Thursday, 2 May 2019

©जिजी

©जिजी

" ते काही नाही, आपण दुसरीकडे राहायला जायचे." मनोज बेडरूमचे दार लावल्यावर म्हणाला.
" अरे पण बाबांचा काय त्रास आहे तुला? अक्षता त्याची समजूत काढत म्हणाली.
" तू बघतेस ना, मला प्रत्येक गोष्टीवरून बोलत असतात. आता मी काही लहान आहे का?" मनोज अजून वैतागलेलाच होता.
" तुला काय वाटते, माझी आई मला काही बोलत नाही? तिचा रोज फोन असतो मला. हे कर. असं कर ,तसं कर. कसं आहे ना मनोज, आपल्या आई वडीलांना जोपर्यंत आपण आई वडील होऊन एका आईबापाची काळजी काय असते ती आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपल्याशी असच वागतात." अक्षता म्हणाली.
" असं काही नसतं, म्हणजे आपल्याला मुलं झाली कि ते बोलणार नाहीत का आपल्याला?" मनोज चेहरा उडवत म्हणाला.
" खरं तर ते वावगं असं काहीच वागत नाही आहेत. फक्त तू समजून घ्यायला कमी पडतोयस."
" ये, हे जास्त होतयं हा, म्हणजे मला काहीच कळत नाही. तुम्हालाच सगळं कळतं."
" असं नाही तू बाप झाल्यावर तुला कळेल."
" हं " मनोजने तुच्छतापूर्वक हूंकार भरला.
अक्षताला कळून चुकले कि आता मनोजला जास्त बोलून काही उपयोग नाही. 
ती कुस बदलून झोपेची आराधना करू लागली.

तिला झोप काही येत नव्हती. मनोजचे बाबांच्या स्वभावाचे दर्शन तिला लग्नाच्या दिवशीच आले होते. त्याच दिवशी तिने त्यांना आपले बाबा मानले होते. तो प्रसंग आजही जशाचा तसा तिला आठवत होता.
लग्न लागून गेले होते. अक्षता रिसेप्शनसाठी तयार होत होती. थोड्यावेळाने ती बाहेर येणार होती इतक्यात तिचे बाबा तिला बोलवायला आले. तिला एका बाजूला घेतले.
" अगं अक्षू , तू तूझं एटीएम कार्ड आणलयं का?"
" हो, आहे माझ्या पर्समध्ये. का ? काय झालं?"
" बेटा लग्नात माणसे वाढल्यामुळे जेवनाचे बजेट वाढले आहे, त्यामुळे जास्तीचे पैसे लागणार आहेत."
" पण बाबा माझ्या खात्यात जेमतेम दोन हजार असतील ओ."
" हो काय. बघतो कायतरी. " असं बोलून ते घाईघाईत तिथून निघाले. बाबांच्या चेहऱ्यावरील काळजीचे तिने सावट तिने जवळून पाहिले.
ती हतबल झाली होती. ती आपल्या खोलीकडे परतली. काही तयारी बाकी होती.
थोड्यावेळाने तिचे सासरे -जिजी तिला भेटायला आले. त्यांनी ती स्टेजवर जाण्यासाठी बाहेर पडत असतानाच तिच्या हातात एक लिफाफा ठेवला.
" बाबा काय आहे हे."
" काही पैसे आहेत, ते तुझ्या बाबांना दे."
" नाही बाबा, मी नाही घेऊ शकत हे पैसे."
" बेटा तूच घेऊ शकते, तुझे मानी बाबा ते कधीच घेणार नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय. मघाशी मी त्यांना म्हणखलो देखील कि हॉलचे जादा लागलेले पैसे मी भरतो, पण ते ऐकले नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय"
" पण बाबा?"
" बेटा मी तुमचे बोलणे ऐकलेय. एका बापाची काळजी मी समजू शकतो. नाही म्हणू नकोस. हवंतर मैत्रिणी कडून घेतले असे बोल." असे बोलून जिजी तिथून निघून आले.

        सासूबाई लग्नापूर्वीच सोडून गेल्यामुळे आता साऱ्या घराची जबाबदारी अक्षतावर पडली होती. कुटुंब जरी लहान असले तरी सगळ्या जबाबदाऱ्या अक्षतालाच पार पाडाव्या लागत होत्या. जिजी मनोजच्या काहीश्या मनमानी स्वभावामुळे काळजीत असायचे.
आता लग्न होऊन जेमतेम चार वर्षे झाली होती आणि मनोज स्वतंत्र राहायचे म्हणत होता. अक्षताचे मन याचा विचारही करू शकत नव्हते. अशी गोष्ट मनोज करत होता.

         अशातच एक सुंदर गोष्ट मनोज आणि अक्षताच्या जीवनात आली. अक्षताला दिवस गेले होते. सगळ्यांनाच आनंद झाला. सासरे तर अक्षताला जपायला लागले. अक्षताला वाटायचे ते आईच्या मायेने सासूबाईंचीच भूमिका पार पाडत आहेत. पण हे सारे मनोजला उमगत नव्हते. त्याला बाबांचा हस्तक्षेप नको होता. एक दिवस तर त्याने कहरच केला.
" तुम्ही आमच्यामध्ये नाक खूपसू नका, तिला माहीत आहे मूल कसं वाढवायचं ते." मनोज असं म्हणाल्यावर बाबा काही न बोलताच तिथून निघून गेले.
अक्षताला खूप वाईट वाटले. मनोजचा खूप राग आला. अक्षता बाबांच्या खोलीत आली तेव्हा जिजी बॅग भरताना दिसले. तिच्या काळजात धस्स झाले.
" बाबा, काय करताय हे."
" काही नाही पोरी. आक्काकडे चार दिवस राहून येतो. तिथून आपल्या गावच्या घरी पण जातो, मला तेवढाच बदल आणि तुम्हालाही."
" बाबा, आम्हाला काहीच अडचण नाहीये,  तुम्ही हवे आहात आम्हाला."
" अक्षू, मला ना आता खूप जगलोय असं वाटू लागलंय. आता फक्त नातीचे तोंड पाहीले कि मरायला मोकळा"
" बाबा, काय बोलताय हे? " असे बोलून त्यांच्या तोंडावर हात ठेवला.
" देशील मला नात?"
" हो , पण नातच का? नातू का नको?"
" मनोजला म्हातारपणी कोण पाहील गं? नातू मनोजसारखा वागला तर? मला आज वाटतंय, आम्हाला एक मुलगी हवी होती. "
" मग मी कोण आहे? किती विचार करता बाबा. मी समजावते मनोजला. तो जे आज वागला ते चूकीचे आहे."
" नको समजावू, त्याचे म्हणणे बरोबर आहे. त्याला फक्त माझे बोलणे नकोय. तुला माहीत आहे, हाच मनोज लहाणपणी मी गोष्ट सांगितल्या शिवाय अजिबात झोपत नसायचा. माझा आवाज, माझी बडबड त्याला कायम हवी असायची. खूप हळवा होता तो. नंतर इंजिनिअरिंगसाठी बाहेर राहीला तो पूर्ण बदलूनच गेला. घरी आल्यावर घुम्यासारखा असायचा. आम्हाला उलट उत्तरे द्यायचा. त्याची आई हार्ट पेशंट त्यात याचे हे वागणे, यामुळे तिचे दुखणे बळावत गेले. तिने तसं बोलूनही दाखवलं. आपला मनोज बदललाय. मी त्याला समजावून सांगायचो. तो तेवढ्या पूरते ऐकायचा. याच्या अशा वागण्याचा धसका घेऊन कि काय.. तिने राम म्हटला. तो त्यावेळी पुण्यात होता. नंतर त्याचे लग्न करताना वाटले तुला आम्ही फसवत तर नाहीये ना?
अक्षू एक विचारू? "
" हा बाबा , विचारा."
" तुझ्याशी तरी नीट वागतो का?"
" हो." तिच्या अस्पष्ट हो ने जिजी काय समजायचे ते समजले. इतक्यात अक्षताचा मला मोबाईल वाजला. मनोजचाच फोन होता. बाबांना इलेक्ट्रीसिटीचे बिल भरायला सांगण्यासाठी कॉल केला होता.

'तुझ्याशी तरी नीट वागतो का? ' हे सासऱ्यांचे वाक्य तिच्या कानात दिवसभर घुमत राहीले.

          जिजी दुसऱ्या दिवशीच आक्का (त्यांची बहीण ) कडे निघून गेले. अक्षताला मनोजमधला फरक जाणवला. तो खूश होता. अक्षता मात्र अपराधी भावनेत होरपळत होती. अक्षता आपले मन आपल्या आईकडे मोकळे करायची. या सगळ्या प्रकारात तिला खूपच त्रास झाला होता. मनोज विरोधात ती एक ही शब्द काढू शकत नव्हती. शिवाय समजावण्याचा पलीकडे त्याचे वागणे गेले होते. तिची आई समजूत काढायची. शिवाय पोटात एक जीव वाढत होता. त्यासाठी तरी तिला खूश राहायचे होते.

         एक मनोज ऑफिसमध्ये गेला असताना जिजींचा फोन आला. अक्षताला खूप बरे वाटले. ते गावी गेल्यापासून काहीच खूशाली समजली नव्हती.
" बाबा कसे आहात."
" मी मस्त मजेत आहे. मनोज कसा आहे?" मनोजचे त्यांच्याविषयी वागणे माहीत असूनही त्यांनी मनोजची विचारणा केल्यावर परत एकदा अक्षताला जिजींविषयी आदर वाढला.
" तो बरा आहे?"
" तू? आणि आमची छकूली कसे आहात?" ते लाडात येऊन म्हणाले. मुलामुळे गावी जाऊन राहावे लागले याबद्दल त्यांच्या मनात तीळमात्रही तक्रार दिसत नव्हती.
" मी बरी आहे आणि छकुलीची हालचाल वाढलीय."
" अरे वा, मजा आहे एका माणसाची."
" कसली मजा बाबा? तुमची खूप आठवण येतय ."
" पोरी माझी कसली आठवण काढतेस? माझ्या नातीला जप. मी तुझ्या आईला यायला सांगितलंय."
" कुठे?"
" तुमच्या घरी. तुझी काळजी घ्यायला."
" बाबा." तिचा कंठ दाटून आला होता. जिजीनी स्वतःच्या मालकीचे घरही मनोमन दोघांना देऊन टाकले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी विषय बदलून अक्षताला हसायला भाग पाडले. अशा त्यांच्या मनोज नसताना तासनतास गप्पा चालायच्या. अक्षतासाठी जिजी हे आई, बाबा, मित्र सारं काही तेच होते. चार दिवसांनी अक्षताची आई तिच्याकडे राहायला आली.        दिवसांमागून दिवस गेले. अक्षताच्या ओटीभरण कार्यक्रमासाठी जिजी आले. तिला खूप आनंद झाला. ती माहेरी जायला बाहेर पडली तसे तेही गावी जायला निघाले. मनोजने एका शब्दाने त्यांना अडवले नाही. फक्त जाण्यापूर्वी तो एक मात्र बोलून गेला.
" बाबांना एकटे राहायचा सराव होतोय ते बरंच आहे" अक्षताच्या जवळ पूटपुटलेले वाक्य जिजींनी ऐकले होते. ते काहीच बोलले नाही. मनोजने मागच्या महिन्यातच घर बुक केले होते ते अक्षता आणि त्यांना दोन दिवसापूर्वी कळाले होते. अक्षता आतून तुटून गेली होती. तिला वेगळे राहायचे नव्हते. जिजींनी त्यांच्या नातीसोबत काही क्षण घालवावेत असे वाटत होते. जिजींना नवीन घरात घेऊन जाण्याविषयी मनोजकडे बोलायला ती घाबरत होती. मागे एकदा असचं तिने विषय काढला होता तेव्हा मनोज तिला खूप बोलला होता.

        काही दिवसांनी अक्षताच्या उदरी एक सुंदर मुलगी जन्माला आली. सर्वप्रथम तिने जिजींना कळविले. जिजी धावत मुंबईला आले. तिला, इवलासा जीव उचलून घेतलेले जिजींचे हात थरथर कापताना दिसले. जिजींची तब्येत खालावली होती. ते खूपच थकले होते. बोलताना धाप लागत होती.
" बाबा, तुम्हाला बरं नाहीये का?"
" अगं, जरा खोकला झालायं." खोकल्याची उबळ आली तसे बाजूला झाले..
बारसा अक्षताच्या माहेरी झाला. बारश्यापर्यंत थांबून जिजी गावी निघून गेले.
थोड्या दिवसानी अक्षता घरी आली. ती उर्वीच्या बाललीलांमध्ये रंगून गेली. जिजींशी फोनवरील बोलणे कमी होऊ लागले. एक दिवस जिजींचा फोन आला पण लाईनवर जिजी नव्हते तर जिजींच्या गेल्याची बातमी होती. अक्षता जाग्यावरच कोसळली. तिने स्वतःला सावरून मनोजला कॉल केला. लगेचच सगळे गावी जायला निघाले.

         सर्व अंत्यविधी सोपस्कार आटपून मनोज घरी आला. आंघोळ करून झाल्यावर शेजारच्या माईंनी लाल मिरचीची चटनी आणि उकडीचा करडा भात खायला दिला. सारे काही शांत होते. फक्त माईंची तेवढी जिजींच्या चांगुलपणाविषयी बडबड चालू होती. कधी नव्हे ती छोटी उर्वी खूप रडत होती. अक्षता तिलाच थोपवत होती. इतक्यात मनोजने जोरात हंबरडा फोडला. ताटातील भात मिरचीच्या चटनीसोबत बकाबका खात तो रडू लागला. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. माई त्याला पोटाशी धरून सांत्वन करू लागली.
" अक्षता ,आपल्या अगोदर बाबाच आपल्याला सोडून वेगळे राहायला गेले गं."
असे बोलून ओक्साबोक्शी रडणारा मनोज अक्षताला वेगळाच भासला. अक्षता मनोजजवळ येऊन त्याला धीर देऊ लागली. बापाचा आवाज ऐकून की काय छोटी उर्वी रडायची थांबली होती. तिने नकळत मनोजचे एक बोट पकडले. त्याने चमकून छोट्या जीवाकडे पाहिले. आपणही असे जिजींचे बोट पकडून बालपण मिरवले असेल आणि त्याबदल्यात त्यांना काय दिले? एकाकीपण ? त्याला परत एकदा हूंदका आवरेणासा झाला.
" अक्षू मला बाबा हवे आहेत गं , मी त्यांना कधी समजूच शकलो नाही." एका मुलीचा बाप एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. त्यांना इकडेतिकडे शोधू लागला. जिजी मात्र केव्हाच स्वतंत्र राहायला गेले होते .

समाप्त..
© या लघुकथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०३.०५.२०१९

Thursday, 18 April 2019

© लोण्याचा बाजार

© लोण्याचा बाजार

      शेलार मामा आणि सावळ्या ही जोडगोळी गावात ओवाळून टाकलेली दोन टाळकी. ते दोघे काहीही कामधंदा न करता गावात उंडगत असायचे. लोकांना टोप्या घालायचे कामच तेवढे त्यांना जमत होते. तो बाजाराचा दिवस होता.  ही जोडगोळी बाजारातून मधल्या वाटेने घरी परतत होती. वाटेवर बाभळीच्या झाडांशिवाय काहीच दिसत नव्हते. लांबच्या लांब वावरे पाण्याशिवाय सुकी पडली होती. जमिनीच्या भेगा दिवसेंदिवस रूंदावत जाऊन शेतकऱ्यांची निराशा वाढवत होत्या. डोक्यावरचे उन वाढले तसे त्या दोघांनी पाय उचलले. बांधाकडून जात असताना सावळ्याला वावराच्या बांधाच्या खाली कोणीतरी पडलेले दिसले. सावळ्याने पुढे जाऊन पाहिले तर शेजारच्या पाड्यावरचा आत्माराम पाटील पालथा पडलेला दिसला. सावळ्याचे कुतूहल जागे झाले. भर उन्हात त्याला असे पडलेले पाहून सावळ्याच्या मनात पाल चुकचुकली. त्याने त्याला सरळ करून पाहिले तर तो मेला होता. सावळ्या सरकन एक पाऊल मागे सरला. त्याने शेलार मामाला हाक मारली. शेलार मामा पण चकीत झाला. कालच त्याने आत्मारामला सलगरांच्या दुकानात तंबाखू घेताना पाहिले होते. दोघे तिथे बराच वेळ बसले.  शेलारमामाच्या डोक्यात एकच गोष्ट घुमू लागली.

" आरं सावळ्या, ह्या आत्मारामाचे पूरं नाव काय हाय रं?" शेलारमामाचे डोके जोरात चालू लागले.
" आरं मामा, ह्यो सखारामाचा धाकला न्हंव का"
"आसं व्हय, मंजी ह्याच बी नाव आत्माराम सखाराम पाटील".
" ह्याच बी मंजी रं? "सावळ्याला शेलारमामा काय बोलतो ते कळत नव्हते.
"हात घाल, सांगतो मगं, मंजी काय ते" शेलारमामा आत्मारामच्या प्रेताला हात घालत म्हणाला.
सावळ्या काही जागचा हलत नाही, हे बघितल्यावर शेलार मामाचा नाईलाज झाला. त्याने सावळ्याच्या कानात सारं काही सांगितले. तसं पण तिथे ऐकणारे कोणीच नव्हते. पण शेलारमामाला कोणताच धोका पत्करायचा नव्हता. शेलारमामाने सांगितलेला प्लॕन ऐकून सावळ्या उडालाच. शेलार मामा आपला दोस्त असल्याचा सावळ्याला अभिमान वाटला. हा बेत यशस्वी झाला तर भरघोस बक्षीस मिळणार होतं, यात शंकाच नव्हता.

          शेलार मामा आणि सावळ्या आत्मारामचे प्रेत उचलून नदीच्या दिशेने नेऊ लागले. दुपारची वेळ असल्यामुळे तिकडे कोणीच फिरकणार नव्हते. तरी पण शक्य तेवढी काळजी ते दोघे घेत होते. शेलारमामाच्या शेतात येईपर्यंत दोघांची पुरती दमछाक झाली. कपाळावरचा  घाम पुसत सावळ्या आणि मामा बांधावर बसले. तहानेने दोघांचाही जीव व्याकूळ झाला होता. पण हाती घेतलेले काम पूर्ण करणे गरजेचे होते.

          शेलारमामांनी खिशात हात घातला. पण आत मोबाईल नव्हता.

"आरं सावळ्या, माझा मोबाईल गावना झालाया"
सावळ्याने उगाचच आपल्या खिशात हात घातल्यासारखे केले. शेलारमामाला शोधता शोधता कायतरी आठवले तसा तो मागे धावत सुटला. धापा टाकत तो आत्माराम जिथे पडला होता तिथे पोचला. तिथेच त्याचा मोबाईल पडला होता. पण त्याच वेळी वारकेंच्या संतोषला शेलारमामा नदीच्या दिशेने जाताना दिसला.

         अण्णा पाटील साखरभुंगे गावचा उमदा सरपंच. निवडणुकीत बक्कळ पैसा वाटून सरपंच झालेला. सत्तेचा माज त्याच्यावर हळूहळू चढू लागला होता. त्याच्या बायकोकडे पतसंस्थेचे चेअरमनपद असल्यामुळे लिक्विडीटीला काहीच अडचण नव्हती. तसंही त्याला पैशाची काहीच कमतरता नव्हती,  पण पैशांचा लोभ काही सुटत नव्हता . तो या ना त्या मार्गांने पैशाला पैसा जोडत होता. गावात पडलेल्या सुक्या दुष्काळाचे त्याला काहीच देणे घेणे नव्हते. यंदाचा पूरा हंगाम कोरडा गेल्यामुळे बऱ्याच लोक शहराकडे धाव घेऊन  उदरनिर्वाहासाठी काम करत होते. अण्णा पाटलांसह चार पाच घर सोडली तर गावात सगळ्यांना आर्थिक चणचण होती. सगळ्या गावाची जगण्यासाठी धडपडत होती. तर अण्णा पाटील दारू पिऊन धडपडत होता. आजही तो सकाळीच ढोसून आला होता. त्याचा अंमल अजूनही टिकून होता. तो आतल्या खोलीत झोपायला जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला. थोडावेळ वाजणाऱ्या फोनकडे पाहत राहिला. रिंग वाजून बंद झाली. परत त्याच व्यक्तीचा फोन आला. डोळे मोठे करत  धडपडत कॉल घेतला.
" हेलो, कोण हाय रं , एवढ्या दुपारच्याला" ....
" बोल की . "
" मग मी काय करू म्हणतोस ?"  सरपंच भराभर बोलत होता. नंतर मग समोरच्या व्यक्तीचे बराच वेळ ऐकत राहिला. ऐकतानाच त्याची अर्धी अधिक उतरली.
" बेस केलं गड्यानो , मी काही सांगत नाही,  तवर तिथना हलायचं नाय"
        आईला कोरा चहा ठेवायला सांगून त्याने बायकोला फोन लावला. ती नुकतीच गावातल्या पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्याने फोनवर बायकोला दबक्या आवाजात सगळे नीट समजावून सांगितले. एवढ्यात  त्याची आई चहा घेवून बाहेर आली.  दहा मिनिटांपूर्वी धडपडणारा चिरंजीव अण्णा पाटील बरेचसा शुद्धीत आल्याचे तिला दिसले.

         सकाळी गेलेला आत्माराम अजून घरी आला नाही, म्हणून रखमा काळजीने येराझाऱ्या घालत होती. छोटा मुलगा एकदा शेतात जाऊन आला पण आत्माराम कुठेच दिसला नव्हता. रखमाचा जीव खाली वर होत होता. ती मनातल्या मनात स्वतःला  दोष देत होती. मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची खूपच चीडचीड होऊ लागली होती. आत्माराम सरळमार्गी वारकरी ! आपले काम भले की आपण भले अशा वृत्तीचा आत्माराम स्वभावाने शांत होता. कोणाच्या उठण्या बसण्यात नव्हता. दोन मुलं आणि बायको असे त्याचे चौकोनी कुटुंब. पण तो कधी नव्हे तो पहिल्यांदाच बायकोवर चिडला होता. गेले चार महिने दुष्काळामुळे शेतीची कामे अजिबात झाली नव्हती. पतसंस्थेमधून कर्ज घेऊन घेतलेले बी बियाने आणि खत घरात तसेच पडून होते. घरातील दाणागोटा संपत आला होता. त्यात बायकोने मुलीच्या लग्नाचे टुमने मागे लावले होते. त्याने वारंवार बायकोला सांगून पण तिच्या डोक्यातून तो विषय जात नव्हता. पण आज मात्र मुलीच्या लग्नासाठी सोन्यासारखी जमिन विकूया, असं तिनं बोलताच आत्माराम रागवला होता. न्याहरी न करताच सकाळी बाहेर निघून गेला होता. तो गेल्यावर मात्र रखमाला फार वाईट वाटले होते. दुपारी जेवणासाठी ती त्याची वाट बघत होती. पण जेवणाची वेळ टळून गेल्यावरही तो आला नाही,  तशी ती खाली वर झाली. एकदा मुलाला शेतात पाठवून बघितले. नंतर स्वत: आत्मारामला शोधत माऊली गावात सगळीकडे फिरली. पण तो कोणालाच दिसला नव्हता . दुपारपासून रखरखत्या उन्हात फिरताना तिला खूप त्रास होत होता.

          तिन्हीसांज झाली. तिच्या मनात नाना शंका येऊ लागल्या. दुपारपासून घरी कोणीच जेवले नव्हते. सुरेखा जेव्हा रात्री शहरातून घरी आली, तेव्हा तिला सारा प्रकार समजला. आई आणि भाऊ रडताना पाहून गलबलली. ती आपल्या आईला समजावू लागली. तिही मनातून हादरली होतीच. पण धीर सोडून चालणार नव्हते. सुरेश लहान असल्यामुळे त्याला एवढी समज नव्हती. तो देखील कावराबावरा झाला होता. आजूबाजूची माणसेही हळूहळू घरी जमू लागली. त्यातले चार पाच पुरुष विजेऱ्या घेऊन आत्मारामला शोधायला निघाले.

         चार पाच माणसांना नदीच्या किनाऱ्याला जाताना बघून शेलारमामा आणि सावळ्याने सुटकेचा निश्वास सोडला. दबक्या पावलांनी ते घराकडे निघाले. मोहीम फत्ते झाल्याचा आसूरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. इकडे शिरपा, गणप्या, बाजबा आणि पवन्या नदीच्या बाजूला पोचले तेव्हा त्यांना समोर जे काही दिसले ते पाहून ते हादरलेच. आत्माराम एका आंब्याच्या झाडाला लटकताना दिसला. बॅटरीच्या प्रकाशझोतात आत्मारामचे प्रेत भयाण दिसत होते. शिरप्या डोक्याला हात लावत मटकन खाली बसला. आत्माराम हा त्याचा सवंगडी होता. त्याच्याने ते पाहवेना. तो त्याला खाली उतरवायला धावला तसा त्याला बाजबाने मागे ओढला.
" शिरप्या , आरं खुळा बिळा झालायस का? पोलीस केस हाय ही, अजिबात हात लावू नगसं" तसा शिरप्या भानावर आला. चौघेही हा प्रकार पाहून चांगलेच हादरले होते. गावात असा प्रकार यापूर्वी झाला नव्हता.

" हे लय वंगाळ झालं रं बाबा" असे बोलून बाजबाही खाली बसला. पवन्या अजूनही थरथर कापत होता.

" त्या माऊलीला कसं तोंड द्यायाचं तोच परस्न डोळ्यापतूर उभा हाय रं बाबा" गणप्या गलबलला.
बराच वेळ ते चोघेजण बोलत बसले. काय करावे त्यांना कळत नव्हते. गावात जाऊन सारं सांगणे गरजेचे होते. पण आत्मारामच्या घरी आताच सांगून चालणार नव्हते.
         थोड्यावेळात चौघेजण मान खाली घालून आत्मारामच्या घरी पोचले. तिथे त्यांच्या भोवती सर्वांनी गराडा घातला . पण त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. उत्तर असून पण आता सांगने त्यावेळी तरी रास्त वाटले नाही. रखमाची काळजी अजूनच वाढली. शेजारी आग्रह करत असताना पण रखमा आणि दोन मुलं अन्नाला शिवत नव्हती. रखमाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रु पुसताना सुरेखा मनातून जाम हादरली होती. काय झालं असेल आपल्या बापाचं काहीच कळत नव्हते. आपल्या पित्यावर तिचे खूप प्रेम होते. आत्मारामही बायका मुलांना सोडून कुठे जात येत नव्हता.

         संतोष वारके आपल्या कामगिरीवर भलताच खुश होता. पण दुःखाची भावनाही त्याला सतावत होती. त्याच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले होते.  तो एका माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार होता. तो फक्त सकाळची वाट पाहत होता. लहानपणीच आई वडील गमावलेला संतोष मुंबईत आपल्या काकांजवळ राहायचा. पण शेतीच्या कामासाठी तो गावाला आला होता. संतोषला काही केल्या झोप येत नव्हती. त्याने पाहिलेला विटंबनेचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. बराच वेळ तो अंथरुणावर उठून बसला होता. रात्री खूप उशीरा त्याला झोप लागली.

सकाळचे आठ वाजले होते. शेजारचा बारक्या संतोषला हलवून उठवत होता.
" संत्या आरं उठ. लय इपरीत घडलं बघ"
संतोषला जाग आली.
" काय सांगतोस?" संतोष आश्चर्यचकीत झाल्याचे नाटक करत उठला.
" हा रं बाबा, सुरेशच्या बापानं झाडाला गळफास लावून घेतलायं " संतोष सगळे आवरत आवरत बारक्याचे बोलने ऐकत होता. खरतरं त्याला या अगोदरच नदीवर पोहोचायचे होते.
"बारक्या, सुरेशच्या घरी सांगितले का?"
"होय, सुरेशची आई लय वरडत गेलीया नदीकडे"
संतोष आणि बारक्या बोलत बोलत नदीजवळ कधी पोचले ते कळलेच नाही.
अजून तिथे पोलीस आले नव्हते. रखमा आणि सुरेखा धाय मोकलून रडत होत्या. सारा गाव तिथे जमा झाला होता. सारे जण हळहळत होते. सरपंच अण्णा पाटील , मित्र सावळ्या आणि शेलारमामासह दुःखी चेहरे करून एका बाजूला उभा होता. रखमाच्या डोळ्यातील पाण्याला थारा नव्हता. रडत रडत स्वतःलाच दोष देत होती. आत्मारामने अस का केले असावे ते कोणाला काहीच कळत नव्हते. आत्माराम असे काही करेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. थोड्यावेळात पोलीस आल्यावर सगळे बाजूला झाले. संतोष धीटाईने जरा पुढे आला. त्याच्या घशाला कोरड पडली होती. पोलीसांनी काही जुजबी प्रश्न विचारून रितसर पंचनाम्याला सुरूवात केली. नंतर आत्मारामचे प्रेत खाली उतरवून शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले.
पोलीस जुजबी चौकशी करुन निघून गेले. त्यांच्यासाठी शेतकरी आत्महत्येच्या घटना रोजच्याच झाल्या होत्या. संतोषला फक्त पोर्ट मॉर्टमच्या रिपोर्टची प्रतिक्षा होती. संतोष पवनची मोटरसायकल घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाला जिथे आत्मारामचे शवविच्छेदन होणार होते. त्याला अजून बऱ्याच गोष्टींचा छडा लावायचा होता.
शवविच्छेदन होऊन आत्मारामचे प्रेत मिळायला दुसरा दिवस उजाडला. अंत्यसंस्कार पार पडले. भर दुष्काळात आत्मारामचे कुटुंब वाऱ्यावर पडले. रखमाला काहीच कळत नव्हते, आपल्या नवऱ्याने आत्महत्या का केली असावी? कुठेतरी ती स्वतःला  दोषी मानत होती. सर्वजण शवविच्छेदनाचा अहवाल यायची वाट बघत होते. त्या कुटुंबाला संतोषची खूप मदत झाली होती. आत्मारामच्या पश्चात तोच कुटुंबाची काळजी घेत होता. रखमालाही त्याची तिच्या कुटुंबाप्रतीची तळमळ दिसून येत होती. पण तो असं का करत असावा,  याचा विचार करायला ती भानावर नव्हती.
         दोन दिवसांनी शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी तसे आत्मारामच्या कुटुंबियांना कळवले. सुरेखा संतोषला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. त्याचवेळी संतोषने सुरेखा थोडी बाजूला गेली असता पोलीसांना जे काही त्याने पाहिले होते ते सारे सांगितले. पण पोलीसांकडून मिळणारी उडवा उडवीची उत्तरे ऐकून संतोषने शेवटी आपला हुकूमाचा एक्का बाहेर काढला. संतोषच्या मोबाईलमध्ये कैद तो व्हीडीओ मधील प्रकार पाहून पोलीसही हादरले. तो व्हिडिओ आणि शवविच्छेदनाचा रिपोर्ट पाहून ती आत्महत्या नाही,  याला दुजोरा मिळाला. पण फासावर चढवण्याचा प्रकार का केला असावा , याबद्दल कोणाचेच डोके चालेना. पण यातला मास्टरमाइंड कोण आहे तेच कळत नव्हते. पोलीसांना त्या व्हीडीओमधील व्यक्तींना ताब्यात घेऊन मुख्य संशयिताला   सावध करायचे नव्हते. संतोषच्या मदतीने ते या केसचा सखोल तपास करू लागले. त्या व्यक्तींच्या भोवती साध्या वेशातले पोलीस पाळत ठेऊन होते. पण फारसे काही हाती लागत नव्हते. शेलारमामा आणि सावळ्याची अण्णा पाटलाशी वाढती फोनाफोनी आणि भेटीगाठी पोलीस तपासात कामी आल्या. पण फास लावण्याचा मुख्य उद्देश काही पोलीसांच्या लक्षात येत नव्हता. पण संतोषने आपले पूर्ण लक्ष अण्णा पाटीलावर  केंद्रीत केले होते.
           संतोषला पण हे सर्व करण्याचा हेतू कळत नव्हता. एक दिवस संतोष शहरामध्ये आपल्या मित्राच्या टिव्ही रिपेअरींगच्या दुकानात बसला असताना संतोषला हवा असलेला माणूस नव्यानेच सुरू झालेल्या बँकेतून बाहेर येताना दिसला. तो माणूस जसा बँकेतून बाहेर पडून गेला तसा संतोष बँकेत घुसला. बँकेत त्याला हवी असलेली व्यक्ती मिळाली. हव्या त्या पेपरची एक प्रत घेवून संतोष तडक पोलीस स्टेशनला निघाला. संतोषची हुशारी बघून करमरकर साहेब खुश झाले. त्यांनी लागलीच पुढील तपासासाठी एक पथक साखरभुंगे गावात पाठविले आणि एक पोलीस त्या बँकेत पाठवून दिला.
करमरकर साहेबांनी संतोषसाठी चहा मागवून त्याच्यासमोर एक फॉर्म ठेवला. संतोषच्या मनात जे होतं तेच घडत होते. या कामात स्वत: करमरकर साहेब लक्ष घालणार होते त्यामुळे शंभर टक्के यशाची हमी होती.
पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्याबरोबर संतोषने सुरेखाला कॉल लावला आणि आपल्या नोकरीबद्दल बातमी दिली. तिचे  दुःखी मन काहीसे आनंदून गेले. गेल्या आठ दिवसात ती जरासुद्धा हसली नव्हती. या बातमीने मात्र तिच्या चेहऱ्यावर किंचितसे हसू उमटले. तिला संतोष भेटला होता तो दिवस आठवला.
            संतोष नुकताच मुंबईहून गावाला होता. त्याच्या गावच्या घरी कोणीच नसायचे. तो मुंबईहून येऊन जावून असायचा. त्यादिवशी सुरेखाला कामावर जायला उशीर झाला होता. साखरभुंगे गाव आणि तालुक्याचे ठिकाण यात फारसे अंतर नव्हते. नेहमीची बस चुकल्यामुळे ती चालतच निघाली होती. इतक्यात मागून मोटारसायकलवरून  संतोष आला. त्याने स्वताहून बाईक थांबवून तिला लिफ्टसाठी विचारले . सुरूवातीला नाही म्हणणारी सुरेखा संतोषच्या आग्रहाला नकार देवू शकली नव्हती. तेच निमित्त त्यांच्या तोंडओळखीचे मैत्रीत रूपांतर व्हायला पुरेसे ठरले. उंचापुरा, पिळदार शरीरयष्टीचा सावळा संतोष सुरेखाला आवडू लागला होता . पण ती तसं दाखवत नव्हती. संतोषला पण सुरेखा आवडली होती. त्यामुळेच त्याचा गावचा मुक्काम वाढत चालला होता. एके दिवशी संतोषने तिला लग्नासाठी मागणी घातली. असे काही होईल माहीत असताना सुद्धा तिची धडधड वाढली होती. पण त्यावेळी त्याला ' घरच्यांची परवानगी असेल तरच आपले लग्न होईल ' असे सांगायला ती विसरली नव्हती. तिला संतोषच्या गावी राहण्याच्या निर्णयाची भीती वाटत होती. पोटाला चिमटा काढून शिक्षण दिलेल्या आपल्या मुलीचे लग्न तिचे बाबा शेतकऱ्याशी मुळीच लावणार नव्हते , हे तिला पक्के ठाऊक होते. तरीपण ती आपल्या बाबांना संतोषबद्दल सारं काही सांगणार होती आणि त्याच दिवशी त्यांनी कायमची चिरनिद्रा घेतली होती. बाबांचे निघून जाणे तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पार कोलमडून गेलेल्या आईला सावरताना ती आपले दुःख  साफ विसरून गेली होती. भाऊ लहान असल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावरच आली होती. संतोषच्या साथीमुळे तिला बराच आधार मिळाला होता. शवविच्छेदनाच्या अहवालावरून एक गोष्ट लक्षात आली होती. आपला बाप भ्याड नव्हता, संकटांना घाबरणारा नव्हता. असे बरेच दुष्काळ त्याने पाहिले होते. त्या सर्व दुष्काळांशी सामना करत आम्हांला शिकवले होते. आत्महत्येचा विचार देखील त्याला शिवणारा नव्हता. यात कायतरी गौडबंगाल आहे. संतोषही काही नीट सांगत नव्हता.  ती विचार करता करता घरी कधी पोहोचली ते तिला कळलेच नाही. घरी आल्यावर तिने आईला जेवू घालण्याचा असफल प्रयत्न केला. नवऱ्याच्या आत्महात्त्येच्या धक्क्याने बिचारी आपले जगणेच विसरली होती. नवऱ्याच्या मृत्यूचे कारण स्वत: बनल्याचे शल्य तिला सलत होते.

      सकाळची वेळ होती. सुशिलादेवी पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये आपले रोजचे कामकाज आटोपत होत्या. त्याचवेळी त्यांना सोसायटीच्या दिशेने एक जीप धुरळा उडवत येताना दिसली. जशी जीप जवळ आली तसे तिला ती जीप पोलीसांची आहे हे समजले. पोलिसांनी तिला काहीच बोलू न देता ऑफीसच्या झडतीला सुरुवात केली. काही वेळातच त्यांना ज्याची शंका होती त्याबद्दलचे पुरावे सापडले. सुशिलादेवीना असं काही घडेल याची तीळमात्र शंका नव्हती. मिळालेले पुरावे पोलिसांनी हस्तगत करून सुशीलादेवींना पोलीस स्टेशनला घेवून गेले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. शेलारमामा आणि सावळ्याचे धाबे दणाणले. ते दोघे सरपंचाच्या घरी धावले. एव्हाना सरपंचानाही ही बातमी कळली होती. ते बाहेर निघायच्या आत पोलीसांची जीप त्यांच्याच घराकडे येताना दिसली आणि दुसऱ्या बाजूने शेलारमामा व सावळ्याही येताना दिसले. अण्णा पाटील हादरून गेला. पोलिसांच्या पाठोपाठ संतोष आणि सुरेखाही बाईकवरून आले.
अण्णा सरपंचांची बोलतीच बंद झाली. आपले बिंग फुटल्याचे त्याच्या लक्षात आले. लोकं पण हळू हळू त्यांच्या घराकडे जमू लागली होती.
संतोषने पण सुरेखाला सारा प्रकार सांगितला होता. ती रागाने लाल झाली होती. तिने आल्या आल्या पायातले चप्पल सरपंचाच्या दिशेने भिरकावले.
"अहो ताई कायदा हातात घेऊ नका" एक पोलीस म्हणाला.
"माफ करा साहेब, कायदा अगोदरच हातात घेतलाय ह्या माणसाने. पैशाला हपापलेल्या या माणसाने लोभीपणाच्या सगळ्या मर्यादा तोडून टाकल्यात."  सुरेखा रागाने लाल झाली होती.
"माझ्या बापाने आत्महत्या नाही केलीय, त्याच्या प्रेताची अहवेलना करत या कावळ्यांनी त्यांच्या टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न केलाय. "
" पोरी शांत हो" गणू मास्तर थरथरणाऱ्या सुरेखाला म्हणाले. जमलेल्या लोकांना पण सुरेखा काय बोलतेय ते कळत नव्हते. ते सगळे या प्रकाराने घाबरले होते.
"गुरूजी कशी शांत राहू, माझ्या बापाचा काय गुन्हा होता? सुखाने त्याला मरू पण दिले नाही" सुरेखाला पुढे बोलता येईना. तिला बोलता बोलता दम लागला. संतोषने पुढे येऊन तिला खाली बसवले आणि पाणी दिले.
शंकररावांचे कृत्य पुऱ्या गावाला कळायला हवे म्हणून संतोष पहिल्यापासूनचा वृत्तांत लोकांना सांगायला लागला.
" गाववाल्यांनो  मी जे काही आता सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला या अण्णा पाटील सरपंचाची काळी कृत्ये कळतील." हे ऐकून गावकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. काय झाले असावे याबद्दल सारेच गावकरी अनभिज्ञ होते.
अण्णा पाटील संतोषकडे रागाने पाहत होता. संतोष पुढे सांगू लागला.
"या सगळ्या प्रकाराची सुरुवात सावळ्या आणि शेलार मामानीच केली. शिवाय अण्णा पाटलाची बायकोही यात सामील होती. आत्माराम सखाराम पाटील यांनी आत्महत्या केली नाहीये त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाय. " हे ऐकून साऱ्या जमलेल्या मंडळींनी आश्चर्याने तोंडाचा आ वासला.

" तरी आमास्नी वाटलंच हुतं, आत्माराम असलं वंगाळ काही करणार न्हाई" जमावामधून कोणीतरी बोलला.
"शेतात पडलेल्या आत्मराम भाऊंचे प्रेत उचलून या सावळ्या आणि शेलारमामाने नदीच्या किनारी आंब्याच्या झाडाला लटकवले आणि तिथून अण्णा सरपंचाना फोन करून कळवले. कारण या सगळ्याचा खरा लाभार्थी आत्माराम सखाराम पाटील उर्फ अण्णा पाटील हाच होता. हे शेलारमामाला मेलेल्या आत्माराम यांना पाहून लक्षात आले होते. नाव सारखे असल्याचा फायदा या अण्णा पाटलाने आपल्या बायकोच्या मदतीने चांगलाच उठवला. मृत आत्माराम यांच्या नावाने पतसंस्थेमधून मागच्या तारखेने कर्ज घेवून आपल्या खात्यात जमा केले. साऱ्या दुनियेसाठी आत्मारामने आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याचा फायदा कर्जमाफीसाठी होणार होता आणि सरपंचाला कर्ज फुकटात पडणार होते. पतसंस्थेचेचा व्यवहार सुशीलादेवींच्या हातात असल्याने कागदपत्र रंगवायला काहीच कठीण गेले नाही.
"आरं देवा, कसं रं तुला आसं इपरीत करायचं धाडस झालं" जमलेल्या लोकांपैकी एका म्हाताऱ्याने शेलारमामाच्या शर्टला धरले.
संतोष पुढे सांगू लागला " खरतरं , त्या दिवशी शेलारमामा मला भर दुपारी शेतात धावताना दिसला नसता तर हे कधीच समजले नसते. ऐतखाऊ शेलार मामा भर दुपारी असा शेतात फिरताना पाहून माझ्या मनात शंका आली. मी त्यांचा लपून पाठलाग केला. त्यांनी केलेला घाणेरडा प्रकार मी माझ्या मोबाईलमध्ये कैद केला. सावळ्या आणि शेलारमामा हे आत्माराम यांचा खून करून फासावर लटकावून आत्महत्या भासवत आहेत , असं मला सुरुवातीला वाटले. पण शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत मी गप्प बसलो.  सावळ्या आणि शेलारमामाच्या फोनाफोनीवरून या सगळ्या घटनेचा मास्टरमाइंड कोणी वेगळाच आहे , असे दिसून आले. मग आम्ही ठेवलेल्या पाळतीवर ह्या आत्माराम सखाराम पाटील उर्फ अण्णा पाटलावरचा संशय बळावला आणि एक दिवशी कर्जाचा चेक भरताना सरपंच सापडले आणि सगळ्या प्रकरणाचा छडा लागला. अशा नीच प्रवृत्तीच्या माणसांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहीजे. परत असे गरीब शेतकऱ्याच्या वाटेला कोणी गेले नाही पाहीजे. हल्ली हे आत्महत्येचे सत्र खूपच वाढलेय. यामागे असाच काहीतरी आर्थिक हेतू आणि राजकारण असू शकते. सरकार मात्र आपली आकडेवारी अपडेट करत असते. शेतकऱ्याचे कुटुंब मात्र जगण्यासाठी धडपडत असते." संतोष पोडतिडकीने बोलत होता.
"त्या दोन ढवळ्या पवळ्यांना बेड्या ठोका अगोदर" पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले.
"पाटील तुमच्या सारख्या लोकांमुळे गरीब बिचारा शेतकरी बदनाम झाला, असे कितीतरी शेतकरी माथी आत्महत्येचे खापर घेवून वावरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नावाखाली असे अनेक लोण्यांचे बाजार आज सुरू झालेत. याने माझ्या शेतकऱ्याचे दुनियेच्या बाजारातील मोल मात्र कमी होतेय. आज या ठिकाणी एक जागरूक नागरिक संतोषमुळे आत्मारामचा कलंक धुतला गेलाय नाहीतर तुम्ही मोकाटच राहिले असता ." असे म्हणत पोलीस इन्स्पेक्टर यांनी पाटलांनाही बेड्या ठोकल्या.
सुरेखाला संतोषचा खूप अभिमान वाटत होता. यापुढे तोच त्यांचा त्राता होता. कधी हे सगळे आई - रखमाला जावून सांगते असे तिला झाले होते. तिची होणारी घुसमट सर्व सत्य ऐकून काही प्रमाणात नक्कीच कमी होणार होती.

******************************समाप्त****************************

या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.

लेखक
नितीन राणे
९००४६०२७६८
सातरल - कणकवली