Sunday, 25 November 2018

गिअरवाली सायकल

©गिअरवाली सायकल

मी दुपारच्या वेळेत ऑफिसमधून घरी फोन केला.
"नैतिक शाळेतून आला का?"
"शाळेतून यायला तो शाळेत गेलाय कुठे? सुमा म्हणाली
"म्हणजे? "
"सकाळपासून रूसुन बसलाय, गालावरचे फुगे काही कमी झालेले नाहीत."
" मी काय म्हणतोय सुमा, देऊया ना गिअरवाली सायकल त्याला." मी नैतिकचा रूसवा घालवण्यासाठी सुमाला म्हणालो.
"काही नको हा. मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेली सायकल आहे ना त्याच्याकडे? शिवाय नलूने या वाढदिवसाला डेलचं नोटबुक दिलंय. आपणही त्याला हवं असलेलं सारं काही दिलयं." सुमा आपल्या मतावर ठाम होती.
फोन चालू असताना काहीतरी पडल्याचा आवाज झाला.
"काय झालं गं?"
"नैतिक वादळ.." असे बोलल्याबरोबर मी समजलो.
"त्याला काहीतरी खायला दे", असे सांगून मी फोन ठेवला.
घरातली नैतिकची आदळआपट सुमा जोरात ओरडली तेव्हा थांबली.
ऑफिसचे काम आटपून मला दुसऱ्या दिवशी साईट व्हिजिटला जायचे होते. रात्री आठ वाजेपर्यंत काम आटपून मी घरी आलो. नैतिकचा वडा अजून फुगलेलाच होता. असे हट्ट करायला तो आता लहान नव्हता. माझ्या हाताने नैतिकला जबरदस्तीने थोडं दुध भरवलं आणि माझ्या बाजुलाच झोपवलं. नैतिकसाठी त्याची आई त्याला दुष्मन वाटत होती. हट्टापायी त्याने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी रोजच्यापेक्षा लवकरच बाहेर पडलो. मी घरातून निघत असतानाच नैतिक उठून बसला. त्याने माझ्या पायाला विळखा घातला. माझ्या सोबत येण्यासाठी रडू लागला. मला वाईट वाटले. सुमाची समजूत काढून त्याची पटापट तयारी करायला लावली. फिरण्याच्या नादात सायकलचे विसरून जाईल असा माझा समज त्याने घराच्या गेटजवळच चुकीचा ठरवला.
"बाबा, आपण येताना सायकल घ्यायची ना?"
" हं" त्याचे मन राखण्यासाठी मी नुसताच हुंकार भरला.
मला आज तळोजा साईटवर जायचे होते. आम्ही साईटवर पोचलो तेव्हा उन्हं बरीच वर आली होती. रोजच्या वातानुकुलीत वातावरणाच्या सवयीमुळे अंगातून चांगलाच घाम निघत होता. नैतिकही दमल्यासारखा वाटत होता. सारे कामगार कामात मग्न होते. मी साईट ऑफीसमध्ये बसून माझी तिथली कामं आटपू लागलो. नैतिक बाहेर बघत बसून राहीला. नैतिकचे मध्येच येणारे कुतूहल मिश्रित प्रश्न ऐकून मला हसू येत होतं. त्यामुळे वॉचमन काकांचीही चांगलीच करमणूक चालली होती. बिल्डिंगचे बरेचसे काम पूर्ण होत आले होते. किरकोळ सामान वगळता बिल्डिंग समोरचे मैदान रिकामे झाले होते. एका कोपऱ्यात कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या होत्या. तिथे समोरच कामगारांची काही मुलं वाळुच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. इतक्यात एक मुलगा जोरजोरात रडू लागला. पण त्याच्या रडण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्याचे वडील कामात गुंतल्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्षच नव्हते.
मी ऑफिसच्या बाहेर आलो. माझ्या मागून माझे नैतिक शेपूटही बाहेर आले. मी त्या रडणाऱ्या मुलाजवळ गेलो. तो खुपच कुपोषित वाटत होता. चेहऱ्यावर कमालीचे कारूण्य होते.
"काय झालं?" मी त्याच्या जवळ जात विचारले.
त्याने छोटी प्लास्टिकची गाडी ओढत नेणाऱ्या मुलाकडे बोट दाखवले.
मी त्या गाडी ओढत नेणाऱ्या मुलाला हाक मारली. पण तो थांबायला तयार नव्हता. पण एका ठिकाणी तो थबकला.
"बा, गण्यानं आपली सायकल पळीवली" असे बोलून तो समोर आलेल्या माणसाला बिलगला.
"काय झालं साहेब?" तो कामगार मला विचारू लागला.
" बहुधा या मुलाची सायकल तुमच्या मुलाने घेतलीये. नक्की काय ते मला माहिती नाहीये, पण हा खुप रडतोय." मी रडणाऱ्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो.
" सायेब, आसं काहीबी न्हाई, ही सायकल माझ्या माघारणीनं भंगार गोळा करताना कालच्याला माझ्या पोरासाठी आणली व्हती" हे ऐकून मी अवाक झालो.
इतक्यात रडणाऱ्या पोराचाही बाप तिथे आला.
"व्हय सायेब, ती सायकल त्यांचीच हाय, हा लयच रडत हूता, तवा वयनीस्नि सांगून दोन दिसासाठी मागून घेतलीया"
"अरे पण , दोन दिवसानी परत द्यावीच लागली असती ना"
"व्हय, पर पोरगं लयच रडत व्हतं"
"ते ठीक आहे पण, इतरही मुलं दुसरे खेळ खेळतात ना.."
" व्हय सायेब, पर आसले पळापळीचे खेळ खेळले की पोरास्नी भुक लागतीया. माझ्या मजुरीत येका येळचं भागताना मुश्कील, त्यात माघारीण आजारी आसतीया. तिनंच पोराला बजावलयं.. खेळू नगंस भूक लागंल. मग पोरगं असं दारात बसून आसतया. कालच्याला लयच दया आली तवा ती गाडी मागून घेतली" असे बोलून त्याने आपल्या पोराला जवळ घेतले. पोराला नवीन गाडी आणून देण्याचे आश्वासन देत त्याला पत्र्याच्या झोपडीत सोडले. ते पोरगंही बापाचे ऐकत झोपडीच्या दाराशी बसून राहीले. या सगळ्या प्रकाराने मी हादरलो होतो. बराच वेळ माझ्या मागे उभा असलेला नैतिक माझ्या पायाना मिठी मारून रडू लागला.
"हे बेटा काय झालं रडायला?"
"बाबा आपल्याकडे माझी छोटी सायकल आहे ती गणूला देऊया का?" तो रडत रडतच मला विचारू लागला. त्याला हा प्रकार न समजण्या इतका तो आता छोटा नव्हता.
मी हो म्हणाल्याबरोबर तो धावतच गणूच्या झोपडीकडे निघाला. सोबत आणलेला केक गणूला देत त्याच्या बाजूला बसला. माझं लक्ष नैतिककडेच लागले होते. तो त्यांच्या झोपडीत शिरला तसा मी तिकडे निघालो. मी तिथे पोहचेपर्यंत तो बाहेर आला आणि दुसऱ्या झोपडीत शिरला. मी त्याला न अडवता त्याच्या त्या कृतीकडे पाहतच राहिलो. त्याने भराभर साऱ्या झोपड्या नजरेखाली घातल्या. त्याचा चेहरा कमालीचा दुःखी झाला होता.
"बाबा , मला गिअरवाली सायकल नको. त्याच पैशात आपण या सर्वांसाठी काहीतरी आणूया" नैतिकच्या देहबोलीतून तो असं काहीतरी बोलेल असं मला वाटले होते. त्याचा योग्य वेळी बदललेला गिअर पाहून बरे वाटले. पण गरीब सामान्य लोकं असा पण विचार करतात याने मला धक्का बसला होता.
इतक्यात घरून सुमाचा फोन आला.
"हॅलो, कधी निघताय? आणि आपले नैतिक वादळ शमले की नाही?"
"आपल्या नैतिकने गियर बदललाय गं, आम्ही निघतोय इकडून.." माझा आवाज जड झाला होता. नैतिकचा गोड पापा घेवून मी मोटारसायकल स्टार्ट केली.
समाप्त...

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - २७.०९.२०१८


Saturday, 3 November 2018

अन्न हे पूर्णब्रह्म

©अन्न हे पूर्णब्रह्म

"आई आज टिफीनमध्ये भाजी कोणती दिलीय?" तेजसने केस विंचरताना विचारले.
" वाटाण्याची उसळ. " तो खुश होईल म्हणून प्रमिलाताई तेजसकडे पाहू लागल्या.
" काय गं, आज पण वाटाण्याची उसळ?"
" तुला आवडते ना?"
" हो, पण त्या दिवशी पण केली होती ना?"
" कोणाला म्हणे वाटाण्याची उसळ, कधीही दिली तरी नको होणार नाही एवढी आवडत होती." प्रमिलाताई लेकाकडे पाहून हसल्या.
" आई मी सिरियसली सांगतोय, मला ही वाटाण्याची उसळ नकोय टिफीनमध्ये " तेजस चिडतच म्हणाला.
" मग , रात्रीची भरलेले कारले देऊ का?"
" आई, हे अति होतय, तुला माहीत आहे ना मला कारले अजिबात आवडत नाही ते"
" अरे मग , तुला आवडती भाजीही आवडत नाही आणि नावडतीही आवडत नाही" असे बोलून त्या किचनमध्ये गेल्या. लेकासाठी एका डब्यात दही भरून घेऊन आल्या. ते पाहून तेजस वैतागलाच.
त्याने काही न बोलता फक्त चपातीचा डबा घेवून तो बॅगमध्ये भरला. काही वेळात ऑफिससाठी निघूनही गेला.

प्रमिलाताईना हे नवीन नव्हते. एकुलता एक लेक म्हणून त्याचे सारे नखरे सहन करत होत्या. बरं नवरा आणि मुलाचे वेगवेगळे नखरे होते; ते सांभाळताना त्यांची त्रेधातिरपीट उडायची. नखरे जरी नसते तरी रोज रोज काय भाजी करायची हा यक्ष प्रश्न बायकांपुढे असतोच.

तेजस ऑफिसमध्ये पोचला तेव्हा दहा वाजून गेले होते. वाटेत त्याला संकेत दिसला.
" अरे तेजस आज टिफीनमध्ये भाजी काय आहे?" त्याने मिटक्या मारत विचारले.
" तू सकाळीच डोक्यात नको जाऊस, बँगलोरला पाठवायच्या लायब्लिटी स्टेटमेंटचे काय झाले ते सांग." तेजस आपल्या डेस्कवर बॅग ठेवत म्हणाला.
" अरे मी ते मेल करणारच होतो पण केतकीने आणलेल्या आंबोळ्या दिसल्या आणि त्या मस्त चहासोबत मटकावल्या." हे ऐकून तेजसने कपाळावर हात मारला.
" तुम्हाला खाण्याशिवाय काही दिसत नाही काय रे?" हे ऐकायला संकेत तिथे नव्हता, हे पाहून तो अधिकच चिडला.

तेजसची दुपारपर्यंत चिडचिड चालूच होती. त्यात आज ऑफिस प्युन आला नव्हता . सगळी छोटी मोठी कामे त्यालाच करावी लागत होती.
'लंच ब्रेक झाला' असे सगळ्यांना सांगत संकेत त्याच्या डेस्ककडे येताना दिसला. तेजसनेही आवराआवर करत बॅगमधून टिफिन काढला. आपण भाजी आणली नाहीये हे त्याच्या लक्षात आले. बॅगच्या मागच्या कप्प्यामधून आपले वॉलेट काढत तो जाऊ लागला.
" हे काय? तू कुठे जातोयस?" संकेतने त्याला अडवत विचारले.
" अरे मी आज भाजीच आणली नाहीये, ती आणायला खाली जातोय."
" माझ्याकडे आज खुप आहे भाजी, त्यातली घे."
" काय आहे भाजी?"
" माझी आई सांगते असले प्रश्न कधी कधीच विचारायचे नाहीत, समोर आलेल्या अन्नाची स्तुती करत ते पोटात घ्यायचे." संकेतचे हे अन्न तत्वज्ञान ऐकून तेजस हसला.
" बरं, मला तुम्ही कोणते चविष्ठ पक्वान्न चपातीसोबत खायला देणार आहात ?" तेजसने हसत विचारले.
" आईने, क्रीस्पी, डीलिशिअस आणि माउथवॉटरींग असा पदार्थ टिफीनमध्ये दिलाय, ओळख बघू." संकेत अभिनय करत सांगू लागला.
" बटटाट्याची कापं?"
" नाही, माय फेवरेट भरलेले कारले." असे बोलत संकेत खोखो हसत सुटला. त्याला माहीत होते कि तेजसला कारले हा प्रकार अजिबात आवडत नाही. पण त्याला चिडवायला संकेतला मजा यायची. संकेतच्या हसण्यावर रिऍक्ट न होता तेजस भाजी आणायला निघून गेला.

तेजस मनातल्या मनात ऑफिस प्यूनला बडबडत हॉटेलजवळ पोचला. तो असता तर त्याला खाली उतरायला लागले नसते.
हॉटेल काउंटरला पैसे द्यायला त्याने वॉलेट उघडले असता त्यात फक्त त्याला दहा रूपये असल्याचे दिसले. पार्सल तसेच ठेवायला सांगून तो एटीएम सेंटरकडे निघाला. जवळचे एटीएम बंद असल्याने त्याला तिथूनच पुढे असलेल्या गलीतल्या एटीएम सेंटरमध्ये जावे लागले. तो मनातल्या मनात चरफडला.
गल्लीतील एटीएम सेंटर हे सहकारी बँकेचे असल्याने तिथे देखील पैसे मिळतील कि नाही , या बद्दल शंकाच होती.
एटीएमच दरवाजा ढकलून तो आत आला. आत आल्यावर त्याला अधिकच गरम जाणवू लागले.
" काय ओ, बँकेने एटीएममध्ये एसी बसवली नाहीये का?" तिथे बसलेल्या एका सुरक्षारक्षकाला त्याने विचारले.
तो काहीतरी म्हणाला पण त्या नीटसे समजले नाही. अशातच त्या सुरक्षारक्षकाला जोराचा ठसका लागला.
" सॉरी काका, तुम्ही जेवताय का?" आपण जेवताना प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ठसका लागला. त्याबद्दल तेजसला वाईट वाटले.
तो त्यांच्याकडे गेला. तिथला प्रकार पाहून त्यांच्या मागे उभ्या  असलेल्या तेजसच्या डोळ्यात आपोआप पाणी तराळले. ते काका पाण्यासोबत सुकी भाकरी खात होते.
" काका तुम्ही पाण्यासोबत भाकरी का खाताय?" असे तेजसने विचारल्या बरोबर ते काका चमकले. आपली भाकरी आणि भरलेली पाण्याची वाटी लपवू लागले.
"अरे , भाजी आणली होती रे, आताच संपली." काका असे म्हणाले खरे पण तिथे त्यांनी भाजी आणल्याची एकही खूणा नव्हती. तेजस काय समजायचे ते समजला. त्यांना अधिक प्रश्न  न विचारता एवढेच म्हणाला.
" काका तुम्हाला मुलं किती?"
" दोन, शिकत आहेत."
" तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ, या पुढचा एकही घास तुम्ही भाजीशिवाय घेणार नाहीत. अजून पाच मिनिटे थांबा. मी आलोच." असे बोलून तेजस एटीएम मधून पैसे काढून बाहेर पडला.
काका त्याच्या अवताराकडे पाहतच राहीले. त्यांचा भाकरीचा घास हातात तसाच राहीला.
तेजस लगेचच भाजी घेऊन आला होता. त्यांच्याकडे भाजी देत बाजूला बसला.
"काका, जेव्हा कधी तुमच्या टिफीनमध्येकडे भाजी नसेल तेव्हा यातले पैसे भाजीसाठी खर्च करायचे." हातातले ५०० रूपये त्यांच्या खिशात घालत तेजस म्हणाला.
" बाळ, तू एवढे का करतोयस माझ्यासाठी?"
" काही नाही काका, तुम्हाला नाही समजणार." डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसत तेजस तिथून निघाला.

तो ऑफिसमध्ये आला तेव्हा सगळे त्याच्यासाठी जेवायचे थांबले होते.
" अरे भाजी आणायला गेलास ना? त्याचे रिकामे हात बघून संकेत म्हणाला.
" अरे एटीएममध्ये पैसेच नव्हते, तुमच्याकडे भाजी आहे ना, मग  झालं." तेजस टिफिन घेत म्हणाला.
" ठीक आहे चला तर मग." संकेत म्हणाला.
सगळे जेवायला बसले. तेजसनेच सगळ्यांचे टिफीन उघडले. संकेतकडे कारले, केतकीने काळ्या वाटाण्याची उसळ आणली होती, विशालने गवार आणि स्नेहाने शिमला मिरचीची भाजी आणली होती. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. कोणाकडचीच भाजी तेजसच्या आवडीची भाजी नव्हती. तो सगळ्यांकडची भाजी ताटात घेऊ लागला तेव्हा सर्वांनी तोंडात बोट घातली.
" तोंड उघडी नका टाकू, मी फोटो दाखवतोय तो जरा झुम करून बघा." त्याने मोबाईल काढून एटीएम मध्ये पाण्यासोबत भाकरी खाणाऱ्या काकांचा फोटो दाखवला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
" संकेत तुझ्या आईचे अन्न तत्वज्ञान पटतेय रे, जगात असे
बरेच लोक आहेत, ज्यांना पुरेसे अन्न मिळत नाहीये. उपाशी मरत आहेत. अर्धपोटी झोपत आहे. कुपोषित लोकांच्या विषयीही बातम्या पेपरला येतात. हे सर्व वाचून आपण पुढचे पान उलटतो. आपल्याला त्यांच्या बद्दल जाणीव होत नाही, पण जेव्हा एखादा प्रसंग आपल्यासमोरच घडतो तेव्हा माझ्यासारखा अन्नासाठी नखरे करणारा माणूस मात्र आतून पूर्णपणे बदलतो." तेजसला पुढे काही बोलवेना.
अन्न हे कोणतेही असो ते पूर्णब्रह्मच असते.. त्याला कधीच नाकारू नये, लाथाडू नये..

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०३.११.२०१८