविले पाहीजे. नवऱ्याला सांगून काहीच फायदा नव्हता. त्याच्याच कोनवाड्यात ती स्वतः होती. गरीब गायीसारखी. तिला देखील मर्जीविरूद्ध आणलं गेलं होतं. तीच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस वेगळेच घेऊन यायचा. कधी मारझोड, बळजबरी ,जबरदस्ती असं काही तरी असायचेच. दारू पिल्यानंतर तर बंडू राक्षस व्हायचा. तिच्या नशीबात प्रेमच नव्हते. या सर्वांना कंटाळलेल्या हेमालाही सोडवणूक हवी होती. लग्नापुर्वी अनाथाश्रमात वाढलेल्या हेमाला माहेरचे असे कोणी नव्हते. तिच्या मनाचा कोंडमारा व्हायचा. छोट्या मुलाकडे बघुन सारं घोटायची. कधी कधी तिलाही या कोनवाड्यातून सुटका करून घ्यावीशी वाटायची. पण धीर व्हायचा नाही. तिला सवय झाली होती. तशी सवय शमीला नको व्हायला हवी होती. श्रीपतरावांचा पठाणी दंड वाढायच्या अगोदर काहीतरी करायला हवं होतं. दुसऱ्या कोणाला सांगुन फायदा नव्हता. आपल्यालाच काहीतरी करायला हवे होते. मनाशी विचार करता करता हेमा घरी आली.

हेमा घरी आली तेव्हा आबांचे काम चालूच होते आणि बंड्या त्यांच्यावर ओरडत होता. हेमाला त्याचा राग आला. आबांकडून अवघे पाच खड्डे खोदून झाले होते. अजून अर्धा दिवस बाकी असला तरी १० खड्डे मारून होणार नव्हते. म्हणुन बंड्या पण त्यांना खड्ड्याच्या हिशेबाने पैसे देणार होता. हे ऐकून आबा खालीच बसले. कारण खोदलेल्या खड्याच्या पैशात त्यांच्या शमीची सुटका होणार नव्हती. त्या विचाराने त्यांना रडूच आलं. त्यांचा चेहरा त्यांनी टॉवेलने झाकला तरी हेमाला ते जाणवले.

हेमाला काहीही करून त्यांना मदत करायची होती. पण कशी? हेच तिला सुचत नव्हते. ती हतबल झाली होती. काही झाले तरी बंडुला ही गोष्ट कळून चालणार नव्हती म्हणून ती त्याच्याकडे जाऊ शकत नव्हती. विचार करून करून ती निराश झाली. दिवस मावळतीला आला तशी तिची घालमेल वाढली. आबांचे थकलेले हात थरथरताना दिसले. त्यांनी तर सपशेल हार मानली होती.

वाड्यात सामान ठेवायचा आवाज झाला. तशी ती भानावर आली. तिच्याकडून अजून काहीच झाले नव्हते. याचीच खंत होती. ती वाड्यात आली. आबा टिकाव फावडे वाड्यात ठेऊन बाहेर जात होते.
" आबा" तिचा कंठ दाटून आला.
आबानी वळून मागे पाहीले. हेमा त्यांना हाक मारत होती.
"पोरी काय गो?" कपाळाचा घाम पुसत आबा बोलले.
"आबा, तुम्ही केलेल्या कामाचे पैसे देखील आज मिळणार नाहीत, हे मघाशीच बाहेर निघून गेले." हेमाला हे सांगताना कसेतरीच वाटत होते.
आबा काहीच बोलले नाहीत.
"आबा, तुम्ही या उद्या सकाळी, हे कोल्हापुरला जाणार आहेत , आज रात्री घरी आले की तुमचे पैसे घेवून ठेवेन." हेमा अशी बोलली खरी पण तिला त्यासाठी वेळ पडल्यास मार खावा लागणार होता आणि तरीही पैसे मिळायची खात्री नव्हती.
" हं " असे बोलत आबा निघायला लागले.
" आबा थांबा, चहा ठेवते , तो घेऊन जा."
आबा येऊन पुढच्या पडवीत बसले.
चहा पिऊन झाला. त्यांना काहीतरी बोलायचे होते.
"पोरी, याक बोलाचा हूता गो, पण कसा बोलाव, ताच कळत नाया"
"आबा, मला पोरी म्हणता ना, मग संकोच करू नका ,बोला काय ते" हेमा बोलली.
" पोरी , थोडी भुकी आणि साखर मिळात काय? सकाळपासना आमच्याकडे चाय नाया, गेलय काय लक्षुमेक थोडी चाय करून देयन, तीका फुटी लय आवडता" आबांचे हे शब्द तीचे काळीज चिरून गेले.
" पोरी , आतापरयात कोणाजवळ हात नाय पसरूक , पण तु जवळचा वाटलस म्हणुन बोल्लय. काय चुकला तर माफ कर"
हेमाला काय बोलावे ते कळेना. आईच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी बघून तीचा छोटा मुलगाही कावराबावरा झाला. त्याला आपली आई कधी रडलेली माहीत नव्हते, किंबहूना ती त्याच्या समोर त्या अवस्थेत कधीच आली नव्हती रोज रडत असुन सुद्धा.
"आबा, तुमचे काहीही चुकलेले नाहीये, थांबा येते मी" तीचा हे बोलताना कंठ दाटून आला होता. ती आत गेली. तीच्या मागोमाग छोटा मुलगाही दुडूदुडू धावत गेला.
थोड्यावेळाने ती एक पिशवी घेऊन बाहेर आली. ती आबांच्या हातात देत बोलली.
"आबा, हे काय म्हणुन विचारू नका, तुमच्या मुलीने सासरभेट दिलीय असं समजा"
आबांचा कंठ दाटून आला. त्यांना काही बोलवेना.
" तुम्ही जाताना शमीला भेटायला जाणार आहात का?"
" नाय, तीका भेटाक होवचा नाय माका. तेचे हाल बघवत नाय गो, गेलय काय टकामका बघीत ऱ्यवात, हंबरान जीव अर्धो करीत, ता माझ्याच्यान बघवाचा नाय .." एवढे बोलून आबा निघाले.

आबा घराकडे जात होते पण पावले काही उचलत नव्हती. प्रथमच गरीब असल्याची लाज वाटत होती. मनात खुपच घालमेल होत होती. इतक्यात मागून कोणीतरी हाका मारत असल्याचा आवाज आला. हेमाच होती ती. त्यांनी तीचा आवाज ओळखला.
ती डोक्यावर चारीचा पेंडा घेवून धावत येत होती.
"आबा, तुमची काळजी मिटली, पैशाची व्यवस्था झाली, कशी झाली हे मात्र विचारू नका." हेमा धापा टाकत बोलली. पैशाचे पाकीट आणि चारीचा पेंडा आबांच्या हातात दिला. आपण हे पैसे घेऊ नये असं आबांना वाटले पण हे ऋण आपण फेडू शकतो व मुक्या जनावऱ्याच्या होणाऱ्या हालापुढे हे ऋण काहीच नव्हते.
" पोरी, पैशे घेतय पण , तुझी पैन पै फेडीन" आबांना पुढे बोलवेना. कोण कोणाची मुलगी , जिचं आपल्यासाठी काळीज तुटतयं.
"आबा एक सांगु का? तुमची शमी चोरटी नाहीये तिला त्यात गुंतवले गेले होते, पण कस ते विचारू नका. " आबांना आपली शमी निर्दोष आहे हे माहीत होतेच पण आता शिक्कामोर्तब झाले. हेमाचा निरोप घेऊन आबा कोनवाड्याकडे चालायला लागले आणि हेमा आपल्या कोनवाड्याकडे. जिथून तीची अजिबात सुटका नव्हती.
त्याचवेळी त्यांचे हे बोलणे कोणीतरी ऐकत होते.

आबांसोबत घरी जाताना चालणारी शमी खूपच आनंदात होती. सारखी सारखी आबांना चाटून आपले प्रेम व्यक्त करत होती. आबा त्याहून खुश होते. तीचे तोंड हातात घेऊन तीला कुरवाळत होते. हेमाने दिलेल्या चाऱ्यातुन थोडा चारा  भरवताना आबा खुश होत होते. आबा घरी येईपर्यंत काळोख पडला होता. घराजवळ आल्याबरोबर शमी हंबरली. ती तिच्या घरात आली होती. आपल्या जागेवर जाऊन हूंगू लागली. लक्ष्मी उठून बाहेर आली. आबानी शमीला आणलेले पाहून भर आजारपणात पण तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. आबांच्या हातातली पिशवी घेऊन ती शमीला ओवाळायची तयारी करू लागली. आपल्या बायकोचा उत्साह बघुन आबा काही बोलले नाहीत. पण हेमाला दुवा द्यायला मात्र विसरले नाहीत.

हेमा जागीच होती. इतक्यात दरवाजा वाजला. तीने घड्याळात पाहीले १० वाजले असावेत. आपला नवरा एवढ्या लवकर? तीने दरवाजा उघडला. समोर मान खाली घालून बंडू उभा होता. तो न लटपटता आत आला. हेमाला आश्चर्य वाटले. आज स्वारी दारू न पिता, आरडाओरड न करता आली होती. तो पलंगावर बसला.
तीने त्याला शुद्धीत पाहून जेवनाबद्दल विचारले. तो खुणेनच नको बोलला.
तीला जवळ बोलविले. ती घाबरतच समोर आली.
त्याने तिला काही न बोलता मिठीत घेतले. हेमाला प्रथमच त्या मिठीत वेगळेपण जाणवले. ज्या क्षणाची ती वाट बघत होती तो क्षण होता तो. त्या मिठीत तिला त्याच्या साऱ्या कृत्याची क्षमा जाणवत होती, त्या मिठीत एक आश्वासक घट्टपणा होता. तीला कुठेतरी जाणवत की आपली कोनवाड्यातून सुटका होतेय. थोडा वेळ ती दोघं तशीच बिलगून राहीली.
"हेमा.. " त्याला पुढे बोलवेला.
" हेमा आज संध्याकाळी मी जर परत घरी आलो नसतो आणि तुम्हा मायलेकाची चाललेली ती धडपड पाहीली नसती ना तर कदाचित माझ्याकडून तुझ्यावर असाच जुलूम होत राहीला असता. आपल्या मुलाला तु किती चांगले संस्कार दिलेस. सुरूवातीला मला कळेनाच तुला कशासाठी पैसे हवेत. ज्या हाताने आपल्या स्नेहने आपल्या मिनी बँकचा डबा तुझ्यासमोर धरला ते कोवळे हात बघून माझी मला लाज वाटली. किती समज ती. सारं कसं समजले असेल त्याला?  आबा काम करत असताना तो त्यांच्या आजुबाजूलाच असायचा. आबानी तर सांगीतले नसेल? नाही. आबा असं कधीच करणार नाहीत. तुलाही क्षणभर त्याने दिलेला डबा फोडावासा वाटला नव्हता पण त्याच्या त्या बालहट्टापुढे तुला ते करावे लागले. पण त्यातही तुला दुहेरी आनंद झाला होता. मुलाविषयी कौतुक आणि आबांना मदत होतेय याचा आनंद.
त्यानंतर तु ते पैसे घेऊन कातरवेळी बाहेर पडलीस म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो. धावताना तुझी ओढ मला दिसत होती. त्याचवेळी क्षणोक्षणी माझा राग, अहंकार , मगरूरी तुटत होती. माझी मलाच घृणा वाटू लागली होती.. स्नेहचा समजुतदार पणा पाहून तर मी अवाक झालो होतो. हे सगळे तुझ्या संस्कारामुळेच घडून आलेय गं. आता मला समजतयं तु आपल्या स्नेहला माझ्यापासून दूर का ठेवायचीस ते. पण त्याची आता गरज लागणार नाहीये. असं बोलून त्याने तिला परत मिठीत घेतली. दुसऱ्यांदा मिठीत जाताना हेमाला आपण कोनवाड्यातून पुर्णपणे सुटल्याची ग्वाही मिळाली.

                    समाप्त.
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
शब्दांकन
नितीन राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८