उकल...
भर दुपारची वेळ होती. पलीकडच्या आंब्याखालून दामूला धावत येताना पाहून आबा उठून उभा राहीला. हातातील पुस्तक बाजुला ठेवून अंगणात आला. 
"आबा, घात झालो. काजरेटेंबातल्या कुडणात कोणीतरी आग घातल्यान हा." दामु धापा टाकत बोलला.
हे ऐकून आबा जागच्या जागी थिजला. पण आता खचून फायदा नव्हता. 
"दामग्या भरवडीत पायप आसात ते घी, मी इंजीन घेतय, सावरीकडच्या बावडेत थोडा पाणी हा, थय लावया" आबाने घाईघाईत रॉकेलवर चालणारे इंजिन उचलले.
"अरे आबा, जवळ जवळ सगळा जळान खाक झाला हा " दामू कळकळीने बोलला.
"चल तू, जेवढा वाचवता येयत तेवढा वाचऊया" असे बोलून डोक्यावर इंजीन पेलवत धावत निघाला.
आबाची आंबा आणि काजूची बाग तशी जवळच होती. त्याने फलोद्यान योजनेचा फायदा पुरेपुर उचलला होता. ५ एकर जागेत गेली चार वर्षे खपून बाग फुलवली होती. गेल्या मिरगामध्ये सर्व कलमांना खत आणि भर देखील घातली होती. सगळ्या खर्चासाठी जिल्हा बँकेचे कर्ज घेतले होते. दोन  दिवसापू्र्वी बागेच्या साफसफाईला देखील सुरूवात केली होती. 
आबा बागेजवळ पोचला तेव्हा पूर्ण बाग जळून खाक झालेली पाहून तो इंजिना सकट जमिनीवर कोसळला. आबाला बेशुद्धावस्थेत गेलेला पाहून दामू घाबरला, काय करावे कळेना. जवळच्या सावरीकडच्या विहीरीतून थोडे पाणी आणून त्याच्या तोंडावर शिंपडले पण काही उपयोग झाला नाही. इतक्यात पिंट्या मेस्त्रीची रिक्षा तालुक्याला जात होती. त्याने झाला प्रकार पाहून रिक्षा थांबवली. दामू आणि पिंट्याने आबाला रिक्षामध्ये घालून जिल्हा रूग्नालयात दाखल केले. तिथे तातडीचे उपचार करण्यात आले. तासाभरात आबा शुद्धीवर आला पण सारखी सारखी त्याची शुद्ध हरपत होती. दामूने आबाच्या बायकोला कळवले. ती पण सासऱ्याला दुसऱ्याच्या स्वाधीन करून आली . आपल्या नवऱ्याची अशी परीस्थिती पाहून तीला गलबलून आलं, आता बागेची चिंता करून उपयोग नव्हता, आता फक्त आपला नवरा सुखरूप घरी यायला हवा होता. 
दुसऱ्या दिवशी आबाला घरी पाठवण्यात आले. आबा अजून धक्क्यातून सावरला नव्हता. तो कोणाशी काही बोलत नव्हता. अजून राधाने आपल्या सासऱ्यांना बागेबद्दल सांगीतले नव्हते.
इकडे संग्राम आसुरी आनंदात बुडाला होता. त्याने अपमानाचा बदला अखेर घेतला होता. त्याचे सकाळीच मद्यपान चालू होते. त्याचा नोकर म्हादू मात्र पश्चातापाने होरपळत होता. मालकाच्या साथीने भर दुपारीच आबाच्या बागेला आग लावून पसार झाले होते. संग्रामचा स्वभाव पुऱ्या गावाला माहीत होता. त्याच्या वाटेला कोण जात नसे. म्हादू त्याच्या वडीलांच्या काळापासून त्याच्या कडे नोकरीला होता म्हणून तिथे टिकून होता. खाल्ल्या मिठाला जागत होता. त्यालाही संग्रामचे वागणे पटत नसायचे. संग्रामकडून घेतलेल्या कर्जामुळे त्याचे हात अडकले होते. त्यामुळे नाविलाजाने त्याला तिथे काम करावे लागत होते आणि मेल्या शिवाय निवृत्त होता येणार नव्हते. पण केलेल्या पापाबद्दल म्हादूला खुपच अपराधी वाटत होते. दोन दिवसापूर्वी प्रसंगच तसा घडला होता.
तो आणि संग्राम आबाच्या बागेच्या बाजूने बाईक वरून तालुक्याला जात होते. आबाच्या बागेत साफसफाईचे काम चालू होते. सगळ्या झाडांना मस्त मोहोर आला होता. तेव्हा आबाची बायको राधा बागेत काम करणाऱ्या मजुरांना न्याहरी घेवून जात होती. ती त्याच्या दृष्टीस पडली. त्याने बाईक थांबवली. त्याची वासनांध नजर तिच्या शरीरावर फिरू लागली. राधा सावळी असली तरी दिसायला सुंदर होती. प्रमाणबद्ध शरीर, पाणीदार डोळे, गोबरे गाल, कपाळावरील ठसठशीत कुंकू, कमणीय कटी, अगदी नितंबापर्यंत लोंबणारे लांबसडक केस आणि चापून चोपून नेसलेल्या साडीत तिचे प्रत्येक अंग उठून दिसत होतं. न्याहरीच्या टोपलीला पकडलेले तिचे गोंडाळ हात आणि त्यात चढवलेला हिरवा चुडा फारच छान दिसत होता. नितंब आणि त्यावर होणारी केसांची हालचाल पाहून संग्राम वेडा व्हायचा बाकी राहीला होता. तो लगेच बाईक वरून उतरून तिच्या मागे जाऊ लागला. त्याला टाळत ती पुढे जाऊ लागली.
" राधा बाई , जरा थांबा ओ" तो तिच्या आडवा आल्यामुळे तिचा नाविलाज झाला. कपाळावर आठ्या आल्या. लग्न होऊन तीला या गावात येऊन तीन वर्षेच झाली होती. संग्रामबद्दल ती बरेच ऐकून होती.
"बोला, काय बोलाचा हा ता, माका बरीच कामा हत" 
" एवढी घाय कसली करतास? आमच्या वांगडा प्रेमाचे चार शब्द बोला. आम्ही तुमका परके नाय" तो तिच्या खुपच जवळ आला तशी ती मागे सरली त्यातच तिचा तोल गेला आणि ती खाली पडणार इतक्यात संग्रामने तिच्या कंबरेत हात घालून सावरली. पण लगेच त्याचा गाल मात्र लाल झाला. तिने त्याच्या कानाखाली सणसणीत ठेवून दिली होती. अनपेक्षीत हल्ल्याने तोही बावचळला. ती खाली पडलेली न्याहरी घेत म्हादुकडे पण एक जळजळीत कटाक्ष टाकत तिथून गेली. म्हादू आबाचा शाळेतला सहकारी होता हे तिला माहीत होते. शाळेत कोणी कळ काढली की आबाच्या मदतीला म्हादुच धावून यायचा. आज मात्र वहीनीच्या छेडीबद्दल साधा एक चकार शब्दही बोलला नव्हता त्याचाच तीला राग आला होता. म्हादू तिच्या या अवताराकडे बघतच राहीला. संग्राम रागाने लाल झाला होता. पहील्यांदाच कोणीतरी कानशिलात लगावली होती. खरं तर म्हादूशिवाय कोणी पाहीले नव्हते पण थप्पड जिव्हारी लागली होती आणि त्या एका थप्पडने पुर्ण बाग पेटली होती. 
तिला कळून चुकले होते. बागेला आग लावायचे काम संग्रामचे असणार. इतकी वर्षे गावात कुठे कधी आग लागलेली ऐकली नव्हती. संग्रामने अशाप्रकारे बदला घेतलेला पाहून तिला राग आला होता. पण त्याच्या वाटेला जाऊन काही निष्पन्न होणार नव्हते. उलट तिचीच अब्रु वेशीवर टांगायला संग्रामने मागे पुढे पाहीले नसते. खरंतर राधा निमित्त झाली होती. संग्राम आबाची एकक्षेत्री जमिन विकत घ्यायला बघत होता पण आबाने ती जमिन न विकता त्यावर बाग फुलवली होती. ही गोष्ट राधाला माहीत नव्हती. ती स्वतालाच दोषी मानत होती. सगळे आपल्यामुळे घडले ही भावना तिला बोचत होती. सासऱ्यांनी हाक दिली तशी ती भानावर आली. ते एका खोलीत पडुन असायचे. राधा त्यांचे सारं काही करायची अगदी आपल्या वडीलांसारखे . त्यामुळे लकव्याच्या मोठ्या अटॅक मधुन ते लवकर बरे होत होते. ती त्यांच्या खोलीत आली तेव्हा छोटा मुलगा प्रल्हाद तिथेच खेळत होता. त्याने औषधांचा केलेला पसारा पाहूनच सुनेला हाक दिली होती.
"अगो,आबा खय फिरकलो नाय तो? " सुन आलेली पाहून आबा बोलले. अजूनही त्यांना नीट बोलता येत नसे.
"खालच्या आवाटात गेले हत, बाग बेनूचा काम चालू हा ना, म्हणान जरा येळ गावत नाया" मुलाना केलेला पसारा आवरताना राधा बोलली. 
ती तिथे जास्त वेळ थांबली नाही. त्यांनी अजुन प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे तिच्याकडे नव्हती.
आबा चार पाच दिवसांनी बागेत गेला. त्याची पावलं काही पुढे पडेनात. हिरव्यागार बागेचा कोळसा झाला होता. संपूर्ण बाग बेचिराख झाली होती. काजुची यंदाच मोहरलेली झाडे पार करपून गेली होती. बागेत ठेवलेले पाण्याचे पाईपही जळून गेले होते. अगदी काही सुद्धा वाचले नव्हते. डोळ्यातले पाणी सांभाळत आबा बागेत सैरावैरा धावत होता. कुठे काही जळायचे बाकी राहीलेय का असे उगाचच बघत होता. आंब्याच्या खोडांना कवटाळून रडत होता. त्याच्या मागे असणारी राधाही पार कोलमडली होती पण तिला तसं करून चालणार नव्हते. कोलमडलेल्या नवऱ्याला सावरणे गरजेचे होते. आबा मटकन खाली बसला तिथे त्याच्या डोळ्यातला एक थेंब एका रोपावर पडला. त्याबरोबर ते ओलं झालेले रोप थरथरले. त्यात थोडा जीव होता. आबाने सोबत प्यायला आणलेले पाणी त्या झाडाच्या मुळात ओतले. त्या झाडाशी त्याचे वेगळेच नाते होते. ते सोनचाफ्याचे झाड त्याने राधाच्या वाढदिवसाला तिला बक्षिस दिले होते. आबाच्या बागेच्या आजुबाजूला कोणाच्याच बागा नव्हत्या. बागेच्या तिन्ही बाजूने जंगलातील वाडीत जाणारा रस्ता होता आणि एका बाजुने भात शेती होती. त्यामुळे आबा सोडून कोणालाच या आगीची झळ पोचली नव्हती. उजाड बागेकडे पाहताना आबा पार कोलमडून गेला होता. त्याच्या डोळ्यापुढे भर दिवसा अंधार दाटला होता. त्यात बँंकेचे हप्ते मात्र ठळक जाणवत होते. राधाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. पण ती मनाने खचली नव्हती. पण मनात काहीतरी ठोकताळे मांडत होती.
अशातच तीन चार महीने गेले. सलग तीन हप्ते चुकल्यामुळे घरात जप्तीची नोटीस आली होती. मे महीन्याचे दिवस होते. आबा मजुरी करून घरखर्च चालवत होता. हप्ते भरायलाही पैसे नव्हते. घरातले अन्नधान्य सोडून बाकी खर्चाला मजुरीचे पैसै अपुरे पडत होते. कुटूंबात छोटा मुलगा आणि अंथरूणाला खिळलेल्या बापामुळे खर्चाची मिळवणी करणे आबाला कठीण जात होते. कुटूंबाची चाललेली आबाळ आबाला बघवत नव्हती. तात्यांना बाग जळाल्याची गोष्ट कळल्यापासून त्यांचे अस्पष्ट बोलणेही बंद झाले. कायम आढ्यात नजर लावून झोपून असायचे. आबा आणि राधाला त्यांना गमवायचे नव्हते. जगण्याच्या आटेपीटेसोबत त्यांना बोलतं करायला बघत होते. पण त्याचा काहीही उपयोग नव्हता.
एक दिवस राधा आणि आबा मागच्या पडवीत बसले असताना राधा त्याला म्हणाली.
" तात्यांका , आपण जेवा ह्या परिस्थितीतना वर येतलाव तेवाच बरा वाटात"
" माका पण तसाच वाटता, मिरग जवळ येताहा , तू सगळी जाळाभातीची कामा करून घी, थोडी काटकसर करू. सगळा व्यवस्थित होतला. जुनमधी बघू किती कलमांका धुमारे फुटतत ते" आबा बोलला.
" माझ्या डोक्यात एक आयडीया इली हा"
" कसली" आबा सावरून बसला. राधाचा व्यवहारी स्वभाव तो जाणून होता.
" ह्या बघा, आपली बाग तर आता उजाड झाली हा. तेतूर चांगल्या दोन एकर जमिनीत गोंड्याची फुलशेती करायची. गणपती आणि दसऱ्या-दिवाळीक फुला येतली. ती इकून चार पैसे मिळतीत. तसो पण बाजारातलो हारवालो तुमचो दोस्त हा ना, तेच्याकडे थोडी फुला खपवू, मी पण बाजारात बसान इकीन"
कल्पना खुप छान होती. पण खर्चाचे काय? अंग मेहनतीने बरेच काम ओढता येणार होते पण बियाणे आणि खताला पैसे लागणार होते.  
"हा ,तसाच करू. पण बियाण्याक आणि खताक पैसो लागतलो. तेचा काय करायचा. आता घरात फुटकी कवडी पण नाया." दोघेही विचारात पडले. सगळ्या गोष्टी पैशावर अडत होत्या. घरात अन्नधान्य अजून दोन महीने पुरेल इतकेच होते. वरखर्चाला पर्याय म्हणून भाकरी आणि पेज यावर दिवस ढकलता आले असते. एवढ्यात पुढच्या बाजुला कोणीतरी हाक मारली. आबा पुढच्या दाराला आला. गावातील खोत आले होते. खोत एक पाताळयंत्री माणुस आहे हे आबा ओळखून होता. पण त्यांना आत बोलवून बसायला टेबल पुढे केले.
"आबा बागेचा आयकान लय वायट वाटला रे, असा दुश्मनाचा दुकू होव नये" खोतानी बोलायला सुरूवात केली.
"हो, आता काय करतलास, जेना कोणी केल्यान तेका शिक्षा देणारो वर बसलोहा. " 
"ता खरा हा रे, पण आता ह्यो केवढो पेच झालोहा बघ. "
"होय ओ."
"ह्या सगळ्यातना अगदी सहीसलामत भायर पडशीत असा तोडगो माझ्याकडे हा" खोत हळूहळू आपला हेतू उघड करू लागले.
"काय ता?"
"तुझी भाटयेवरची २० गुंठे जमिन इकून टाक, मी घेतय ती , कर्जातना मोकळो होशीत."
"श्या श्या खोतानू, असला भलता सलता मनात दुकू नाय आमच्या, मेलय तरी जमिन इकूचय नाय." आबाने खोतांना सरळ उडवूनच लावले. खोत बराच वेळ त्याला पटवून देऊ लागले. पण आबा धजला नाही. शेवटी खोत उठून गेले. माणुस अडचणीत सापडला की आजुबाजुची स्वार्थी गिधाडे अशीच टपून असतात. लचके तोडायला. आबाच्या ठामपणावर राधा जाम खुश झाली. मनोमन देवाचे आभार मानत कामाला लागली.
मे महीन्याचा पंधरावडा संपला होता. आबाला काम मिळेणासे झाले होते. राधाच्या भावाच्या ओळखीने जप्ती मात्र थांबली होती. एक महीन्याची वाढीव मुदत संपायला अजुन १५ दिवस बाकी होती. महीनाअखेर कर्जाच्या हप्त्याचे पैसे जमा करणे गरजेचे होते. पण कुठून करणार होता? ज्या मालमत्तेवर सर्व मिळकत अवलंबुन होती ती मालमत्ताच नष्ट झाली होती. दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते. कोणी मदतीलाही पुढे येत नव्हते. आबाची काळजी काही केल्या कमी होत नव्हती. राधाचा धीर जास्त वेळ तग धरत नव्हता.
काळजीत पडलेला आबा खांद्यावर टॉवेल टाकून 
राधाला न सांगता संग्रामच्या घरी काम मागण्यासाठी गेला. तिथे म्हादू पण उपस्थित होता. आबाला संग्रामकडे आलेला पाहून तो मनातून चरकला. संग्रामपण थोडा सावध झाला. पण आबा काम मागायला आलाय हे समजल्यावर संग्रामची ऐट वाढली. त्याचा बोलण्यातून अपमान करू लागला. तरीपण आबा काम देण्यासाठी विनवणी करू लागला. त्याला संग्रामकडे काम मिळण्याची खुप आशा होती. त्याच्या विनवणीचा काहीही परीणाम होत नव्हता. म्हादूला खुप वाईट वाटले. आबाच्या परिस्थितीला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. पण तो काहीही करू शकत नव्हता. आबा तसाच घरी आला. तात्यांची खालवत चाललेली प्रकृती पाहून आबाचा जीव खालीवर होत होता. पैशाअभावी औषधे वेळेवर मिळत नव्हती. ते पण मुद्दाम गोळ्या खात नव्हते. त्याच्या घरात जेवण तर गेल्या पंधरा दिवसात नीटसे तयार झालेच नव्हते. खाण्यापेक्षा जप्तीची काळजी जास्त होती. गरीब माणसाला आपली इज्जत खुप प्यारी असते. तसेच काहीसे आबाच्या कुंटूबाच्या बाबतीत होतं.
भल्या पहाटे आबा उठून बागेत चालला होता. त्याच्या घरात चहा तर कधीच हद्धपार झाला होता. बागेत जाताना वाटेत म्हादू भेटला. म्हादूला आबाशी नजर भिडवताना कसेतरी वाटले. आबाशी दोन शब्द बोलून त्याच्या हातात एक पाचशेची नोट कोंबली. म्हादूला त्यावेळी हुंदका आवरला नाही.
"मित्रा , माझ्याकडना होयत तेवढा केलय, तुझी हालत बघवत नाय रे" असे बोलून आबाला मिठी मारली आणि लगेच निघून गेला. आबा हातातल्या कोंबलेल्या नोटेकडे बघत राहीला. त्याला ते पैसे परत द्यायचे भान देखील राहीले नाही. म्हादू देखील गरीब होता. एवढ्या लोकात त्यालाच दया आली होती.
आबा बागेत पोचला. एकंदरीत जमिनीचा अंदाज घेत मनाशी काही आडाखे बांधले. पण घोडं पैशावर अडत होतं. 
आबा बागेतून घरी आला तेव्हा राधा घरात काहीतरी करत होती. आबा आला हे समजल्यावर ती बाहेर आली. तिला त्याने एकंदरीत परिस्थिती समजावली. त्या दोघांचे बोलणे तात्या आतून ऐकत होते. त्यांना त्यांच्या दुखा:त सहभागी व्हायचे होते. पण त्यांच्याकडून डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुखेरीच काहीच प्रतिसाद नव्हता. डबडबलेल्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता. त्याचवेळी डोळ्यातील पाणी पुसण्याच्या नादात त्यांच्याकडून पाण्याच्या तांब्याला धक्का लागला . आवाज ऐकून आबा आणि राधा तात्यांकडे धावली. तात्यांना रडताना पाहून आबाला गहीवरून आले. पण राधाने आपला हूंदका आवरत त्या दोघांना सावरले. पोरासारखे दोघांना थोपटू लागली. त्यांचा हुंदका अजूनच वाढला. दोघांचेही मन खात होते. आबाला त्यांचे औषधपाणी नीट करता येत नव्हते म्हणुन अपराधी वाटत होते तर तात्यांना पडत्या काळात आपली काहीच मदत होत नाही अशी भावना खात होती. दोघेही सावरले तसे राधा आत गेली. परत येताना मंगळसूत्रासहीत काही दागीने घेऊन आली. ते आबाच्या स्वाधीन करत खाली बसली.
"राधा ह्या पाप माका करूक लाव नको गो" राधाकडे दागीने परत करत आबा म्हणाला.
"असा काय्येक समजा नको, आपल्या येळेक उपयोगी नाय पडला तर तेचो काय उपयोग? परिस्थिती सुधारली काय हानू सोडवून, माझो दागीनो तर तुम्ही आसास. माझी आपली माणसाच माझे अलंकार आसत, तेवा ह्या सगळा घेवा आणि गहान ठेवा" असे म्हणत राधाने परत सगळे दागिने आबाकडे दिले. 
राधाच्या या अवताराकडे आबा आणि तात्या पाहतच राहीले.
मे महीना संपत आला होता. आबा आणि राधा मोठ्या उमेदीने कामाला लागले. मिरगाच्या अगोदर त्यांना फुलशेतीसाठी जमिन तयार करायची होती. सोने गहान ठेवून आलेल्या पैशात कर्जाचे चार हप्ते बाजुला ठेवून बाकी रक्कमेत फुलशेतीचे नियोजन करणे थोडे कठीण जाऊ लागले. बियाणे सोडून बाकी सर्व कामे अंग मेहनतीने करायची असे ठरले.
आबा दुसऱ्या दिवसा पासून कामाला लागला. फुलशेतीसाठी कंपोस्ट खत वापरणार होता. खताचा खड्डा बागेतच होता. त्याने खड्ड्यातील अगोदर तयार असलेले खत काढून घ्यायला सुरूवात केली. ते त्याला फुलशेतीला वापरायला मिळणार होते. शिवाय भात शेतीला पण होणार होते. खड्ड्यामधील खत उपसल्यानंतर खड्डा अजून रूंद आणि खोल करायला सुरूवात केली. इतक्यात दिवस मावळतीला आला होता. काम थांबवून आबा घरी आला. राधा आणलेली औषधे तात्यांना कशी घ्यायची ते समजावून सांगत होती. ती आज खुश दिसत होती. एका चांगल्या गोष्टीला सुरूवात झाली होती.
दुसऱ्या दिवशी आबा परत खड्डा खणायला गेला. खड्ड्यावर सावली केल्यामुळे उन्हाचा तडाखा बसत नव्हता. एका बाजूने पूर्ण कातळ असल्यामुळे त्या बाजुचा खड्डा खणताना त्रास होत होता. पण दुसरी बाजू खुपच सोपी जात होती. त्या बाजुने भराभर खड्डा खणाला जात होता. इतक्यात खणता खणता त्याने मारलेले टिकाव वर उडाले, खाली भला मोठा दगड होता. त्या दगडामुळे मध्येच उंचवटा निर्माण झाला होता. त्याने दगडाखाली टिकाव घालताच तो पटकन वर उचलला गेला. त्याखाली पत्र्यासारखे काहीतरी लागले. आबाचे कुतुहल जागे झाले. त्याने तो भाग साफ केला. थोडी माती बाजुला केल्यावर त्याखाली फुटभर रूंदीची एक पत्र्याची पेटी लागली. आबाचे डोळे लकाकले. तो क्षणभर घाबरला. त्याने लगेच खांद्यावरचे टॉवेल त्यावर टाकले आणि बाहेर आला. बागेत त्याच्या शिवाय कोणी नव्हते. तो परत आत उतरला. पेटीला हात लावायला भीती वाटत होती. शेवटी धीर करून ती पेटी मातीतून बाहेर काढली. त्या पेटीला गंजलेले टाळं असचं लटावून ठेवलं होतं. त्याने खड्ड्यातच पेटी उघडली आणि आतील ऐवज पाहून त्याचा घसा कोरडा पडला. थोडा मागे सरला. पेटीत सोन्याच्या मुर्त्या, दागिने पाहून आबा चलबिचल झाला. तो ती पेटी परत खड्डयात बुजवत घराकडे निघाला.
आबा वेळेआधी आलेला पाहून राधाला आश्चर्य वाटले.
" झालो खड्डो खनान?" त्याच्या हातातली न्याहरीची पिशवी घेत राधाने विचारले.
" हो" तुटक उत्तर देत आबा न्हानीघरात गेला.
आबाचे वागणे राधाला थोडे विचित्र वाटले. 
थोड्यावेळाने आबाने सारा प्रकार राधाला सांगीतला. राधाचे तोंड उघडेच राहीले. खरचं असे असेल तर आपले सर्व आर्थिक प्रश्न सुटणार होते. तिने हलकेच आपल्या हाताला चिमटा काढून पाहीला. स्वप्न नव्हते. 
"अहो मग घराक हानायची ती पेटी" दबक्या आवाजात राधा बोलली.
" माझो धीर झालो नाय गो" ती दोघं आपसात बराच वेळ बोलत राहीली. 
नंतर थोड्यावेळाने ती दोघं जेऊन आरामात बागेकडे जायला निघाली. कोणाला त्यांचे वागणे वेगळे वाटायला नको होते. संशय येऊन फायदा नव्हता. त्यांच्या जमिनीत मिळालेले धन वडीलोपार्जीत असावे आणि आपली पुण्याई मोठी म्हणून हे आपल्याला सापडले असा समज त्या दोघांनी करून घेतला होता.
थोड्यावेळात ती दोघं बागेत पोहचली. आबाने खड्ड्यात उतरून पेटी वर काढली. पेटी उघडताच काठावर उभी असलेल्या राधाचे डोळे विस्फारले. तिचा डोळ्यावर विश्वास बसेना. तीने खाली उतरून ऐवजाला हात लावून पाहीले. सारं काही खरखुरं होतं. मनात भीती देखील वाटत होती. दोघांनी ती पेटी खड्ड्याबाहेर काढली. पण पेटी घेवून जाणार कशी हा प्रश्न त्यांना पडला. इतक्यात खालच्या वाटेने तिथे कोणीतरी येताना दिसले. ती व्यक्ती त्यांच्या दिशेने येत होती. त्याबरोबर या दोघांची धांदल उडाली. त्यानी लगेच ती पेटी मातीच्या ढीगात लपवली. ती लपवताना त्यांची खुपच तांराबळ उडाली. ती व्यक्ती दामु होता. 
"आबा ,आबा .. लय वायट झाला, म्हादुचो खून झालो. त्याचा प्रेत सावतांच्या बावडेत तरंगत हूता, पोलीस इले हत, त्यानी आता भायर काढल्यानी. " दामुने धापा टाकत सांगले.
ही बातमी ऐकून आबा आणि राधा हादरले. काही बोलावे तेच कळेना. चार दिवसापूर्वीच म्हादू आबाला भेटला होता. त्याने दिलेली ५०० रूपयाची नोट देखील मोडली नव्हती. राधाला संग्रामसोबत घडलेल्या प्रसंगाच्या वेळी म्हादूवर टाकलेला जळजळीत कटाक्ष आठवला.
" अरे पण, खुन नसात. तेका कोण मारीत? जीव दिल्यान आसात" आबा काम आवरते घेत बोलला.
" जीव नाय रे आबा, गळ्याभोवती आवळल्याची खुना आसा, मी स्वताच्या डोळ्यानी बघलय, तु लवकर चल "दामु आबाला खेचू लागला.
" अरे येतय रे" असे बोलून आबा दामुसोबत निघाला. थोडा वेळ त्याच्या सोबत चालून काहीतरी विसरल्याचे करत परत मागे आला. राधाला काही सुचना देत मग दामुसोबत जायला निघाला.
आबा गेल्यावर राधाने बाहेर काढलेल्या मातीत पुरलेली पेटी काढून ती परत खड्ड्यात पुरली आणि व्यवस्थित बुजवून बाहेर आली. अचानक तिचे लक्ष खड्ड्याच्या बाजुला एक ताविज पडलेले दिसले. चांदीच्या आवरणातील सप्तरंगी दोऱ्यात ओवलेले ते कळकट तावीज तिने कुठेतरी पाहीले होते. तिने ते आपल्याकडे घेतले आणि आठवू लागली. काही केल्या तिला ते कुठे पाहीले हे आठवत नव्हते. वाटेत चालत असताना तिला पटकन काहीतरी आठवले तसा तिने आपला चालण्याचा वेग वाढवला. वाटेतच सावंताची विहीर होती. विहीरीकडे खुप जण जमले होते. पोलीसांचा पंचनामा चालू होता. तिला एका गोष्टीची खात्री करायची होती. तिने लांबूनच म्हादूचे प्रेत पाहीले. त्याच्या बायकोने आणि दोन लहान मुलानी आक्रोश मांडला होता. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. सारेच लोक हळहळत होते. खरंतर म्हादुच्या बायकोला माहीत पडणार नव्हते पण आदल्या दिवशीच्या रात्री पासून म्हादू गायब असल्यामुळे ती तिच्या मुलांना सोबत घेऊन त्याला शोधत होती. त्यावेळी विहीरी शेजारून जाताना तिने सहज विहीरीत डोकावले तर म्हादूचे प्रेत तरंगताना दिसले होते. त्यावेळी तिने फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. हंबरडा ऐकून सारी लोकं जमा झाली होती. पण प्रेत काढायला कोणी पुढे येत नव्हते. नंतर पोलीस आल्यानंतर प्रेत वर काढण्यात आले. प्रेत पालथे असल्यामुळे म्हादुचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. जेव्हा पोलीसांनी त्याला सरळ केले तेव्हा त्याच्या गळ्यात तावीज नव्हते. ते पाहून राधाच्या काळजात चर झाले. आपल्या बागेत पडलेले ताविज म्हादुचेच होते यात काही शंका राहीली नाही. ती तशीच घरी निघून आली.
राधाला त्या रात्री झोप काही येत नव्हती. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. म्हादुचा खून आपल्या बागेत तर झाला नसावा? बागेत मिळलेल्या पेटीशी याचा काही संबंध असेल का? म्हादुला कोणी का मारले असावे? म्हादू का आपल्या बागेत गेला असेल? ती आबाशी बोलण्यासाठी उठून बसली पण तो गाढ झोपलेला पाहून तिनेही झोपायचा प्रयत्न केला. तिचा रात्री खुप उशीरा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशीच्या बातमीने सारेच हादरले. पोलीसांनी संग्रामला म्हादुच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली. खुनाचे कारण मात्र गुलदस्त्यात होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलीसानी पोलीसी खाक्या दाखवताच संग्रामने गुन्हा कबुल केला. पोलीसांना खुनाचा हेतू कळला होता त्यामुळे थर्ड डिग्री दाखवताच त्याने सगळे कबुल केले. म्हादूला संग्रामने त्याची तिजोरी उघडताना पाहील्यामुळे त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यातुनच रागाच्या भरात आपण म्हादुचा खुन केला असे त्याने पोलीसांना सांगीतले.
एका मागोमाग घडणाऱ्या अनाकलनीय घटनांमुळे आबा पुरता हादरून गेला होता. कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे असं सारखे सारखे वाटत होते. सतत उत्साही असणारी राधाही गप गप होती. ह्या सगळ्याच्या नादात बागेत मिळालेल्या पेटीचाही त्याला विसर पडला होता. तो बागेत जायला निघाला, त्याच्या सोबत राधाही निघाली. राधापेक्षा आबालाच जास्त प्रश्न पडले होते. आबाचा प्रश्नांनी भरलेला चेहरा पाहून राधाने मनात साठवून ठेवलेले अगदी सुरूवातीपासून सारं काही सांगीतले. संग्रामने आपला केलेला विनयभंग, मग तिने त्याला मारलेली थप्पड, नंतर लगेचच त्याने बागेला आग लावून घेतलेला सुड तसेच आपण हे का लपवून ठेवले त्याचे कारणही सांगीतले. म्हादु त्या कामात संग्रामच्या सोबत असावा त्यामुळे म्हादुच्या मनात अपराधी भावना असावी. राधा जे काही सांगत होती हे ऐकून आबा आश्चर्यचकीत झाला. सारे लपवून ठेवले म्हणुन राधाचा राग देखील आला पण पुढच्या क्षणाला राधाने जे काही केलं ते बरचं झालं. रागाला डोळे नसतात. त्याचवेळी आपल्याला हे समजले असते तर संग्रामला मारायला मागे पुढे पाहीले नसते. 
"तेवाच माका म्हादगो त्या दिवशी मिठी मारून रडा हूतो, तेना माका ५०० रूपये पण दिल्यान हूते. आपली परिस्थिती बघावली नसतली. " आबा म्हणाला.
"खरा हा, पण तेंका कोणी आणि कशाक मारल्यान? राधाने असे बोलल्याबरोबर आबा आणि तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हे मात्र कायम राहीली. काहीच उलगडा होत नव्हता.
बोलता बोलता ते दोघं कधी बागेत पोचले ते त्यांना कळलेच नाही. पण त्या खड्ड्याकडे जायची इच्छा मात्र दोघांना झाली नाही. बागेत फुलशेतीसाठी लागणाऱ्या जामिनीची साफ सफाई करून ते दोघं घरी निघाले. 
आपल्या घरी येताना दोघेही म्हादुच्या घरी जायला निघाले होते. त्याच्या घरी पोचले तेव्हा घराचा पुढचा दरवाजा बंद होता. आबाने दार ठोठावले खुप वेळानंतर म्हादुच्या छोट्या मुलाने दार उघडले. दोघं आत गेली. त्यांची चाहूल लागली तशी म्हादुची बायको आतल्या खोलीत रडु लागली. दोन लहान मुलानी पायाला मारलेल्या मिठीने आबाला गहीवरून आलं. काही वेळापुर्वी असलेल्या भयाण शांततेचे रूपांतर रडारडीत झाले
"काका, बाबा दवाखाण्यातना कधी येतले?" सर्वात लहान मुलाचे ते बोबडे बोल काळीज चिरून गेले. आत म्हादुच्या बायकोचे रडणे चालूच होते. 
"आये नको रडा गे, आम्ही आसव ना, काका इले हत आता सगळा ठीक होतला" पाचवीत असलेल्या मुलाच्या धीराच्या शब्दांनी सारेच हेलावून गेले. म्हादुची बायको मुलाला पोटाशी धरत मुसमुसू लागली. आबाला आतील दृश्य पाहवेना. तो बाहेरच्या पडवीत येऊन बसला. त्याचे डोके चालायचे बंद झाले. का झाले असे म्हादूच्या बाबतीत? आता आपणच म्हादुच्या कुटूंबाला आधार द्यायला हवा. त्याचा समोरच्या पांदीत सहजच लक्ष गेला. पांदीत कोणीतरी उभे असल्याचे आबाला दिसले. नीट पाहील्यावर तिथे संग्रामची बायको उभी असल्याचे दिसले. ती खुणेने काहीतरी सांगायला बघत होती. तिच्या जवळ जाणे त्याला भागच होती. ती मुकबधीर असल्यामुळे तिच्या कडून जास्त अपेक्षा नव्हती. आबा तिच्याजवळ पोचला तेव्हा ती त्याच्या हातात पांढऱ्या कागदातले पाकीट देवून निघून गेली. तिच्या डोळ्यातले पाणी मात्र आबाला पाहावले नाही. तिने दिलेले पाकीट उघडल्यावर त्यात काही पैसै ठेवलेले दिसले. त्याखाली एक चिठ्ठी होती. त्याने ती तिथेच वाचायला सुरूवात केली.
'कुठून आणि कशी सुरूवात करू तेच कळत नाहीये, पण आज मला ही चिठ्ठी लिहून खुप मोकळे मोकळे वाटतेय. सहन न होणारी घुसमट थांबलीय. तुम्ही म्हणाल मी हे तुम्हाला काय सांगतेय? त्यालाही कारण तसेच आहे. मला तुम्ही ओळखत असालच. तरीही तुम्हाला माझी माहीत नसलेली ओळख सांगतेय. मी सौभाग्यवती होऊनही अभागी जीवन जगणारी अबला. संग्रामची नोकराणी. मला बोलता येत नसल्याचा फायदा तो रोज घ्यायचा. त्याचे आजवर खुप अन्याय सहन केले. पण जेव्हा तुमच्या बायकोचा केलेल्या विनयभंगाची गोष्ट मला म्हादुकरवी कळली तिथूनच माझ्या बंडाला सुरूवात झाली. पण मी काही करायच्या आतच त्याने तुमच्या बागेला आग लावली. गरीब म्हादुला सोबत घेऊन ते काम त्याने बिनबोभाट उरकले. बिचारा म्हादू मात्र पश्चातापात होरपळू लागला. तो माझ्याजवळ आपले दुख: हलके करायचा. त्याला आणि मलाही तुमच्या कुटूंबाची झालेली परवड पाहवत नव्हती. तुम्हाला काहीतरी मदत करावी असे मला वाटू लागले. पण मदत करणार कशी? मग आम्ही एक बेत रचला. मी आणि म्हादूने मिळून तळघरात ठेवलेला खजिना लुटायचे ठरले, जो संग्रामने चांगण्या सावकाराला फसवून तळघरात लपवून ठेवला होता. हे मलाच माहीत होते. त्याच्या किल्ल्या तो कुठे ठेवायचा ते देखील मला माहीत होते. पण ही गोष्ट संग्रामला माहीत नव्हती. तो मला वेड्यात काढायचा. माझ्या सहनशीलतेला मंदबुद्धी समजायचा. एके दिवशी मी म्हादूला तिजोरी फोडायला पाठवून पहारा द्यायला तळघराच्या बाहेर थांबले. म्हादूने ते काम बेमालूम केले. ती पेटी थोडे दिवस आम्ही आमच्याच घरी लपवून ठेवली. तुम्ही तुमच्या बागेत खड्डा उपसायची वाट बघत राहीलो. नंतर तुम्ही खत उपसायला सुरूवात केली. त्याच खतामध्येच पेटी लपवून ठेवणार होतो . पण थोड्या चांगल्या परिणामासाठी ती पेटी जमिनीत अजून खोलवर ठेवून दिली. ते कामही म्हादूने उत्तम केले पण त्यात एक अडचण आली. पेटी आत ठेवताना पेटीचा खालच्या बाजुचा पत्रा गंजल्यामुळे खालच्या बाजुने छीद्र पडले. मग म्हादूला तो भाग दुरूस्त करताना काही पेपर्स त्या पेटीत आढळले. प्रामाणिक म्हादुच्या जीवावर तेच पेपर बेतले. त्या पेपरमुळे तुम्हाला धन कोणाचे आहे हे समजेल म्हणुन त्याने ते पेपर परत आणले आणि माझ्याकडे दिले. मी पेपर पाहीले तर ते खुप महत्वाचे होते. संग्रात घरात नाही हे पाहून म्हादूजवळ ते परत तिजोरीत ठेवायला दिले. तो पेपर ठेवायला तळघरात गेला. मी पहारा देतच होते . त्याने तिजोरी उघडली तोच संग्रामने त्याचा हात पकडला. संग्राम तळघरात होता हे आम्हाला माहीत नव्हते. अनपेक्षीत हल्ल्यामुळे म्हादु चळाचळा कापू लागला. तिथेच संग्रामने म्हादुच्या कानाखाली मारली आणि त्याला सगळ्याचा जाब विचारू लागला. चाव्या बद्दल विचारू लागला. म्हादू तोंडातून एक चकार शब्द काढत नव्हता. संग्राम अजुनच मारत होता. मला वाटतं होतं मध्ये पडावे पण मीही घाबरले होते. इतक्यात संग्राम तिजोरीमध्ये डोकावला. खाली झालेली तिजोरी पाहून रागाने लाल झाला त्याला आपल्या पट्ट्याने मारतच विचारू लागला. सारखे खजिन्याबद्दल विचारून जोरजोरात मारू लागला. मार खावून खावून म्हादूमध्ये काहीच त्राण राहीले नव्हते.  म्हादू शेवटपर्यंत कबुल होत नाहीये हे पाहून तो चवताळला. त्याने जवळ पडलेली नायलॉनची दोरी घेऊन ती त्याच्या गळ्याभोवती पकडून परत परत विचारू लागला. रक्तबंबाळ झालेला म्हादू काहीच बोलायला तयार नव्हता. मला वाटले संग्राम मारायचा थांबेल पण तो धनासाठी वेडापिसा झाला होता. तो त्याच्याकडून वदवून घेण्यासाठी दोरीचा फास आवळू लागला आणि त्यातच अर्धमेल्या स्थितीत गेलेल्या म्हादूने आपले प्राण सोडले. त्याचे ढीले पडलेले डोकं पाहून संग्राम घाबरला. माझीही हालत खराब झाली. आलेला हूंदका आवरत मी मागे फिरले. या सगळ्याची शिक्षा संग्रामला व्हायची असेल आता त्याच्या दृष्टीस पडून चालणारे नव्हते. मी माझ्या डोळ्यातले अश्रु लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. तो मलाही चावीबद्दल विचारणार होताच. पण झालेला प्रकार एवढा भयानक होता कि त्याचवेळी मला ताप भरला. उभे राहायचे त्राण राहीले नाही. दरम्याण संग्रमाने प्रेताची विल्हेवाट कुठे लावली ते कळायला मार्ग नव्हता. प्रेत मिळाले त्याच दिवशी पोलीस आमच्याकडे तपासाला आले. त्याचवेळी या चिठ्ठी व्यतीरिक्त अजुन एका चिठ्ठीमध्ये माझी जबानी लिहीली होती ती गुपचूप पोलीसांच्या स्वाधीन केली. पोलीसांजवळ खजिन्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. संग्रामही सांगणार नाही कारण चाणक्या सावकाराचे प्रकरण उकरले जाऊ शकते त्यात त्याला चोरी आणि खुनाची शिक्षा होऊ शकते. नंतर संग्रामला त्या दिवशी अटक न करता दुसऱ्या दिवशी पोलीस घेऊन गेले. 
तुम्ही म्हणाल किती दृष्ट बाई आहे ही, स्वतःच्या नवऱ्याला पकडून दिले, कसाही असला तरी नवरा होता. कुंकूवाचा आधार होता. पण काय उपयोग होता अशा कुंकूवाचा? ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तसेच जे लावताना ज्याचासाठी लावतोय तोच आपल्या आणि इतरांच्या दुखा:चे कारण बनत असेल तर काय उपयोग? माझे दुख: तसे कोणाला नाही समजणार. असो. या चिठ्ठीसोबत असलेले सर्व पैसे म्हादुच्या बायकोला द्या. तिच्या समोर जायची माझी हिंम्मत नाहीये. तिला बिचारीला यातलं काहीच माहीत नाहीये आणि आपण पण कोणी सांगूही नका. यात म्हादुला सामील करून मीच मोठे पाप केलय त्यासाठी स्वत:ला मी कधीही माफ करू शकणार नाहीये. तुम्हाला हे सर्व या साठीच सांगीतले कि, तुम्हाला मिळालेला खजिना सुरक्षित राहावा. तो खजिना आता तुमचाच आहे. पण त्यातून म्हादुच्या कुटूंबाला आधार द्यायला हवा. त्या कुटूंबातील म्हादुची जागा आपण नाही घेऊ शकत पण त्यांना आपल्या हृदयात मात्र जागा देऊ शकतो. '
चिठ्ठी वाचून आबाला खुप वाईट वाटले. सारी रहस्ये उघड झाली होती. पण गेलेला जीव काही परत येणार नव्हता. म्हादू संग्रामच्या सहवासात राहून पण माणुसच राहीला आणि एक माणुस म्हणून गेला. असे म्हणतात की अप्रामाणिक माणसांच्या सहवासात प्रामाणिक माणसांचा कोंडमारा होतो. तसाच काहीसा कोंडमारा संग्रामच्या बायकोचा आणि म्हादुचा होत होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी एकाला जीव मात्र गमवावा लागला. राधा आबाच्या बाजूला येऊन कधी उभी राहीली ते आबालाच कळले नाही. दोघांची पाणी तराळलेल्या नजरेने नजरानजर झाली आणि तिला आबाच्या डोळ्यातील पाण्यात सारं काही स्वच्छ झाल्याचे दिसू लागले.
                    समाप्त.
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
शब्दांकन
नितीन राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८
