Monday, 12 March 2018

ओवाळणी


सकाळ पासूनच लक्ष्मीची लगबग चालू होती. खुप दिवसानी तिचा मुलगा घरी येणार होता. इतक्यात फाटक वाजले. कुत्रा नाचू लागला. सत्कार आला वाटतं. असं मनाशी बोलत लक्ष्मी बाहेरच्या पडवीत आली. समोरून सत्कार घराच्या दिशेने येत होता. तब्बल एक वर्षाने ती त्याला पाहत होती. लक्ष्मीने त्याच्या हातामधील बँग घ्यायला बघीतली. पण त्याने तिला तसं करू दिले नाही. लक्ष्मीही हे सर्व कौतुकाने बघु लागली.

रात्रीचा एक वाजला असावा. शरदरावांना झोप काही येत नव्हती. समोरच्या कॉटवरचे नवीन आलेले सामंत बिनधास्त घोरत होते. बाकी हॉलमध्ये असुन नसून कोणीतरी खोकल्याचा आवाज येत होता. डोक्यावर फिरणाऱ्या फँनसोबत शरदरावांचे विचारचक्र फिरू लागले.

शरदरावानी दोन वर्षे या वृद्धाश्रमात काढली पण आजच्या इतकी वाईट रात्र त्यांच्या नशिबी आली नव्हती. मुलाचे लग्न केले तसे त्याने रंग दाखवायला सुरूवात केली. त्याला आईने केलेली माया ,काळजी खटकू लागली. बापाचा धाक नकोसा होऊ लागला. त्यात शरदराव मुलाच्या बाबतीत खुपच उदार निघाले. सगळी संपत्ती एकुलत्या एका मुलाच्या नावावर करून दिली होती. शेवटी लग्नानंतर घरात चाललेली घरातली धुसपुस त्या दोघांना वृद्धाश्रमात पाठवूनच थांबली. मुलगा महीन्यातुन एकदा भेटायला म्हणण्यापेक्षा आश्रमात फी भरायला जायचा तेव्हा त्यांच्या खोलीत डोकावायचा. त्याचे डोकावने त्यांना नको वाटायचे. खरा त्रास तो निघून गेला की व्हायचा.

आजपासून बरोबर महीनाभर अगोदर त्यांची सुलू त्यांना सोडून देवाघरी गेली. बोलता बोलता सोडलेली साथ शरदरावांना सहन झाली नाही. ती गेली त्यादिवशी ते अक्षरशा लहान मुलासारखे रडले. मला ही तिच्या सोबत जायचयं असा हट्ट केला. त्यानंतर त्यांच्या बायकोचे महीनाभरात कार्य आटोपल्यावर परत त्यांची रवानगी आश्रमात झाली. त्यांना वाटलं होतं मुलगा बोलेल आई गेली तर तुम्ही आमच्या सोबतच राहा. पण कार्य झाल्यापासुन तोच त्यांना आश्रमात सोडायची संधी शोधत होता आणि एके दिवशी त्यांच्या हातून फुटलेल्या ग्लासाचे निमित्त होवून त्यांना तो खूप बोलला. शेवटी तेच आपला बाडबिस्तरा घेवून आश्रमात आले. त्यांच्या बायकोची जागा दुसऱ्या कोणाला दिली गेली होती. आश्रमात येऊन दोन दिवस झाले असावेत. त्यांना बायकोच्या आठवणी बेजार करायच्या. तिचा आयुष्यभर अनुभवलेला सहवास आठवायचा. ते कोणाशी फारसे बोलत नव्हते. रात्री खुप उशीरा झोप लागायची. आज तर अजिबातच झोप लागत नव्हती. मनात वेगळेच विचार चालू होते. ते कुशीवर कुस बदलत होते.
अशातच दोन तीन दिवस गेले. एके रात्री शरदराव अंगावरील कपड्यानिशी आश्रमातून पळाले. कुठे जायचे ते नक्की होते. फक्त तिथंपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता. खिशात मोजकेच पैसे. शरदराव बस स्टँडवर आले. शेवटची बसही निघुन गेली होती. सगळे झोपायची वाट बघण्यामुळे तसा आश्रमातून निघायलाच वेळ झाला होता. शरदराव मग हायवेला आले. पण कोणतेही वाहन उभे राहत नव्हते. बाजुलाच हॉटेल होते. ते एका टेबलावर चहा प्यायला बसले. पुढे पैसे पुरले पाहीजेत म्हणुन कटींग चहाच मागवला. बाजुला ट्रक ड्रायवर्स आपआपसात गप्पा गोष्टी, हास्यविनोद करण्यात मग्न होते. पण त्यांच्या फायद्याची एक गोष्ट कानावर पडली. एका ड्रायव्हरच्या तोंडून त्यांना जिथे जायचे असते तिथे पर्यंत जाणारा एक ट्रक असल्याचे समजले. फक्त त्या ड्रायवरचा ट्रक कोणता हे माहीत करणे गरजेचे होते. ते ही थोड्यावेळाने माहीत पडले . अंधाराचा फायदा घेवून ते मागच्या बाजुने ट्रकमध्ये चढले. ट्रकमध्ये बराच माल होता. पण आतमध्ये एका.कोनात जागा बघून बसले. त्यांना बरे वाटू लागले. खुप वर्षानी ते आपल्या गावी जात होते.
****
शरदरावानी सकाळी डोळे उघडले तेव्हा ते एका झाडाखाली होते. आजुबाजुचा अंदाज घेतल्यावर त्यांना त्यांच्याच गावाजवळच्या शहरात असल्याचे लक्षात आले. उठायला गेले पण पण डोक्यात तीव्र ठणक बसली. डोक्याला हात लावून बघीतले तर हाताला रक्त लागले. तेव्हा त्यांना ट्रकमध्ये एकदा जोरात आपटल्याचे आठवते. त्यामुळेच ते इतका वेळ बेशुद्ध होते. त्यांच डोकं ठणकत होतं. मेडीकल मध्ये जाऊन पेनकिलरचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला पण तिथे पाकीट नव्हते. जे काही तुटपुंजे पैसे होते ते देखील पाकीटातून गेले होते. ते दुकानातून माघारी फिरायला लागले . त्यांच्याकडे पैसे नाहीत ते दुकानदाराच्या लक्षात आले त्याने त्यांना परत बोलवले आणि पेनकीलरच्या गोळ्या दिल्या. त्याचे आभार मानून शरदराव निघाले खरे पण गावी कसे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. ते भुकने व्याकुळ झाले होते. त्यांना त्यांच्या गावी जाणारा मधला रस्ता आठवला. तोच त्यांच्या साठी एक मार्ग होता. लहान असताना तर याच वाटवरून शहरात ये जा करायचे. इथे त्यांना कोणीच ओळखत नव्हते.
ते मधल्या वाटेला लागले तेव्हा सुर्य बराच वर आला होता. दाढी वाढलेली. डोक्याला मार लागलेला. वाटेत लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. त्यांची थकलेली पावले घराच्या ओढीने पडत होती. पण आता आपल्या गावच्या घरी कोण असेल? खुप वर्षानी ते आज गावी जाणार होते. त्यांचे पैसा कमवण्याच्या नादात कधी गावी जाणे झालेच नव्हते. आक्काच्या लग्नाला गेले ते शेवटचे. त्यानंतर त्यांनी गावचे तोंडही पाहीले नाही. तो दिवस त्यांना चांगलाच आठवत होता. लग्नात आक्कासोबत झालेल्या भांडणामुळे त्यांनी गाव सोडले ते कायमचे. रागाचे कारणही शुल्लक. ते त्यांच्या बहीणीच्या लग्नात आपल्या भाओजींवरून काहीतरी बोलले. ते आक्काला सहन झाले नाही. ती शरदरावांना खुप बोलली तोच राग डोक्यात घालून मुंबईला आले आणि परत कधीच बहीनीकडे गेले नाहीत.

थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक विहीर लागली. लहानपणी विहीरीजवळच्या आंब्याखाली बसुन ते न्याहरी करायचे. विहीर तशीच होती पण आंब्याची सावली मात्र विकली गेली होती. तिथे थोडं पाणी पिल्यावर बरं वाटले. समोरच एक घाटी चढायची होती. ती चढून उतरल्यावर नदी पलीकडे एक गाव ओलांडून ते त्यांच्या गावात पोहोचणार होते. घाटी चढताना त्यांची खुपच दमछाक होत होती. पोटात तर भुकेचा डोंब उसळला होता. इतक्यात त्यांना घाटीच्या बाजुलाच काही पोरं गोळा झालेली दिसली. ते त्यांच्या जवळ गेले. शरदरावांची अवस्था बघुन पोरांनी त्यांच्या जवळचा करवंदाने भरलेला खोला ( झाडाच्या पानापासुन बनवलेला त्रिकोणी कोन) पुढे केला. पोरांची माया बघून ते गहीवरले. त्यांना आपल्या छोट्या नातवाची आठवण आली. ते ती करवंदे आधाशासारखी खाऊ लागले. खाताना मात्र त्यांना लहानपण आठवल्या खेरीज राहीले नाही. त्यांच्याजवळ पोरांना द्यायला काही नव्हते आशीर्वाद तेवढे देत पुढे चालू लागले. कशीबशी घाटी पार केल्यानंतर ती उतरणे पण जिकरीचे काम होतं. पण हळू हळू तीही उतरले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीचे पात्र कोरडेच होते. पात्र रूंद होते. दगडातून चालताना त्यांना खुप कष्ट पडत होते. पण गावी पोचत असल्याचा आनंदामुळे हा त्रास नगण्य होता. नदी पार करून जेव्हा वडाचे झाड आले तेव्हा तिथे ते क्षणभर बसले. दुपारचे ११ वाजले असावेत. फक्त एक गाव पार केला कि ते आपल्या घरी पोहोचणार होते. ते उठून चालायला लागले. थोडे पुढे गेले असतील इतक्यात झुंज लागलेले दोन बैल त्यांच्या दिशेने येत होते. त्यांचा त्यांना हाकलण्याचा प्रयत्न असफल ठरला त्यातला एक बैल त्यांच्या मागे लागला. त्याला चुकवण्यासाठी ते पळू लागले पण बैलाने त्यांना गाठायच्या आधीच ते एका बांधावरून खाली पडले. त्यांना उठता येईना. बैल बांधावर उभा पाहून काळजात धडकी भरली पण काही वेळाने बैल तिथून निघून गेला. शरदराव मात्र तिथेच विव्हळत राहीले आणि त्यांचे डोळे उघडले ते एका घरात.

डोळे किलकिले करून त्यांनी अंदाज घेतला संध्याकाळ झाली असावी. तुळशीकडे दिवा लागणी चालू होती. वातावरणात अगरबत्ती आणि धुपाचा वास मिसळल्यामुळे एक आगळेच आत्मीक समाधान लाभत होते.
"बरं वाटतयं का?" लक्ष्मीने त्यांना विचारले.
ते तिच्या कडे पाहतच राहीले.
" हो , बरं वाटतयं, डोकं ठणकतयं थोडं आणि बोलताना त्रास होतोय" ते थोडे अडखळत म्हणाले.
"डॉक्टर येऊन गेले, गोळ्या दिल्या आहेत, मी काहीतरी खाऊला देते, ते खाऊन गोळ्या घ्या" असे बोलून ती आत गेली. शरदरावांना मात्र विचार तंद्री लागली.
आत लक्ष्मीबाई मात्र विचारात पडली. आपण या माणसाला घरात उचलून आणलेय खरं पण लोकं काय बोलतील? मुलगा काय बोलेल? आजची रात्र आश्रय देऊन उद्या त्यांना जायला सांगू. आजारी माणसाला जायला तरी कसं सांगणार? मुलगा आल्यावर काय बोलतो बघु. विचार झटकून त्या कामाला लागल्या. थोड्यावेळात सत्कार आला. पडवीत चोपाळ्यावर एका म्हाताऱ्या माणसाला झोपलेला पाहून, ' आज आईने कोणावर तरी दया दाखवली आहे' असे मनाशी बोलत थेट आई कडेच गेला. लक्ष्मी तोच यायची वाट बघत होती. तिच्याकडून त्याला सारा प्रकार समजल्यावर सत्कारही विशेष आश्चर्य वाटले नाही. तिची भुतदया त्याला चांगलीच माहीत होती.
"आई काही काळजी करू नको, ते पुर्ण बरे होई पर्यंत मी पाहतो त्यांच्याकडे" असे बोलून त्यांच्या साठी गरम पाणी काढायला गेला.
शरदराव काही न बोलता आंघोळ करत होते. गरम पाण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रुच जास्त कढत लागत होते. माणसाला चढलेली धुंदी सगळ्याचा घात करते. मग ती पैशाची असो, तारूण्याची , ताकदीची वा सौंर्दयाची असो. मात्र कालांतराने यातले काहीही चिरकाल राहणारे नसते. सारेच नश्वर. इथेच गफलत होते. शरदरावांच्या बाबतीत पण असचं झालं असावं. पैसा आणि स्वत: पुरता विचार करण्याच्या वृत्तीमुळे त्यानी जवळच्या माणसांना तोडत गेले.
सत्कारचे कपडे घालताना शरदराव संकोचले. दुसरा पर्याय नव्हता. सत्कारने त्यांच्या खिशामधील पाकीट बाजुला ठेवत त्यांचे कपडे धुवायला टाकले.
रात्री सर्व जेवायला एकत्र बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. शरदराव मात्र बरं नसल्याच्या कारणावरून बोलणे टाळत होते.
****
भल्या पहाटे शरदरावांना जाग आली तेव्हा स्वयंपाकघरात घावने करण्याचा आवाज येत होता. तो आवाज ते खुप दिवसानी ऐकत होते. बाहेर सत्कार अंगण झाडत होता. किती प्रसन्न सकाळ होती. ह्या सुखापुढे जगातली सगळी सुख नगण्य आहेत. ते आळस झटकून उठले. उन्हाळा असुन पण थोडीफार थंडी होतीच. ते सत्कारच्या हातातली झाडू घेऊन झाडू लागले. लहानपणी आक्का आणि तो अंगणापासून अगदी आजुबाजुच्या पांदी (वाटा) झाडून काढायचे. त्यावेळी झाडायची शर्यत बघण्यासारखी असायची. आज पण शरदरावानी सगळी वाट झाडून काढली. लक्ष्मी आणि सत्कार त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने बघत होते.

पडवीच्या ओट्यावर बसून आंब्याखोबऱ्याची चटणी सोबत घावने खाताना शरदरावाना खुप बरे वाटत होते. मनात कुठेतरी काहीतरी सलत होतं. आज सुलू असायला हवी होती. तिला ह्या सर्वांची खुप आवड होती. ती गावी जाण्यासाठी सारखी मागे लागायची पण शरदरावांनीच तिला आणि मुलांना कधी गावी आणले नाही. आज त्याची खंत त्यांना जाणवत होती.

शरदराव न्याहरी करून झाल्यावर सत्कार सोबत बागेत जायला निघाले तसे लक्ष्मीने त्यांना टोपी दिली. त्यांच्या सगळ्या क्रिया यंत्रवत होत होत्या. दोघांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे ते भारावून गेले होते. ते बागेत पोचले. सत्कारने लगेच पाण्याचा पंप चालू केला. नदीशेजारी असलेली बाग सत्कारने छान फुलवली होती. नारळ, सुपारी, केळी, मसाल्याची झाडे, फुलझाडे, पेरूनी लगडलेले झाड आणि नदीशेजारी असलेले आंब्याचे झाड सारं काही नयनरम्य होतं. इथून कुठे जाऊच नये असं वाटत होतं. पंपातून फोर्सने बाहेर फेकले जाणारे धुधाळ पाणी पाटातून पुढे जाताना वेगळीच गंमत वाटत होती. लहानपणी त्यांचे वडील रहाट चालवायचे. त्यावेळी आक्का आणि ते पाटातल्या पाण्यात तासंतास खेळत बसायचे. पायाने रहाट मारून घामाने डबगबलेले बाबा हे सारं कौतुकाने पाहायचे. त्यांचे एकच म्हणणे असायचे. खेळा पण पाट फोडू नका.
आज पण त्यांना पाटात हात घालून पाणी उडवावेसे वाटले आणि त्यांनी तसं केलं देखील. हे पाहून सत्कारला गंमत वाटली. किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असत़ो ना ? आणि आपण मात्र महागड्या गोष्टीत आनंद शोधत असतो.

दुपारचे जेवन आटोपल्यावर शरदराव पुढच्या पडवीत झोपले होते. सत्कारही त्यांच्या बाजुला पहूडला होता. जेवनाच्या अंमलामुळे दोघेही झोपेच्या आधीन गेले. तासाभराने शरदरावांना कशाने तरी जाग आली. परत झोप लागेना. देवाच्या खोलीत लक्ष्मी भिंतीवरच्या पोटोकडे तोंड करून उभी होती. तिचा चेहरा काही त्यांना दिसत नव्हता. ते उठून मागच्या खिडकीजवळ आले. आता आतील चित्र शरदरावांना स्पष्ट दिसत होते. लक्ष्मी बघत असलेला भिंतीवरील फोटो बघून त्यांना गहीवरून आलं. तिथेच खाली बसून ते स्फुंदू लागले.
का वागतोय आपण असं? ज्या बाईने आपल्याला घरी आणले. आपण कोण आहोत हे माहीत असून सुद्धा आपली एवढी काळजी घेतली. तिच्याशी असे वागण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाहीये. तिला आपण शुद्धीवर आलो तेव्हाच ओळखले. माझी आक्का . जिच्या सोबत माझं बालपण सरलं ती माझी आक्का, माझी सख्खी बहीन आणि मी तिला ओळखून सुद्धा माझी ओळख दाखवली नाही. ती मला बघून कशी रिअँक्ट होईल. ही भीती वाटत राहीली. इतकी वर्षे झाली. मी साधी विचारपुस देखील केली नाही किंबहूना ती माझ्या विस्मृतीमध्येच गेली होती. रक्षाबंधन , भाऊबीजसाठी स्वत:ची बहीन असून पण बाहेरच्या बहीनी मानल्या. किती निष्ठूर वागलो तिच्याशी आपण? आणि ती मात्र आम्हा भावंडाचा फोटो बघून भावनाविवश होतेय. लाज वाटतेय मला एक भाऊ असल्याची.
इतक्यात झोपलेला सत्कार कशाला तरी बाहेर आला. विचारात गुरफटून गदगदणाऱ्या शरदरावांना पाहून सत्कार आश्चर्यचकीत झाला. तो त्यांच्या जवळ गेला. त्याची जाग झाली तशी शरदरावानी आपले डोळे पुसत हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. डोळ्यातून थांबत नसलेले पाणी मात्र सत्कार पाहील्याशिवाय राहीला नाही. ते का रडत असावे त्याला काहीच कळत नव्हते.
" काय झाले ओ?" सत्कारने त्याना विचारले.
पण ते काहीही न बोलता तिथून निघाले.
सत्कारला काहीतरी आठवले तसा तो घरात आला.
शरदरावांची त्या दिवशीची रात्र मात्र संपता संपत नव्हती. सत्कारची अवस्थाही काही वेगळी नव्हती. सकाळ झाली. सत्कारला अंथरूणातून उठवत नव्हते. बाहेर कसला तरी आवाज आला. बाहेर येऊन पाहतो तर शरदराव कपडे घालून जाण्यासाठी बाहेर पडत होते.
"मामा कुठे जाताय?" सत्कारच्या तोंडून मामा हे शब्द ऐकून त्यांना आश्चर्य वाटले.
" कोण मामा? "
" तुम्ही मामा, माझ्या आई पासून सगळे पाश तोडलेला एक भाऊ आणि आज कुठे, बंध परत जुळायला पाहताहेत तर परत त्याला गाठी मारून तोडायला बघताय"
" तुला कसं कळलं? "
" ते महत्वाचे आहे का? पण तुम्ही हे नाते का नाकारताय? तुमची परिस्थिती मला त्या एका ओळखपत्रावरून कळलीय. "
"कसले ओळखपत्र, काय बोलतोस तू?"
"तुम्हाला सगळे समजतय पण समजून घेत नाही आहात. खरंतर आम्हाला समजलेच नसते, काल तुमचा रडवेला चेहरा पाहून मला तुमचे पाकीट पाहावेसे वाटले आणि त्यात मिळालेल्या वृद्धश्रमाच्या ओळखपत्राने सारं काही समजलय. मी हे आईला सांगीतले नाहीये. पण त्या माऊलीची प्रतिक्षा अजून लांबणीला नकोय. तुमची वाट बघून थकलीय ती. तुम्हा भावंडाच्या फोटोला तिचा रोज अभिषेख असतो. एखाद्या चातकासारखी वाट बघत असते आणि आता तुम्ही येऊन गेलात हे कळले तर ती सावरण्या पलीकडे जाईल." सत्कार आणि शरदरावांचे बोलणे ऐकत लक्ष्मी मात्र थरथर कापत असताना डोळ्यातून तिचे अश्रू घरंगळत होते. मनात विचारांचे थैमान चालू होते. दोन दिवस त्याची सेवा करून आपल्याला ओळखता आलं नव्हते आणि त्यानेही ओळख दाखवली नव्हती. खरचं बदलला शरददादा शरीराने आणि मनाने पण. किती थकलेला दिसतोय. वहीनी कुठे असेल?
" तु बोलतोय ते पटतेय मला, पण तिच्या समोर जायची हिंम्मत होत नाहीये, किंबहूना माझी लायकीच नाहीये" असे बोलून ते घाईघाईने निघायला बघतात आणि सत्कार त्यांना अडवायला पाहतो.
" जाऊदे त्याला, आपल्या नशिबात नाहीये तो" आतून खोलीतून सर्व ऐकत असलेली लक्ष्मी बोलते. आक्काला सगळे बोलणे ऐकलेले आहे समजल्यावर शरदराव शरमतात.
"आक्का असं नाहीये, कोणत्या तोंडाने इथे राहू? मी आपल्या नात्याचा केव्हाच गळा घोटलाय, , आता राहीलाय तो नाजुकसा प्राण. हे अपराधीपण घेवून मला इथे राहवणार नाही. तुझ्यावर आम्ही भावानी खुप अन्याय केलाय, खुप दुख: दिलेय, त्याची भरपाई काही केल्या होणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पण तुच कामाला आलीस, उन्हात पडलेल्या या म्हाताऱ्याला त्याची ओळख न बघता आणून सेवा केलीस आणि उपकाराच्या ओझ्याखाली आणलस." शरदराव म्हणाले.
"उपकाराची भाषा करून आम्हाला अजून परका करतो आहेस. मला सवयचं आहे कोणी टाकलेले उचलून आणायची. तसाच सत्कारला आणला आणि त्या दिवशी तू पडलेला दिसला , तुलाही आणला उचलून, पण मलाच सगळ्यानी बाजुला टाकले, कोणीही वाळीत टाकलेल्या भावनेतून मला वर काढले नाही. गरीबा घरची म्हणून या लहान बहीनीकडे कधी आलात नाही कि कधी साधी चौकशी केली नाहीत. सत्कार मात्र मामा कुठे असतात गं , सारखं विचारायचा, मग जसा जसा तो मोठा झाला, तसा तोही विचारायचा बंद झाला. कदाचित आई बाबा असते तर तुम्ही गावी आला असता , माझे लग्न करून दिल्यानंतर तू तर एकदाही भेटायला आला नाहीस. एवढा कसला रे राग? मानेत मान घालून आपलं बालपण गेलं, खेळलो, बागडलो आणि लग्नाच्या वेळेचे माझे बोल एवढे लागले तुला? दादा दोनदा आला होता नंतर तो ही यायचा बंद झाला. पहील्यापासुनच मला गृहीत धरलात. आपल्या बहीनीला काय कळतयं, तिला कुठे आहेत भावना, तिला ना रक्षाबंधन ना भाऊबीज. वर्षातले ते दोन दिवस माझ्या जखमा ताज्या करून जायचे. मग माझा नवराच माझा भाऊ बनायचा, माझ्या कडुन राखी बांधुन घ्यायचा, ओवाळून घ्यायचा. त्याने सगळी नाती सांभाळलीत. आई वडील गेले आणि नंतर तुम्हीही दुरावलात. पण माझ्या नवऱ्याचा आधार माझ्या जगण्याला महत्व देत होता. सत्कार आमच्या आयुष्यात येईपर्यंत आम्ही खुप सहन केलय. तोही आमच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आला. कोणीतरी कोवळ्या जिवाला हॉस्पीटलच्या कचरा पेटीत टाकला होता. मुलासाठी आसुसलेल्या आम्हा उभयताना राहवले नाही. आणले त्याला घरी. तुम्ही तुमच्या संसारात रमलात, मी ही त्यात डोकावले नाही, माझा नवरा सांगायचा , एकदा जाऊन येऊ तुझ्या मुंबईतल्या भावांकडे. ते नक्की ओळखतील. पण मलाच भीती वाटायची. तिथे गेल्यावर माझ्या जखमेवरची खपली काढली जाईल. तुम्ही ओळख दाखवली नाहीच तर? या भीतीने कधी यायचे धाडस केले नाही. "
"आक्का तुला एवढा विसरून गेलो होतो मी कि मुलाने वृद्धाश्रमात टाकले तरीपण तुझी आठवण झाली नाही. माझ्या गावाला जाताना तुझा गाव लागतो हे देखील विसरलो होतो. तिथे जर त्यादिवशी पडलो नसतो तर आपली भेट झाली नसती. " आपल्या भावाची मुलाने केलेली दयनीय अवस्था ऐकून लक्ष्मीला हूंदका आवरला नाही. कसा वागला असला तरी रक्ताचा भाऊ होता तो.

"मध्यंतरी तुझा नंबरही मिळवला होता. एक दोनदा तुला फोन लावायले गेले पण मनात एक अनमिक भीती राहीलीच आमच्या परीस्थितीची.  पुढे तोच नंबर लागेनासा झाला."

"कसा लागणार मुलाने माझ्याजवळून फोनच काढून घेतला, म्हणायचा, वृद्धाश्रमात फोन कशाला हवा? खर सांगू तुला पहील्यांदा पाहून मला मनातून खुप आनंद झाला. पण ओळख दाखवायचे धाडस मात्र मला झाले नाही, मनात अस्वीकृतीची भीती आणि तुझ्या संसारात माझी ढवळाढवळा का ? मुलाने बाहेर काढल्यावर बरी आक्काची आठवण झाली? असे अनेक प्रश्न मला जाब विचारू लागले. मनात एवढे सारे गिल्ट घेऊन मी इथे कसा राहू? चार दिवस सेवा केलीस तेच खुप आहे.
"दादा एक बोलू का?
"बोल "
"मला तुझ्याकडे काहीतरी मागायचेय. देशील मला?
" माझ्याकडे देण्यासाठी आता काही उरलेय असे वाटत नाही"
" मी ओवाळणी मागतेय असं समज. तु आमच्या सोबत कायमचा राहशील?" लक्ष्मी असे म्हणाल्यावर शरदरावांची मान मात्र खाली गेली. तिच्या नजरेला नजर भिडवायची हिंम्मत त्यांना झाली नाही. सत्कार त्या दोघांकडे बघत राहीला. भावाची खाली गेलेली मान वर करत लक्ष्मी बोलली.
"दादा, मी असताना तरी तुला मान खाली घालायची गरज नाहीये. "
लक्ष्मीचे हे शब्द ऐकून शरदरावांचे डोळे भरून आले. घसा सुकला. त्यांना बोलायचे असून पण शब्द बाहेर पडत नव्हते. त्यांच्या डोळ्यात आलेले पाणीच सर्व सांगून जात होते.
एवढ्यात कुठेतरी दुरवर गाणं ऐकायला येत होतं
फूलों का तारों का, सबका कहना है ।
एक हज़ारों में मेरी बहना है ।
सारी, उमर, हमें संग रहना है ।

समाप्त...
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------

लेखक - नितीन राणे.
सातरल - कणकवली
९००४६०२७६८

No comments:

Post a Comment