©खणखणीत नाणं..
"नैतिक मला थोडा उशीर होतोय, तू पार्थला घ्यायला जाशील का?" सावीने त्याला विचारले.
" ठिक आहे."असे बोलून त्याने कॉल बंद केला.
" मित्रांनो , मी निघतोय, ड्यूटी लागली." बॅग घेऊन तो उभा राहिला.
" नैत्या , यार खुप दिवसानी भेटतोय आणि तू असा मध्येच निघून जातोय." त्याचा मित्र नाराजीने म्हणाला. 
" अरे मी पाच मिनिटात निघालो नाही तर, माझा मुलगा तिथे ताटकळत राहील रे." त्याचे रास्त कारण ऐकून मित्रही काही बोलले नाहीत.
बाईक स्टार्ट करून तो शाळेकडे निघाला. पार्थ वाटच बघत होता. त्याला घेऊन तो तडक घरी निघाला. तो थोडा नाराज झाला होता. आज ते सर्व मित्र खूप दिवसानी भेटत होते. पण त्याला असं मध्येच सोडून यावे लागले होते. त्याने तो विचार झटकून पार्थला जवळ घेतले. त्याच्याशी खेळता खेळता अर्धा तास निघून गेला. थोड्या वेळात सावी आली. मुलाचा एक गोड पापा घेवून ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
रात्री बेडरूममध्ये नैतिकने विषय काढला.
" सावी मी काय म्हणतोय, तू नोकरी का सोडत नाहीस?"
" नैतिक आपलं या विषयावर अगोदर बोलणं झालंय. पार्थ स्थिर होईपर्यंत मी नोकरी सोडण्याचा विचारही करू शकत नाही."
असे बोलून तिने कुस बदलली.
" अगं पण.. आपली धावपळ पाहतेस ना.. माझ्या पगारात होईल सारं नीट, तुझी काही सेविंग्ज आहेत त्याचे व्याज मिळेलच की, आता जशी तू फायनान्शियली इंन्डीपेंडट आहेस तशीच राहशील, तुझी आणि आपल्या बच्चूची हालत पाहवत नाही गं."
सावी काहीच बोलत नाही हे पाहून नैतिकही गप्प बसला.
सावी ऑफिसमध्ये गेली पण खुप अस्वस्थ होती. तिचं कामात लक्ष लागेना. तिला आज अर्चनाला भेटावेसे वाटत होते. पण ती तिचा कॉलच घेत नव्हती. न कळवता गेले तर भेट होईल की नाही याची खात्री नव्हती. तिने तिला व्हाट्सएपवर मेसेज केला. एरव्ही लगेच मेसेज वाचणारी आज चक्क व्हाट्सएप बंद करून बसली होती. सावीला कमाल वाटली. दोन तीन दिवसानी सावीने अर्चनाच्या घरची बेल वाजवली.
तिनेच दरवाजा उघडला.
"अगं अर्चू आहेस कुठे?"
"जमिनीवर." अर्चना हसत म्हणाली.
"थट्टा नकोय, मी चार दिवस कॉल आणि मेसेज करतेय, पण तुला ते पोहोचतच नाहीयेत." अर्चनाने किचनमधून हं केलं.
सावीला तिच्या घरात खुप बदल झालेले आढळले. अर्चनाच्या सासूबाई गेल्या तेव्हा ती आली होती. त्यानंतर आज प्रथमच ती अर्चनाला भेटत होती. इतक्यात आकाश बेडरूममधून बाहेर आला. तो नुसताच हसला आणि टेरेसकडे निघून गेला. 
" तू आज जेवायलाच थांब, मस्त फिशकरी बनवते" अर्चना तिला लिंबू सरबत देत म्हणाली.
" हे काय? लिंबू सरबत तयार झालं पण?" प्रश्न करत सावीने सरबताचा ग्लास तोंडाला लावला.
" अगं, तेच करत होते आणि तू आलीस."
" ते जाऊ दे, तू मला चार दिवसात एकदाही रिप्लाय का नाही दिलास?"
" मी गेले आठ दिवस आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स करतेय, त्याचे एक पथ्य म्हणजे मोबाईलचा वापर नाही." सावी हे ऐकून अवाक झाली होती. बेडरूममध्ये पिहूचा रडल्याचा आवाज आला तशी ती आत गेली. सावीही तिच्या मागोमाग आत गेली. 
" सावी मी जॉब सोडलाय." ती पिहूला उचलून घेत म्हणाली.
" काय? कधी?" सावी उडालीच.
" दोन महिने झाले."  अर्चनाने अतिशय थंडपणे उत्तर दिले.
" आकाशने सांगितले का? सगळे पुरुष तसलेच."
" नोकरी सोडण्याचा निर्णय आम्हा दोघांचा होता, किंबहुना माझाच."
" अगं तुमचे इएमआय आहेत ना? असा कसा वेडेपणा केलात?"
" आम्ही हा फ्लॅट विकलाय. पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या अंबरनाथच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ" अर्चना धक्क्यावर धक्के देत होती.
" अगं पण हा फ्लॅट तुम्ही प्रणवसाठी घेतला होता ना?"
" हो, पुढचे पुढे बघू." 
" अर्चू तू असं कसं बेजबाबदार वागू शकतेस गं?"
" सावी , आता आम्ही जबाबदारीने वागतोय, आता कुठे आमचे डोळे उघडलेत आणि ते उघडण्यासाठी डोळ्यातून बरेच पाणी वाहून गेलयं तेव्हा कुठे परिस्थितीची जाणीव झालीय."
" काय झालेय ते नीट सांगशील का?" सावी अर्चनाचा हात हातात घेत म्हणाली. त्याचवेळी तिच्या हातावर एक गरम थेंब पडला. ते अर्चनाच्या डोळ्यातील पाणी होते. ती अर्चनाला जवळ घेत थोपटू लागली. 
तेवढ्यात आकाश बेडरूममध्ये आला. दोघीही बाजूला झाल्या.
" आमच्या अर्चनाला रडवलसं ना?" असे मस्करीत बोलत तो निघूनही गेला.
" सावी, माझा नोकरी सोडायचा निर्णय आम्ही सहजासहजी घेतलेला नाहीये. मला चांगले आठवतय. त्या दिवशी आम्हा दोघांनाही शनिवार असून पण कामाला जावे लागले होते. प्रणवला पाळणाघरात सोडून मी ऑफिसला निघून गेले. आकाश अगोदरच गेला होता. पिहू आणि आई दोघीच घरी होत्या. पिहू लहान असल्यामुळे आम्ही तिला अजून पाळणाघरात ठेवत नव्हतो. आईंना दोघांकडे बघायला जमत नसल्यामुळे फक्त प्रणवला पाळणाघरात ठेवत होतो. दुपारी मी घरी फोन करून पिहूची आणि आईंची चौकशी केली. तोंडात घास जाईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. थोडे राहिलेले काम आटपून मी पाचला ऑफिसमधून निघाले. आकाशला नेहमीप्रमाणे उशीर होणार होता. घरी पोचले तेव्हा सहा वाजून गेले होते. मी बेल वाजवली तरी आई दरवाजा उघडत नव्हत्या. बराच वेळ बेल वाजवून पण दरवाजा उघडत नाही हे पाहून मी घरच्या मोबाईलवर कॉल केला. त्या कॉलही उचलत नव्हत्या. बराच वेळ झाला. मनात शंका कुशंका येऊ लागल्या. शेजारी जमा झाले. कोणीतरी दरवाजा तोडावा लागेल असे म्हणाले. मला काहीच सुचत नव्हते. मी, माझं लहानगं कोकरू आणि मातृतुल्य सासूबाई ठीक असूदे अशी प्रार्थना करत होते. थोड्यावेळाने दरवाजा तोडवा लागला. हॉलमध्ये अंधार पाहून काळजात धस्स झाले. काळजाचा ठोका चुकला. घशाला कोरड पडली. मी लगेच लाईट चालू केली. हॉलमध्ये कोणीच नव्हते. मी वेड्यासारखी बेडरूमकडे धावले. बेडरूममधील चित्र बघून मला भोवळ आली. चक्कर येण्यापूर्वी मला सासूबाईंचा पडलेला देह आणि त्यांच्या अंगावर पडलेले माझं कोकरू चांगले आठवते. मी शुद्धीत आले तेव्हा डॉक्टर आले होते. माझी नजर त्या दोघांना शोधू लागली पण आईं आम्हाला सोडून गेल्या होत्या. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला तेव्हा कळले,आई हृदयविकाराच्या धक्क्याने गेल्या. आमच्यासाठी तो मोठा धक्का होता. आकाश तर महिनाभर सावरला नव्हता. देसाई काका सांगत होते, पिहू रडून रडून आईंच्या अंगावरच झोपी गेली होती. तो क्षण काय असेल गं सावी? आईंना अटॅक आल्यावर पिहूला काय वाटले असेल किंवा आपल्याला काहीतरी होतेय आणि समोर नकळत्या वयाची नात. कल्पनाच करवत नाही गं. तो दिवस आठवला की मन सून्न होऊन जाते. आपले सून आणि मुलगा कामधंद्याच्या व्यापात व्यस्त पाहून माऊलीने आपला त्रास कोणाजवळ सांगितला नाही. अगोदर कळले असते तर सासूबाई गेल्या नसत्या. आता जर तर करण्यात काहीच अर्थ नाहीये. दिवसकार्य झाल्यावर मी माझा नोकरी सोडण्याचा निर्णय आकाशला बोलून दाखवला. त्यावर आम्ही बराच विचार विनिमय केला. गेलेल्या माणसांना परत आणणे शक्य नव्हते. पण सोबत असलेल्या माणसांची काळजी मात्र घेऊ शकत होतो. प्रणवच्या बेबी सीटींगच्या बाईकडून पिहू साठी विचारणा झाली. त्या बाई मुलांचा उत्तमरित्या सांभाळ करायच्या. पण आम्हाला या पुढे आमच्या मुलांना आई वडील असुन पोरकं करायचे नव्हते. त्यांच्यावर माया, प्रेम आणि उत्तम संस्कार करायचे होते. त्यांच्या साठी राब राब राबून, कर्जे काढून मालमत्ता न उभारता, त्यांना चांगले शिक्षण देऊन एक असं खणखणीत नाणं बनवायचं होते की ते कोणत्याही बाजारात वाजेल आणि शेवटपर्यंत खणखणत राहील. आम्ही हा प्रकार जास्त कोणाला सांगितला नाही, कुठेतरी आम्ही आम्हालाच दोषी मानत होतो"
सावीचे डोळे पाणावले होते. ती अर्चनाच्या चेहऱ्याकडे नुसती पाहत बसली होती. बाजूला आकाशही कधी येवून बसला ते दोघींना कळले देखील नाही.
"आपण मुलांसाठी सारं काही तयार ठेवायचा प्रयत्न करत असतो, पण यामुळे मुलं बेजबाबदार आणि आळशी कधी बनतात ते आपल्याला कळत देखील नाही. आई वडीलांनी मिळवून दिलेली सुरक्षितता त्यांना पांगळे बनवते. त्यांना आयत्या मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते. शेवटी हीच मुलं आई बाबाची किंमत करून त्यांना कवडीमोल ठरवतात. हे सारं पुर्णपणे टाळता येईल का माहीत नाही. पण आम्ही दोघांनी ठरवलयं, जास्त पैशाचा हव्यास न करता आपल्या कुटूंबासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा. गरजा काय मिळकत वाढली की वाढतच राहतात. प्रणव आणि पिहूला आई बाबांचे प्रेम मिळण्याचा हक्क आहे आणि मुलांचा तो हक्क कोणत्याही आईबापाला हिरावून घ्यायचा अधिकार नाही. मुलं लहान असताना त्यांना पाळणाघरात ठेऊन म्हातारपणी मुलं आपल्याला वृद्धाश्रमात न पाठवता आपल्या सोबत ठेवतील ही अपेक्षा करणे चुक नव्हे का? पाळणाघर आणि वृद्धाश्रमाचे कुठेतरी कनेक्शन जरूर आहे." आकाशला एवढे छान बोलताना पाहून अर्चनाही अवाक झाली होती. मितभाषी आकाश असं काही विचार करत असेल असे तिला बिलकुल वाटले नव्हते.
"तुम्ही ग्रेट आहात गं दोघं, खरंतर मी आज अर्चूची मदत घ्यायला इथे आलेले, नैतिकच्या डोक्यातून माझ्या नोकरी सोडण्याचा विषय जातच नव्हता. त्याला समजावून सांग असं अर्चूला बोलणार होती. पण तुम्ही माझे डोळे उघडलात. नव्हे चांगले अंजन घातलंत, आता माझ्या पार्थलाही मी खणखणीत नाणं बनवणार." सावी भावनेच्या भरात म्हणाली पण बोलण्यात एक ठामपणा त्या दोघांना दिसला.
इतक्यात सावीच्या मोबाईल वर नैतिकचा कॉल आला.
" हॅलो, कुठे आहेस गं?" 
" अरे, अर्चूकडे आलेय" तिला पुढे बोलवेना. तिचा कंठ दाटून आला होता. करीअरपायी नवरा आणि पार्थवर किंबहूना स्वतःवरही तिने खूप अन्याय केला होता. त्याचेच तिला कुठेतरी आत डाचत होते.
" सावी काय झालं गं?"
तिला पुढे बोलवत नव्हते. अर्चनाने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि बोलू लागली.
" भाऊजी तुम्ही पार्थला घेऊन आमच्याकडेच या".
" सावीला काय झालयं? ती ठीक आहे ना? काही सिरीयस नाहीये ना?"
" भाऊजी किती प्रश्न? काही झालेले नाहीये. ती थोडी भावूक झालीये, " असं बोलून तिने फोन ठेवला. 
सावी मनातल्या मनात नैतिकला सांगत होती. बस झाली ही नोकरी. आता मी दुसरी फुल टाईम नोकरी करणार. उद्या पासून रितसर गृहीणीपदाचा पदाभार सांभाळणार. 
" काय झालं गं? कुठे हरवलीस? नोकरी सोडलीस तर वेळ कसा जाईल हा विचार करतेस ? वेळ पुरणार नाही इतक्या गोष्टी आहेत."
"हं" सावी एवढे बोलून परत आपल्या विचारात गुंतली. 
समाप्त..
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८ 
दिनांक - २२.०८.२०१८
 
No comments:
Post a Comment