Wednesday, 10 October 2018

माझ्या नजरेतून १

माझ्या नजरेतून.. १

         सकाळीच चौकात लागलेला कांद्याचा टेम्पो पाहून मला कांदे घ्यायची आठवण झाली. पण ऑफिसला जायचे असल्याने संध्याकाळी घ्यायचे ठरवले. सहा महीन्यापूर्वी भरलेले कांदे संपत आले होते. मोबाईल मध्ये कांदे घ्यायचा रिमाईंडर लावून मी ट्रेन पकडली. काही गोष्टी लक्षात नाही राहत तर स्मार्ट फोनचा स्मार्टनेस वापरायला काय हरकत आहे?
पण कांदे आणलेल्या मामांचा चेहरा काही डोळ्यासमोरून हटत नव्हता. टेम्पोच्या फाळक्यावर बसून राहीलेल्या मामांच्या चेहऱ्यावर कसलीतरी काळजी दिसली. मला आजकालचा शेतकरी असाच काळजीत दिसतो. तो कामाच्या प्रत्येक टप्प्यावर काळजीत असतो. कधी निसर्गाची ,कधी पिकपाणी व्यवस्थित येईल की नाही , तर कधी आपल्या शेतमालाला चांगल भाव मिळेल की नाही याची काळजी त्याला पोखरत असते. शिवाय कुटूंबाची काळजी वेगळीच.

मोबाईलमध्ये रिमाईंडर वाजला तसे माझ्या लक्षात आले. सकाळी कांदे घेण्यासाठी लावलेला रिमाईंडर होता तो. म्हणजे  दिवसभरात तो टेम्पो, कांदे , ते काळजीत असलेले मामा आणि त्यांच्या बद्दल ट्रेनमध्ये आलेले विचार सारे कामाच्या गर्दीत विसरून गेलो होतो.
मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. रात्रीचे साडेसात वाजले होते. मी लांबूनच पाहीले ,सकाळचा टेम्पो अजूनही चौकात उभा होता. कांद्याच्या थोडाफार गोण्या संपल्या होत्या.
" मामा कसे दिले कांदे?" मी गोणीला हात लावत विचारले.
" नव्वद रूपयाला गोणी दिली बाबा."
" किती किलोची गोणी आहे?"
" नऊ."
मी मनात हिशोब घातला. बाजारात कांद्याचा दर पंधरा ते अठरा रूपये किलो होता . त्यामानाने इथल्या कांद्याचा दर खुपच कमी होता. कांदेही गोल, सुके आणि मध्यम आकाराचे होते.
इतक्यात तिथे एक जोडपे कांद्यांचा दर काढायला आले. मामांनी मला जी माहिती सांगितली तेच सर्व त्यांना सांगितले. ते जोडपे खुपच चिकित्सक निघाले.
" कांदे ओले नाहीत ना?"
" न्हाई मॅडम" मामानी नमूनादाखल ठेवलेले कांदे दाखवले. त्या जोडप्यामधील नवरोबाने गोणी उचलून पाहीली. सांगीतलेल्या वजनापेक्षा कमी वजन असल्यासारखे तोंड करत परत खाली ठेवली.
" कशावरून या कांद्यांचे वजन नऊ किलो आहे?"
" साहेब , हिथ वजन करायला काही न्हाई, पर आम्ही गोण्या भरताना वजन केलया"
" साधा वजन काटा नाही कसला धंदा करता रे तुम्ही?" त्या माणसाची मजल कांद्यावाल्या मामांचे वय विसरण्याइतपत गेली. कांदे घ्यायला बरीच लोकं आली होती. पण त्या माणसाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची साऱ्यानीच रि ओढली. मी लोकांना समजवायचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्यातला ग्राहक जागा झाला होता. सगळेजण तिथून निघून गेले होते. काळोखातही मामांच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसली.
" मामा काळजी करू नका, खपतील कांदे. उद्यापर्यंत नाही खपले तर मला कॉल करा."
" पोरा, उद्या दुपारपतूर, एवढं कादं सपायलाच पायजेल. कांदं न्हाई संपलं तरी उद्या रातच्याला घरी जावचं लागलं."
"पण तुमचा खूप तोटा होईल ओ." मी काळजीच्या स्वरात म्हणालो.
"नफा तोटा करायची ही येळ न्हाई बाबा, पोरीचं लगीन दोन दिसावर आलया. काय बी करून जाया लागलं" एवढे बोलून मामा समोर आलेल्या गिऱ्हाईकाला कांद्याचा दर न कंटाळता सांगू लागले.
त्यांचा काकुळतीला आलेला चेहरा पाहून मला राहवले नाही.
मी एक गोणी घेऊन त्यांना पैसे दिले आणि घरी निघालो.
घरी जाता जाता माझ्या मनातले विचार तडपडू लागले.
'खरचं शेतकऱ्याला किती लाचार व्हावे लागते ना? आजकालचे ग्राहक शेतमालाच्या बाबतीत फारच चिकित्सक झाले आहेत. कधी मॉल किंवा सुपरमार्केटमधील कोणत्याही वस्तूचे परत वजन केलयं? तिथे कधी घासाघीस केलीय? सिनेमाची तिकिटांची किंमत अव्वाच्या सव्वा वाढल्याचा कधी कांगावा केलाय? नाही. सगळ्यांना एक शेतकरीच सापडतो पारखून घ्यायला. अरे, शेतकऱ्याला कधी त्याच्या शेतमालाचे कॉस्टींग करून विकायची संधी मिळालीय का? कधी हमीभाव मिळाला आहे का? त्याचा नाशवंत माल आहे म्हणून मागणी पुरवठ्याच्या सिद्धांत पुढे करून किंमत कवडीमाल केली जाते, ज्या किंमतीत शेतकऱ्याचा साधा उत्पादन खर्च देखील निघत नाही. घेतलेले शेतीकर्ज डोईजड होते. गेली पंधरा वर्षे पाहतोय कांद्याच्या किंमती वीस रूपयाच्या वरती काही गेल्या नाहीत. बाकी वस्तूंची किंमत वाढली तरी कोणाला काही फरक पडत नाही. काही तर म्हणे रॉ मटेरियल महाग झाले, इन्प्रास्ट्रक्चरच्या किंमती वाढल्या. सगळे मान्य. पण हे सगळे शेतकऱ्यासाठी लागू का नाहीये. बि बियाणे खते यांच्या किंमती वाढत नाहीत का? शेतकरी आणि बैल मागच्याच मोलाने शेत नांगरतात म्हणून त्यांच्या मेहनतीला मोल नाहीये का. लहरी निसर्गासारखा लहरीपणा ग्राहकानी न दाखवता थोडा सूज्ञपणा दाखवलात तर आत्महत्या का होतील ?
नुसत्या विचारनी मामा सारख्या अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात काही फरक पडणार होता का ? नक्कीच नाही.
दुसऱ्या दिवशी मीच मामांना कॉल केला. त्यांचे बरेच कांदे खपायचे बाकी होते. मी त्यांचा फोन ठेवून माझ्या मित्राला कॉल लावला. तो एका झोपडपट्टी भागाचा पुढारी होता. तिथल्या लोकांच्या समस्यांसाठी झटायचा.
तर त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. तो ही त्या गोष्टीला तयार झाला. मी मामांना घेऊन त्याच्या झोपडपट्टी परीसरात कांद्याचा टेम्पो नेला. बाजारापेक्षा स्वस्त मिळणारे कांदे तिथल्या भागात हा हा म्हणता संपले. माझा हाफ डे कारणी लागला होता. मामांच्या चेहऱ्यावरची खुशी मला स्पष्ट दिसत होती.
शेवटी मला त्यांनी न राहवून विचारलेच.
" तुझ्या भागात कालपासना बसलोया पर अर्धा टेम्पो पण कांदं इकला गेला न्हाई आणि हीथं मला गिऱ्हाईकाला कांदं द्यायला येळ गावना, ह्यो चमित्कार झाला कसा म्हाणावं? "
" मामा, गरीबाला गरीबाची जाण असते, तो जास्त चिकित्सक नसतो. त्यांना त्यांचे भले करणाराच देव वाटतो. जसा माझा इथे काम करणारा पुढारी मित्र. त्याच्या शब्दाबाहेर कोणीच जात नाही. "
मामा माझ्याकडे डोळ्याभरल्या नजरेने पाहू लागले. जाताना मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला विसरले नाहीत.
मला त्याच्या मुलीच्या लग्नाला जाता नाही आले. पण जेव्हा ते पुढच्या वेळेला कांदे घेऊन आले तेव्हा एक बदल झालेला दिसला. टेम्पोमध्ये एक वजनकाटा दिसला. आता त्यांच्या शब्दात नक्कीच वजन येणार होते.

                              समाप्त..

© या लेखाचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ११.१०.२०१८

No comments:

Post a Comment